![]()
मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात एका भरधाव बेस्ट बसने तब्बल १४ वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असून, यामध्ये १२ ते १३ रिक्षांचे अतोनात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत २ ते ३ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या थरारक अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंधेरी स्थानक (पश्चिम) परिसरातून धावणाऱ्या बेस्ट बस (मार्ग क्रमांक २४२) वरील चालकाचा ताबा अचानक सुटला. नियंत्रण सुटलेली ही मोठी बस थेट रस्त्यावरील इतर वाहनांवर जाऊन धडकली. या धडकेत रस्त्यावरून जाणाऱ्या आणि उभ्या असलेल्या सुमारे १४ गाड्यांना फटका बसला. यामध्ये सर्वाधिक नुकसान रिक्षांचे झाले असून १२ ते १३ रिक्षांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बेस्ट बसच्या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत चालकाने ‘बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे’ अपघात झाल्याचा दावा केला आहे. बचावकार्य आणि वाहतूक कोंडी अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या नागरिकांना लागलीच जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्याच्या मधोमध अपघातग्रस्त वाहनांचा खच पडल्याने अंधेरी पश्चिमेकडील मुख्य रस्त्यावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत अपघातग्रस्त गाड्या बाजूला केल्या आणि काही काळ ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली. पोलिसांकडून सध्या घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर अपघाताचे नेमके कारण तांत्रिक बिघाड आहे की मानवी चूक, हे वाहतूक पोलीस आणि बेस्ट प्रशासनाच्या सविस्तर तांत्रिक अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट बसमुळे होणाऱ्या अपघातांच्या मालिका सुरूच आहेत. नुकतेच एका बेस्ट बसने रिव्हर्स घेताना एका प्रवाशाला धडक दिली होती, ज्यात तो थोडक्यात बचावला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे बेस्ट गाड्यांची नियमित तांत्रिक देखभाल आणि ब्रेक प्रणालीची योग्य तपासणी होते की नाही? असा संतप्त सवाल आता मुंबईकरांकडून विचारला जात आहे. हे ही वाचा… आमदाराची बायको संपादकांना धमकी देते, ती कोण?:मुख्यमंत्र्यांनी नाव सांगावे; कायदा-सुव्यवस्थेवरून जयंत पाटलांचा घणाघात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर अत्यंत कडक शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज्यातील खालावलेली कायदा व सुव्यवस्था, पोलिसांचा वाढता हलगर्जीपणा आणि हप्तेखोरी या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारचे वाभाडे काढले. यावेळी, “एका आमदाराची बायको संपादकांना फोन करून धमकी देते, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ती कोण आहे हे सांगावे,” असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या खोचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तो ‘आमदार’ नेमका कोण? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…
Source link
अंधेरीत बेस्ट बसचा भीषण अपघात:ब्रेक फेल झाल्याने 14 गाड्यांना उडवले; 12 रिक्षांचा चक्काचूर, तिघे जण जखमी
