Kunal Kohli On Tukaram Mundhe : बॉलिवूड दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली असून त्यांनी तुकाराम मुंढेंनी आता भारतीय घरातील फ्रिजवर धाड टाकायला हवी, असं म्हटलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘हम तुम’ सिनेमाचे दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांना उद्देशून केलेल्या एका मिश्कील पोस्टमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राज्यभर सुरू असलेल्या अन्नसुरक्षा तपासणीच्या पार्श्वभूमीवर कुणाल कोहली यांनी थेट भारतीयांच्या घरातील किचन आणि फ्रिजचीही तपासणी करण्याचा सल्ला दिला. घराघरातील किचनमधील कपाटांमध्ये आणि फ्रिजमध्ये अनेकदा वर्षानुवर्षे वापरात नसलेल्या, तसेच मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांच्या बाटल्या आणि पॅकेट्स पडून असतात. तुकाराम मुंढे यांनी देशभरातील घरांमधील किचन शेल्फ आणि फ्रिज तपासावेत असं कुणाल कोहली यांनी म्हटलंय.
कुणाल कोहली यांची पोस्ट
कुणाल कोहली यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं की, ‘तुकाराम मुंढे यांनी आता भारतीय घरांमधील स्वयंपाकघर आणि फ्रिजवरच धाड टाकायला हवी. अनेक घरांमध्ये जुने, एक्सपायर झालेले खाद्यपदार्थ अतिशय सुरक्षितपणे जपून ठेवलेले असतात. बाटल्या आणि पाकिटं प्रत्येक महिन्याला पुसून पुन्हा फ्रिजमध्ये तशीच ठेवली जातात. पण त्यांचा कधीच वापर केला जात नाही. चला आता आपण सर्वांनी आपापल्या घरातच ‘तुकाराम मुंढे स्टाईल सफाई’ करुन तपासणी करूया.’
यापूर्वी अभिनेत्री श्वेता तिवारीनंही तुकाराम मुंढे यांच्याकडे मागणी केलेली. ऑनलाईन डिलिव्हरी करण्यात आलेल्या अन्नपदार्थांमध्ये झुरळ सापडल्याचा व्हिडिओ श्वेतानं शेअर केलेला. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीनं, ‘मुंढे जी, आता आमच्या घरात झुरळं येत आहेत. तुम्ही कुठे आहात, प्लीज याकडे लक्ष द्या.’ असं म्हटलेलं. त्याचबरोबर अनेक बॉलिवूडकरांनी तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचं कौतुक करत त्यांना पाठिंबा दिला आहे.
Tukaram Mundhe FDA Raid : २० हजार लीटर कृत्रिम दूध नष्ट, दूधात भेसळ करणाऱ्यांचं रॅकेट उद्ध्वस्त
दरम्यान, महाराष्ट्र FDA कडून राज्यभर अन्नसुरक्षेशी संबंधित तपासण्या सुरू आहेत. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, रस्त्यावरील खाद्यविक्रेते तसेच ऑनलाइन डिलिव्हरीच्या माध्यमातून खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी केली जात आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास परवाने निलंबित करणे आणि सुधारणा नोटिसा बजावणे यांसारखी कारवाई केली जात आहे. भेसळयुक्त दूध, रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थ, शाळांच्या परिसरात विकले जाणारे जंक फूड तसेच बंदी असलेल्या गुटखा आणि तंबाखूयुक्त पानमसाल्याच्या उत्पादन-विक्रीवरही प्रशासनाकडून लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा