दोन वर्षांनंतर झालेल्या पडताळणीत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी समोर आल्याने सरकारसमोर निधी वसुलीचे आव्हान उभे राहिले असून, भविष्यातील कल्याणकारी योजनांसाठी अधिक कडक पडताळणीची गरज अधोरेखित झाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी पडताळणीनंतर सुमारे ८१ ते ९२ लाख महिला अपात्र ठरून त्यांचे हप्ते रोखल्याची बातमी मुळीच धक्कादायक नाही. उत्पन्न मर्यादा ओलांडणे, ई-केवायसी पूर्ण न करणे आणि करदाते असणे ही यामागची प्रमुख कारणे सांगितली जात असली तरी राज्याच्या तिजोरीतील खडखडाचा आवाज त्याहून मोठा आहे. तब्बल १४ हजार कोटी रुपये या अपात्र लाभार्थींनी लाटले आहेत! महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा नारा देत कार्पोरेट पद्धतीने हजारो महिलांच्या उपस्थितीत दोन वर्षांपूर्वी या योजनेचे ठिकठिकाणी ‘लाँच’ झाले तेव्हा राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने योजनेची अंमलबजावणी झाली. दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता तातडीने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांत जमा करण्यात आला होता. भाजप आणि मित्रपक्षांच्या प्रचारात ही योजना केंद्रबिंदू ठरली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गुलाबी जॅकेट चर्चेत आले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींकडून हातभर राख्या बांधून घेतल्या. अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि निकष शिथिल करण्यात आले, कसून पडताळणी होत नसल्याने अल्पावधीत कोट्यवधी महिला योजनेत जोडल्या गेल्या, यात नवल नव्हते. मतदानयंत्रावरचे बटन दाबण्यापूर्वीच योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाले होते. दरमहा १५०० रुपये ही आकर्षक रक्कम आणि ‘आम्ही बहिणींना आर्थिक ताकद दिली’ हा प्रचार अत्यंत प्रभावीपणे राबवला गेला आणि अपेक्षेप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरात मोठे यश टाकले.
दोन कोटी ४० लाख महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे राज्याच्या तिजोरीतील मोठा हिस्सा या एकाच योजनेसाठी वर्ग करावा लागला. हजारो कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला. त्यामुळे पायाभूत सुविधा, रस्ते विकास, सिंचन आणि इतर कल्याणकारी योजनांच्या निधीमध्ये कपात करावी लागली. राज्यावरील कर्जाचा बोजा आधीच वाढत असताना, अशा थेट रोख हस्तांतरण योजनांमुळे आर्थिक ताण आणखी वाढला, यात आश्चर्य नव्हते. ‘कॅग’ने आपल्या ताज्या अहवालात यावर बोट ठेवले आहे; सरकारने मंजूर बजेटपेक्षा (२९,६९३ कोटी रु.) तब्बल ३,५४१ कोटी रुपये अधिक खर्च केले आहेत आणि याचे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. ‘लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली २८ जून २०२४ या दिवशी. त्याला दोन वर्षे उलटून गेली आहेत. तब्बल २४ महिने निकष धाब्यावर बसवून हजारो-लाखो लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेतला. अनेक ठिकाणी एकाच घरात एकापेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले, तर काहींनी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक असतानाही खोटे उत्पन्नाचे दाखले जोडले. सरकारी नोकरदारांच्या नातेवाइकांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. प्राप्तिकर भरणाऱ्यांनीही डल्ला मारला. कहर म्हणजे काही पुरुषांनी बोगस कागदपत्रे तयार करून पैसे लाटले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी लुबाडलेले सरकारी पैसा परत मिळवण्यासाठी सरकार कायदेशीर पावले उचलणार असले तरी सगळ्या अपात्र लोकांकडून पैसे वसूल करणे अशक्य आहे. यापुढील हप्ते बंद होतील, एवढेच.
जाणीवपूर्वक बनावट कागदपत्रे, खोटे उत्पन्नाचे दाखले किंवा बोगस आधार कार्ड वापरून सरकारची फसवणूक केली त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी; तरच यापुढे अशी लूट रोखता येईल. योजना सुरू करताना घाईगडबडीत यंत्रणेकडून गंभीर चुका झाल्या. लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यास सांगण्यात आले होते. वारंवार मुदतवाढही देण्यात आली होती; पण मुळातच बोगस असलेल्या लाभार्थींकडून ही पूर्तता होणे अशक्यच होते. सुरुवातीलाच आधार लिंक, प्राप्तिकर माहिती आणि रेशन कार्ड प्रणालीशी अर्ज ताडून पाहिले असते, तर अपात्र अर्जदारांना पहिल्याच टप्प्यात बाद करून सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले असते. तब्बल दोन वर्षे पैसे वाटायचे आणि नंतर अपात्र लाभार्थी शोधून त्यांच्याकडून वसुली करणार म्हणायचे, यातून मोठा राजकीय फायदा मिळाला; पण प्रशासनाचा दुप्पट वेळ, मनुष्यबळ आणि जनतेचे कोट्यवधी रुपये वाया गेले. या सगळ्यात आर्थिक गरज असलेल्या कितीतरी गरीब आणि गरजू महिला या योजनेपासून वंचित राहिल्या असतील. ‘ लाडकी बहीण योजना ‘ महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची असली, तरी राजकीय घाई आणि नियोजनशून्य अंमलबजावणीमुळे लाडक्या बहिणी आता ‘नकोशा’ ठरल्या आहेत. सध्या कोणतीही मोठी निवडणूक तोंडावर नाही. त्यामुळे याची जाहीर कबुली देण्यासाठी सरकारने वेळ मात्र अचूक साधली आहे!
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा