Headlines

Monsoon Update 435 citizens relocated to safety in panvel due to heavy rains


रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पनवेलमध्येही पावसाचा प्रकोप बघायला मिळालाय. त्याचा फटका नागरिकांना बसतोय. संभाव्य धोका लक्षात घेता पनवेल महापालिका प्रशासनाने 435 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं आहे.

panvel news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. बाधित नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहेत. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार आतापर्यंत सुमारे 435 नागरिकांचे चार तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांना चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

अतिवृष्टीमुळे पाणी साचणाऱ्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत पनवेलमधील पटेल मोहल्ला आणि कच्ची मोहल्ला परिसरातील भारतनगर झोपडपट्टीतील 149 नागरिकांना उर्दू शाळेत, 211 नागरिकांना कोळीवाडा शाळेत, तर एचओसी कॉलनी आदिवासी वाडीतील 75 नागरिकांना क्रीडा संकुलात सुरक्षितरीत्या स्थलांतरित करण्यात आले आहे.

panvel

भांडार विभागामार्फत या सर्व नागरिकांना चहा, बिस्किटे, नाश्ता, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या सूचनेनुसार स्थलांतरित नागरिकांरी आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त, संबंधित उपायुक्त, कामोठे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी, पनवेल प्रभाग प्रभारी अधिकारी राजेश डोंगरे तसेच मुख्य निरीक्षक अरुण कांबळे हे सातत्याने निवारा केंद्रांना भेट देऊन नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत.

panvel

पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना

जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सखल भागातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जेटिंग मशिन आणि जेसीबीच्या सहाय्याने गटारांमधील अडथळे व कचरा हटविण्याचे काम सुरू असून विविध ठिकाणी पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी कर्मचारी कार्यरत आहेत. चारही प्रभागातील परिस्थितीवर महापालिका प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

‘हे’ मार्ग बंद

खारघर येथील ड्रायव्हिंग रेंज आणि पांडवकडा मार्ग सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. या परिसराची अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर आणि प्रभारी अधिकारी जितेंद्र मढवी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी पनवेलमधील बांठिया शाळा, पाणी साचलेले विविध भाग तसेच स्थलांतरित नागरिकांच्या निवारा केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच समिती ‘क’ अंतर्गत कामोठे गणपती मंदिर परिसरात दोन पंपांच्या साहाय्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा करण्यात आला आहे.

प्रभाग समिती क कामोठे सरिता संगम सोसायटी सेक्टर-06, कामोठे येथे चौथ्या मजल्यावर रूम 19 चे पीओपी कोसळले होते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही तरी सदर सोसायटीस मनपाकडून यापूर्वीच स्ट्रक्चर ऑडिट करणे कामी नोटीस यापूर्वी देण्यात आलेली आहे . सदर ठिकाणची अतिरिक्‍त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरुप खारगे आणि उपायुक्त अभिषेक पराडकर यांनी प्रत्यक्ष पहणी केली. या संदर्भात योग्य त्या सूचना केल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असून आवश्यक ते सर्व मदतकार्य सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे यांनी दिली.

महापौरांची पाहणी आणि नागरिकांना आवाहन

महापौर नितीन पाटील यांनी पनवेलमधील विविध पाणी साचलेल्या भागांची पाहणी केली. यावेळी महापालिका सदस्य सुमित झुंजारराव आणि दर्शना भोईर उपस्थित होते. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाण्याचा निचरा तातडीने करण्याच्या सूचना देतानाच नागरिकांनीही अनावश्यक बाहेर पडणे टाळावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.

महापौरांनी स्थलांतरित शिबिरांना भेट देऊन, महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला, यावेळी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे,डॉ वैभव विधाते उपस्थित होते.

ऑनलाईन बैठकीत परिस्थितीचा आढावा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे आपत्कालीन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी चारही प्रभागांतील पाणी साचलेली ठिकाणे, तेथील उपाययोजना, स्थलांतरित नागरिकांना पुरविण्यात आलेल्या सुविधा याबाबत सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेची सर्व यंत्रणा सतत सज्ज ठेवण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा