धनाजी चव्हाण, परभणी: अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असताना परभणीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा संपन्न होणार होती. मात्र माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट खासदार संजय जाधव यांना इशारा दिला आहे. “आमच्या जीवावर तुम्ही निवडून आला आहात आणि आता मराठ्यांच्या उरावर तुम्ही सभा घेणार आहात का? जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली तर मी तिथं येईल आणि मग धिंगाणा होईल. येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी परभणीचे खासदार संजय जाधव यांना दिला आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सभा घेऊ नये आणि जर घ्यायचीच वेळ आली तर आम्ही त्यांच्या सभेमध्ये घुसू, त्यांना परत मुंबईला जायचं आहे, त्यांनी विचार करावा,” असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची परभणीमध्ये जाहीर सभा घेण्याचा मानस खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केल्यानंतर आज परभणीत प्रियदर्शनी स्टेडियम येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ही सभा संपन्न होणार असताना मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बातचीत केली आणि त्यावेळी त्यांनी परभणीत होत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला कडाडून विरोध केला आहे. एकीकडे मराठा बांधवांच्या न्याय हक्कासाठी आम्ही उपोषण करत आहोत आणि दुसरीकडे मराठा नेतेच सत्ताधाऱ्यांच्या सभा घेण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसंच “खासदार संजय जाधव हे मागील लोकसभा निवडणुकीत कोणाच्या मतावर निवडून आले, याचा देखील त्यांनी अभ्यास करावा. जर त्यांनी ही सभा रद्द नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
कार्यक्रम रद्द होणार नाही, संजय जाधवांची भूमिका
सर्व तयारी झाली असून कार्यकर्तेही उपस्थित राहिल्याने आता हा कार्यक्रम रद्द करता येणार नाही, अशी भूमिका खासदार संजय जाधव यांनी घेतली आहे. “मनोज जरांगे पाटील यांचा मला आताच फोन आला होता की, आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम रद्द करावा. पण कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे. गावोगाव असलेले कार्यकर्ते परभणीत दाखल झालेले आहेत आणि ऐनवेळी हा कार्यक्रम कसा रद्द करणार? जर काल मनोज जरांगे पाटील यांनी मला कार्यक्रम रद्द करायला सांगितला असता तर तो मी रद्द केला असता. पण ऐनवेळी कार्यक्रम रद्द करणे शक्य नाही. कारण कार्यकर्त्यांचा देखील आग्रह आहे की कार्यक्रम व्हावा. त्यामुळे आताचा कार्यक्रम रद्द होणार नाही,” असं खासदार जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिलेला असतानाही संजय जाधव यांनी कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर केल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता असून याबाबत काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा