Headlines

मेघना पंत यांचा कॉलम:अरेंज्ड मॅरेज व्यवस्थेला आता ‘अपग्रेड’ करण्याची खरी गरज




पिढ्यान्‌पिढ्या भारतीय पालक आपल्या मुलींना मन लावून शिक्षण घे, मोठी स्वप्ने पाहा आणि आयुष्यात काहीतरी मोठे कर, असे सांगत आले आहेत. मात्र लग्नाचे वय आले की हा संदेश अचानक बदलतो. त्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते की आता तडजोड करायला शिक. ही परिस्थिती मी अनेकदा प्रत्यक्ष पाहिली आहे. डॉक्टर, उद्योजक, कलाकार किंवा शिक्षणतज्ज्ञ होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक गुणी मुली महाविद्यालयानंतर तर काही वेळा शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच अचानक दिसेनाशा होतात. त्यांचे लग्न होते. त्यानंतर करिअर हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा पर्याय राहत नाही. आर्थिक स्वावलंबनालाही दुय्यम स्थान दिले जाते. त्यांच्या सर्व महत्त्वाकांक्षा जणू एखाद्या डिझायनर लेहंग्यात गुंडाळून ठेवल्या जातात. त्यांची ओळख केवळ तीन शब्दांत मर्यादित राहते – पत्नी, आई आणि सून. येथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. हा लेख अरेंज्ड मॅरेजच्या विरोधात नाही. अशा लाखो विवाहांत प्रेम, जिव्हाळा व यश आहे. मात्र येथे आज्ञाधारकपणाला सद्गुण, पालनाला संमती आणि कर्तव्याला इच्छा समजण्याची चूक करतात. अशा अरेंज्ड मॅरेज पद्धतीवर येथे प्रश्न उपस्थित केला जातो. गेल्या काही दशकांत भारतात मोठे बदल झाले आहेत. महिला विद्यापीठांच्या गुणवत्ता यादीत अव्वल येत आहेत. कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. लढाऊ विमानांच्या तुकड्यांचे नेतृत्व करत आहेत. युनिकॉर्न कंपन्या उभारत आहेत व सर्वोच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडत आहेत. आपण त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवतो. पण स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा निर्णय घेण्याइतका विश्वास मात्र आजही ठेवत नाही. आजही प्रश्न तेच आहेत – लोक काय म्हणतील? मुलगा योग्य समाजातील आहे का? मुलगी जुळवून घेऊ शकेल का? पण एखाद्या मुलीला तिची स्वतःची इच्छा काय आहे, हा प्रश्न किती वेळा विचारतो? अलीकडील सिया गोयल प्रकरणच घ्या. सियाने केलेल्या गुन्ह्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. मात्र या घटनेने अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न समोर आणले. महिलांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एका निर्णयावर स्वतःचा अधिकार नसल्याची जाणीव होते. तेव्हा काय घडते? केवळ कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आखून दिलेले आयुष्य जगण्याचे भावनिक परिणाम काय असतात? हे प्रश्न एखादी शोकांतिका घडल्यानंतर विचारण्याची वाट पाहता येणार नाही. विवाह ठरण्यापूर्वीच ते विचारले गेले पाहिजेत. कारण आजची पिढी संमती म्हणजे केवळ लग्नाच्या दिवशी ‘हो’ म्हणणे असे मानत नाही. त्यांच्या दृष्टीने संमती म्हणजे भावनिक दबाव, सामाजिक बहिष्कार किंवा आयुष्यभर अपराधीपणाची भावना न बाळगता ‘नाही’ म्हणण्याचे स्वातंत्र्य. लग्न करायचे की नाही, कधी करायचे आणि कोणाशी करायचे, याचा निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य. आणि हे कोणतेही पाश्चात्त्य विचार नाहीत; ते मानवी मूल्ये आहेत. विसंगती अशी की आपण मुलींच्या शिक्षणावर वर्षानुवर्षे गुंतवणूक करतो. त्यांना स्वतंत्र विचार करायला, मोठ्या स्पर्धांमध्ये उतरायला प्रोत्साहन देतो. पण लग्नाचा विषय आला की त्याच स्वतंत्र विचाराला बंडखोरी मानले जाते. समस्या अरेंज्ड मॅरेजमध्ये नाही. समस्या अशी आहे की विवाहसंस्था वगळता जवळपास प्रत्येक गोष्टीचे आधुनिकीकरण झाले आहे. मात्र विवाह हा आज्ञाधारकपणाचे बक्षीस नसून स्वतंत्र निर्णयाचा परिणाम असला पाहिजे. कुटुंबीयांनी भावी जोडीदारांची ओळख करून देण्यात काहीच गैर नाही. समाजाने परंपरांचा उत्सव साजरा करण्यातही हरकत नाही. संस्कृतीही टिकून राहू शकते. पण एखादी परंपरा व्यक्तीच्या स्वातंत्र्याला बळ देण्याऐवजी त्याचे दमन करू लागली, तर त्यात बदल करणे आवश्यक ठरते. सर्वात मजबूत नाती कौटुंबिक दबाव किंवा सामाजिक जबाबदारीवर उभी नसतात. सर्वात मजबूत नाती दोन व्यक्तींनी एकमेकांची स्वतंत्रपणे केलेली निवड यावर आधारलेली असतात. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) समस्या अरेंज्ड मॅरेजमध्ये नाही. समस्या अशी आहे की विवाहसंस्था वगळता आपण जवळपास प्रत्येक क्षेत्राचे आधुनिकीकरण केले आहे. विवाह हा केवळ आज्ञाधारकपणाचे बक्षीस नसून व्यक्तीच्या स्वतंत्र निर्णयाचा परिणाम असला पाहिजे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत