Maharashtra MLC Election Result 2026 : नांदेड विधान परिषद निवडणुकी कृष्णा पाटील आष्टीकर यांचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नांदेड : हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी फुटीर भूमिका घेतल्यानंतर राजकीय वर्तुळाचं लक्ष नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. कारण आष्टीकरांचे सुपुत्र कृष्णा नागेश पाटील आष्टीकर या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे उबाठाकडून रिंगणात उतरले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासाच ठाकरे गटाने आष्टीकरांच्या सुपुत्राबद्दल कठोर निर्णय घेतला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ सोशल मीडियातून यासंबंधी घोषणा केली आहे.
नागेश पाटील आष्टीकर यांना मुलाचा पराभव हा मोठा धक्का मानला जात असला, तरीही कृष्णा पाटील पित्याप्रमाणे गेम करुन दगाबाजी करणार, अशी अटकळ ठाकरे गटातून आधीच बांधली जात होती. काँग्रेसकडे 92 संख्याबळ असताना 19 संख्याबळ असलेल्या ठाकरे गटाला नांदेडची जागा सुटली होती. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस निर्माण झाली असताना मतदानाच्या दोन दिवसापूर्वी ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली. खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या धडकल्या, त्यामुळे काँग्रेससह ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नगरसेवकही संभ्रमात पडले होते.
VIDEO | बंडखोर खासदार संपर्कात? राऊतांचं मोठं वक्तव्य
आपला विजय निश्चित असल्याचा दावा कृष्णा पाटील आष्टीकर करत होते. परंतु ‘कृष्णा पाटील आष्टीकर हा महाविकास आघाडीचा उमेदवार असणं ही निव्वळ दिशाभूल आहे. भाबडेपणा सोडा, हा सुद्धा बापाइतका चतुर आणि धूर्त आहे’ अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र सोडलं होतं. त्यावरुन कृष्णा आष्टीकरांनी पलटवार केला असता, “चला कृष्णराव, मी माझे शब्द मागे घेते, कधी करताय नागेश पाटील आष्टीकर यांना जोडे मारो आंदोलन?” असा विचारत अंधारेंनी पुन्हा त्यांना डिवचलं होतं. आता त्यांच्या पराभवानंतर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा