Headlines

Manoj jarange patils hunger strike suspended decision made based on governments acceptance of all demands about maratha reservation; मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर स्थगित; मध्यरात्री शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर घेतला निर्णय



जालना: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला यश आलं आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड रात्री 1 वाजून 40 मिनिटाला जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. यावेळी सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर जरांगे पाटील उपोषण स्थगित करण्यास तयार झाले.

मध्यरात्री सुमारे एक तासभर चर्चा केल्याच्या नंतर समाजबांधवांशी संवाद साधत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर ‘एक मराठा, लाख मराठा’ची जोरदार घोषणाबाजी झाली आणि जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. ज्या मागण्या जरांगे पाटील यांनी सरकारकडे केल्या होत्या त्या तात्काळ पूर्ण करणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वस्त केलं आहे.

कसं झालं मनोज जरांगे यांचं समाधान?

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. मात्र केवळ चर्चा नको, तर ठोस निर्णय हवा, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी व सरकारशी चर्चा करून पुन्हा संध्याकाळी येण्याचे आश्वासन देत विखे पाटील छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. मनोज जरांगे हे रखरखत्या उन्हात उपोषणाला बसल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा समाज बांधव अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आणि त्यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

अखेर रात्री उशिरा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारपुढे ठेवलेल्या 12 प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठा आंदोलनादरम्यान समाजबांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे, सातारा संस्थान गॅझेट, हैदराबाद गॅझेटसंदर्भातील मागण्या तसेच राज्यामध्ये 58 लाख नोंदी मराठा समाज बांधवांच्या कुणबी असल्याच्या सापडल्या असल्याचा सरकारचा आकडा आहे, मात्र प्रत्यक्षात प्रमाणपत्र दिले जात नाही आणि ज्यांना प्रमाणपत्र दिले आहे, त्यांना प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मिळत नाही , ओबीसी मधून नोकऱ्या मिळालेल्या मुलांना अद्याप संबंधित विभागाने रुजू करून घेतलेलं नाही , यासारख्या इतर विविध मागण्या सरकारसमोर जरांगे पाटील यांनी मांडल्या व त्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

सुमारे 1 तास चाललेल्या चर्चेनंतर मागण्यांबाबत लेखी आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा अभ्यासक आणि उपस्थित समाजबांधवांशी चर्चा करून उपोषण स्थगित करण्याची घोषणा मध्यरात्री 1वाजून 40 मिनिटांनी केली.

उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल

सरकारच्या शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवायला अखेर यश आलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रसाद लाड यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शनिवारी दिवसभर नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील शनिवारी सकाळी दहा वाजता उपोषणाला बसले. अंतरवाली सराटी जवळच्या शेतात बाजेवर डोक्याला भगवा रूमाल लपेटून ते बसले. गावातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. सकाळी पावणे अकराच्या सुमारास मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि छत्रपती संभाजीनगर येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांनी आणलेला प्रस्ताव जरांगेंना दिला. यात प्रामुख्याने सर्व मागण्यांवर सरकारच्या वतीने म्हणणे मांडलेले होते. मात्र, जरांगे यांनी विखे आणि शितोळे यांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगून उन्हात उपोषणाला बसण्याचा निर्णय कायम ठेवला.

‘सरकारने दिलेल्या प्रस्तावावर आपण समाधानी नाही. सातारा गॅझेट तातडीने काढा, मराठा मंत्रालय स्थापन करा, ५८ लाख कुणबी जातीचे प्रमाणपत्र पडताळणी करून द्या,’ या मागण्यांवर जरांगे ठाम राहिले. विखे आणि शितोळे यांनी जरांगे यांना सावलीत उपोषण करण्याची विनंती केली. मात्र, आपण उन्हात बसलो की चटके सरकारला बसतात असे म्हणत जरांगे यांनी सावलीत जाण्यासाठी नकार दिला.

दरम्यान, अखेर मध्यरात्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टमंडळाने दिलेला प्रस्ताव मान्य झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत