► वृत्तसंस्था ओडेसा
युक्रेनमधील ओडेसा बंदराजवळ एका मालवाहू जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यात चार भारतीय खलाशी ठार झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी याला दुजोरा दिला. 19 जुलै 2026 रोजी संध्याकाळी ओडेसा बंदरातून निघालेल्या ‘एमव्ही गोल्डन लिओ’ या जहाजावर हल्ला झाला. त्यावेळी जहाजावर पाच भारतीय नागरिकांसह एकूण 17 खलाशी होते, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
भारताने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे, निष्पाप नागरी कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात घालणे आणि सागरी व्यापार व नौकानयनाच्या स्वातंत्र्यात अडथळा आणणे हे पूर्णपणे निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
युक्रेनमधील भारतीय दूतावास या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून पीडित भारतीयांना सर्वतोपरी मदत पुरवत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तर आणखी एक भारतीय गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारत सरकारने मृतांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र शोक व्यक्त केला असून जखमी भारतीय नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
युक्रेनने ठरवले रशियाला जबाबदार
दरम्यान, युक्रेनने या घटनेसाठी थेट रशियाला जबाबदार धरले आहे. रशियाने युक्रेनच्या सागरी मार्गातून प्रवास करणाऱ्या एका नागरी मालवाहू जहाजावर पुन्हा एकदा हल्ला केल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जहाजावर भारत आणि सीरियाचे नागरिक होते.
या हल्ल्यात एक युक्रेनियन नौदल पायलट आणि चार भारतीय खलाशी ठार झाले. हा हल्ला केवळ एका जहाजावरील हल्ला नसून, जागतिक अन्न पुरवठा साखळी आणि आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराच्या स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचेही इराणने म्हटले आहे.रशियाला युक्रेनियन नागरिकांच्या किंवा इतर देशांच्या नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही, असे परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.
भारतासाठी संवेदनशील घटना
एक दिवसापूर्वी काळ्या समुद्रात एका परदेशी मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. तसेच अन्य तीन जण जखमी झाले. कीवने आंतरराष्ट्रीय सागरी संघटना आणि तिच्या सहयोगी देशांसमोर हा मुद्दा उपस्थित करण्याची शपथ घेतली असून, रशियाविरुद्ध कठोर आंतरराष्ट्रीय कारवाई आणि नवीन निर्बंधांची मागणी केली आहे.
रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे काळ्या समुद्रातील नागरी जहाजांची सुरक्षा आणि जागतिक सागरी व्यापाराबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
ही घटना भारतासाठीही अत्यंत संवेदनशील मानली जाते, कारण अलिकडच्या वर्षांत आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत भारतीय खलाशांवर झालेल्या सर्वात गंभीर हल्ल्यांपैकी हा एक आहे.
