अभिनेते महेश मांजरेकर यांनी २०२१ मध्ये ब्लॅडर कॅन्सरवर यशस्वी मात केली. त्यांच्या अनुभवामुळे या कर्करोगाबाबत जागरूकता वाढली. लघवीत रक्त येणे, वारंवार लघवी लागणे, जळजळ आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना ही ब्लॅडर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. धूम्रपान, औद्योगिक रसायनांचा संपर्क आणि काही वैद्यकीय कारणांमुळे हा धोका वाढतो. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे हा कर्करोग नियंत्रणात आणता येतो. ब्लॅडर कॅन्सरची लक्षणे, कारणे, प्रतिबंध आणि उपचारांबाबत तज्ज्ञांकडून महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

ब्लॅडर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे
ब्लॅडर कॅन्सरचे सर्वात पहिले आणि प्रमुख लक्षण म्हणजे लघवीतून रक्त पडणे. यामुळे लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा गडद तपकिरी दिसू शकतो. साध्या युरिन संसर्गामध्ये लघवी करताना वेदना होतात, परंतु कॅन्सरच्या बाबतीत लघवीतून रक्त पडताना अनेकदा कोणत्याही वेदना होत नाहीत. यामुळेच अनेक लोक, अगदी महेश मांजरेकरांसारखे रुग्णही सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात. याशिवाय वारंवार लघवीची भावना होणे, अचानक लघवीचा वेग येणे, लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, मूत्राशय पूर्णपणे रिकामे न होणे आणि पाठीच्या खालच्या भागात सतत अस्वस्थता जाणवणे ही या आजाराची सुरुवातीची लक्षणे आहेत. कर्करोग प्रगत टप्प्यात पोहोचल्यास वजन अचानक कमी होणे, तीव्र थकवा आणि पायांवर सूज येणे असा त्रास होऊ शकतो.
महिला आणि पुरुषांमधील तफावत व निदानातील आव्हाने
हा कर्करोग महिला आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो, परंतु पुरुषांमध्ये हा आजार होण्याचा धोका महिलांपेक्षा ३ ते ४ पटीने जास्त असतो. असे असले तरी, महिलांमध्ये या आजाराचे निदान अनेकदा उशिरा किंवा प्रगत टप्प्यावर होते. याचे कारण म्हणजे महिलांना लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी लागणे किंवा लघवीतून रक्त येण्याचा त्रास झाल्यास, त्या अनेकदा याला नेहमीचा किंवा वारंवार उलटणारा ‘यूटीआय’ किंवा स्त्रीरोगविषयक समस्या समजून घरगुती उपचार किंवा साधी अँटीबायोटिक्स घेतात. त्यामुळे जर लघवीचा त्रास औषधोपचार करूनही बरा होत नसेल, तर महिलांनी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
ब्लॅडर कॅन्सरचे मुख्य धोके आणि कारणीभूत घटक
- धूम्रपान (Smoking) : तंबाखू आणि धूम्रपान हा ब्लॅडर कॅन्सरचा जगातील सर्वात मोठा धोका आहे. तंबाखू मधील हानिकारक रसायने रक्तामध्ये मिसळतात, त्यानंतर किडनीद्वारे ती गाळली जाऊन लघवीमध्ये गोळा होतात. यामुळे मुत्राशयाच्या आतील संवेदनशील त्वचेचा या कर्करोगजन्य रसायनांशी थेट संबंध येतो.
- औद्योगिक रसायने : रंग, रबर, चामडे, पेंट आणि कापड उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचा रासायनिक घटकांशी थेट संबंध आल्यास हा धोका वाढतो.
- इतर कारणे : मुत्राशयामध्ये वारंवार खडे (Stones) होणे, दीर्घकाळ लघवीची नळी (Catheter) बसवलेली असणे, पूर्वी पोटाच्या भागावर झालेली रेडिएशन किंवा केमोथेरपी आणि अनुवंशिकता यांमुळेही हा आजार होऊ शकतो.
जीवनशैलीतील बदल आणि प्रतिबंधात्मक उपाय
जरी सर्वच केसेस पूर्णपणे रोखणे शक्य नसले, तरी काही निरोगी सवयींमुळे ब्लॅडर कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो:
- तंबाखूचा त्याग : कोणत्याही स्वरूपातील तंबाखू, सिगारेट किंवा विडीचे सेवन पूर्णपणे बंद करणे हा या आजाराला रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
- भरपूर पाणी पिणे : दिवसातून मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने लघवी पातळ होते, ज्यामुळे लघवीतील हानिकारक रसायने मुत्राशयाच्या भिंतीला जास्त वेळ चिकटून राहत नाहीत आणि लघवीवाटे लवकर बाहेर पडतात.
- सुरक्षितता बाळगणे : रासायनिक उद्योगात काम करणाऱ्यांनी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि संरक्षणात्मक किटचा वापर करावा. तसेच आहारातील अँटीऑक्सिडंट्ससाठी ताजी फळे, हिरव्या भाज्या, ब्रोकोली, पालक आणि प्रोबायोटिक समृद्ध दही यांचा समावेश करावा.
सामान्य युरिन संसर्ग (UTI) की कॅन्सर? आणि उपचार पद्धती
साधा युरिन संसर्ग (UTI) हा अँटीबायोटिक्सच्या कोर्सनंतर पूर्णपणे बरा होतो. परंतु, जर अँटीबायोटिक्स घेऊनही लघवीतील रक्त किंवा जळजळ थांबत नसेल, तर युरिन कल्चर, सोनोग्राफी आणि आवश्यकतेनुसार ‘सिस्टोस्कोपी’ (मुत्राशयाची दुर्बिणीद्वारे तपासणी) करून घेणे अनिवार्य आहे.
- उपचार : या आजाराचे उपचार तो कोणत्या स्टेजला आहे यावर अवलंबून असतात. सुरुवातीच्या टप्प्यात (Early Stage) अतिशय कमी आक्रमक अशा दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेद्वारे (Minimally Invasive Surgery) कर्करोगाचा भाग काढून टाकला जातो आणि गरज पडल्यास मुत्राशयात थेट औषध सोडले जाते. आजार वाढला असल्यास मोठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, इम्युनोथेरपी किंवा रेडिएशनचा वापर केला जातो.
अभिनेते महेश मांजरेकर यांनी वेळेवर अचूक निदान आणि योग्य उपचार घेतल्यामुळेच ते आज पूर्णपणे कर्करोगमुक्त झाले आहेत. त्यांच्या उदाहरणावरून आपण हे शिकले पाहिजे की, शरीराने दिलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. लघवीतून एकदाही किंवा थेंबभरही रक्त आले, तरीही लाज न बाळगता किंवा भीती न ठेवता त्वरित युरोलॉजिस्टचा (मूत्ररोग तज्ज्ञ) सल्ला घ्या. लवकर निदान हाच कॅन्सरवर विजय मिळवण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे!
आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले
आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.
- नवीन आवृत्ती
- Jul 16, 2026, 02:51 PMMedically Reviewed byDr. Ajit Gujela
- Jul 16, 2026, 02:51 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम
