Headlines

Khajuraho: देवळांचा गाव… खजुराहो – khajuraho famous town in chhatarpur district of madhya pradesh india


-राणी दुर्वे

मध्य प्रदेशातील खजुराहोविषयी लिहिण्याचा नुसता मनात विचार आला तरी सागरजवळच्या रस्त्यांवरचे खड्डेच आठवतात. भोपाळहून निघालो होतो गाडी करून. त्या रात्री मुक्काम होता सागर नावाच्या गावी. रात्रीचे आठ वाजत आले असतील. सागरला पोचायला अर्धा तासच उरला होता. हॉटेलात पोहोचून चांगले ताजेतवाने होऊन जेवावे या विचारानेच भूक चाळवली. निश्चिंत मनाने थोड्याच वेळात मुक्कामाच्या जागी पोचणार म्हणून गाडीतला पसारा आवरून वाट पाहू लागलो आणि त्यापुढे जो काही रस्ता होता तो पृथ्वीवरचा की चंद्रावरचा तेच कळेना! म्हणजे चंद्रावर खड्डे असतील असे आपण गृहीत धरले तर ते इतक्याच खोलीचे आणि रुंदीचे असतील. अर्ध्या तासात पोहोचण्याच्या खुशीत असणारे आम्ही तब्बल दोन-अडीच तासांनी मुक्कामी पोचलो तेव्हा अंगातली सगळी हाडे खिळखिळी झालेली, शरीरातले त्राण गेलेले आणि जेवणाचे तर नावही नको झालेले. त्यामुळेच ‘खजुराहो’ शब्द लिहिला आणि आठवले खड्डेच!

आणि हो, पाठोपाठ चंद्रदेखील कारण चंद्र आणि खजुराहो हेही एक नाते आहे.

‘खजुराहो’ तसे सामान्य रूपरंगाचे गाव. म्हणजे त्या गावातून जर देवळे वगळली तर तसे काहीच विशेष नाही. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्हयातून खजुराहोला प्रत्यक्ष जाऊन पोहोचावे; तर प्राचीन देवळांनी अलंकारलेले असे ते गाव विशाल भूमीवर एकटेच उभे असल्याचे जाणवते. म्हणे की ‘खजुराहो’ हे गावाचे नाव इथे कधी काळी खूपशी खजुरांची झाडे असल्यामुळे पडले. या गावाभोवतीच्या लोककथा कुणा हेमवती नावाच्या सुंदर स्त्रीभोवती आणि चंद्राभोवती गुंफल्या आहेत. हेमवती ही हेमराज नावाच्या काशीच्या मुख्य पुजाऱ्याची मुलगी. सुंदर, सुशील. जसजशी ही हेमवती तरुण होत जाते तसतशी ती अशी काही सुंदर दिसू लागते की दहा अप्सरांचे सौंदर्य तिच्यापुढे फिके पडावे! एके दिवशी उत्तररात्री किंवा भल्या पहाटे म्हणा, एकान्त स्थळी तलावात हेमवती नहात असताना आकाशातल्या चंद्रालाच तिची इतकी लालसा निर्माण होते की तो मानवी शरीर धारण करून तिच्यापुढे अवतरतो. तिचा उपभोग घेतो. मर्यादा ओलांडून चंद्राने आपले शील भ्रष्ट केल्याबद्दल हेमवती रागावून चंद्राला शाप देऊ जाते तर तिला आपल्यापासून एक सुंदर आणि शूर मुलगा होऊन तो पुढे शक्तिशाली राजा होईल असे आश्वासन चंद्र देतो. चंद्रापासून तिला दिवस जातात. ती बालविधवा असल्याचेही काही गोष्टीत सांगितले जाते.

बालविधवा असल्यामुळे लोकभयास्तव ती तिचा गाव सोडून खजुराहोच्या निर्जन जंगलात येते. मग या खजुरांच्या झाडांच्या, जंगली प्राण्यांच्या सानिध्यात चंद्रवर्मन/चंद्रवर्धन नावाच्या एका सुंदरशा मुलाला ती जन्म देते. सोळा वर्षांचा होईतोवरच मुलगा इतका शूर होतो की तो नुसत्या हातांनीही वाघ-सिंहांशी मुकाबला करून त्यांना मारू शकत असे. आपल्या वडिलांच्या, चंद्राच्या आशीर्वादाने पुढे तो कलिंजरचे राज्य स्थापन करतो. बालविधवा असूनही माता झालेल्या त्याच्या आईचे पाप तरीही उरलेच म्हणून तिच्या पापक्षालनासाठी तिच्याच इच्छेनुसार चंद्रवर्मनने खजुराहोमध्ये देवळे, आणि तलाव बांधले. चंद्रानेच म्हणे की त्याला स्वप्नात येऊन सांगितले की सगळे जीवन देवळांवर कोरून घे. त्यामुळेच ‘आध्यात्मापासून कामापर्यंत’ सारे काही देवळांवर पसरले.

हेमवती याच नावाभोवती आणि चंद्राभोवतीच फिरणारी तशीच काहीशी अजून एक कथा. फरक एवढाच की इथे वडिलांचा शब्द खोटा पडू नये म्हणून एका आज्ञाधारक मुलीने आपला बळी दिला. मणिराम हा कलिंजर राज्याचा राजपुरोहित. एकदा चुकीचे गणित मांडून अमावस्येच्या दिवशी पौर्णिमा असल्याने त्याने राजाला सांगितले. हेमवतीच्या लक्षात वडिलांची चूक आली आणि त्यांच्या प्रतिमेला डाग लागू नये म्हणून तिने चंद्राला अमावस्येच्या दिवशी पूर्णरूपात येण्याचे साकडे घातले. चंद्राने मान्य केले पण तिच्या सौंदर्याचा बळी घेऊनच! जेव्हा मणिरामला हे सारे कळले तेव्हा त्याला इतका पश्चात्ताप झाला की दु:खातिरेकाने त्याने स्वत:लाच शापित केले आणि तो दगडाची मूर्ती झाला. या कथेत चंद्रापासून हेमवतीला चंद्रेतय नावाचा मुलगा झाला आणि त्याच्यापासूनच चंदेल्ल राजघराणे सुरु झाले. चंदेल्ल लोक मणिरामाची मनियादेव म्हणून पूजा करत असत.

दोन्ही गोष्टींमध्ये आपल्या आईच्या शीलशुद्धीसाठी चंद्रवर्मन/चंद्रवर्धन किंवा चंद्रेतय नावाच्या मुलाने खजुराहोत पंच्याऐंशी देवळांची निर्मिती केली हेच येते. आपल्या संस्कृतीत दंतकथा असतातच भोवती, पण दहाव्या-बाराव्या शतकात मध्य प्रदेशात चंदेल्ल राजवटीत बांधल्या गेलेल्या पंच्याऐंशी देवळांपैकी पंचवीस-एक देवळे तरी आजमितीला जिथे अस्तित्वात आहेत त्या देवळांच्या समूहांनी खजुराहोला असे काही वलय प्राप्त करून दिले आहे की, जगातल्या महत्त्वाच्या वास्तुंपैकी ते एक होऊन गेले आहे. दुर्दैव असे की नामशेष झालेल्या साठ देवळांतून काय हरवले गेले हे कधीच आपल्याला कळणार नाही. पण हाती लागलेल्या वीस-पंचवीस देवळांमुळे किमान जे नाहीसे झाले त्याची कल्पना तरी करू शकतो, हेही नसे थोडके!

हा काळ साधारणपणे दहाव्या ते बाराव्या शतकातला. कलिंजर ही चंदेल्लांची राजधानी. चंदेल्लांच्या समृद्धीच्या काळात बांधल्या गेलेल्या देवळांवर कलाकुसर, शिल्पाकृती जास्त असल्याचे मानले जाते. चंदेल्लांचा राजवटीतील प्रत्येकाचा कालखंड युध्दात गेला असला तरी तलवारीच्या बरोबरीने छिन्नीचाही उत्कर्ष होत राहिला. खजुराहोच्या देवळांच्या निर्मितीचे बरेचसे श्रेय चंदेल्ल राजवंशाच्या राजे यशोवर्मन गंड, त्याचा पुत्र धंगदेव, विद्याधर, मदनमोहन यांना दिले जाते. खजुराहोची ही मंदिरे म्हणजे नागर स्थापत्य शैलीच्या विकासाचा परमोच्च बिंदूच!

साधारणपणे इ.स.सन ५००च्या थोडे आधीपासून भारतात बांधीव दगडी मंदिर स्थापत्याला सुरवात झाली. बाराव्या-तेराव्या शतकात भारतात एकूणच मंदिर स्थापत्यकलेचा उच्चांक झाला. एका विशिष्ट कालखंडात इतक्या मोठया प्रमाणात मंदिरे का बांधली गेली आणि त्यावर इतर अलंकरणासोबतच कामशिल्पे का कोरली जात होती हा कायम संशोधनाचा विषय ठरला आहे. देवळे निर्माण करणारे शिल्पकार समूह कोण होते ? नावे काय, माहीत नाही! ते कसे आखणी करत, रचना मांडत, विषयांची निवड करत, प्रतिकांची दुनिया कुणी त्यांना सांगितली? अंदाज बांधता येतो, पण पक्की माहिती नाही. प्रतिकांचा अन्वयार्थ लावला जातो. देवळे निर्माण करणारे राजे-सचिव यांची नावे माहीत असली तरी कलाकारांची नावे निश्चितच माहीत नाहीत. त्या देवळांच्या उभारणीमागचा नक्की हेतू काय, हे प्रत्येकाने आपलाआपला अंदाज बांधणे आहे. देवळे पाहणाऱ्याच्या दृष्टीची ताकदच जणू निर्माण करणारे कुणीतरी आजमावत असावे, असे वाटते; कारण अपार शक्यतांचे भांडार देवळांवर चित्रित केले गेले आहे. जसे काही कलेची एक लाट काळाच्या पट्ट्यावर उसळली आणि जाता जाता आपले अस्तित्व सोडून गेली.

खजुराहो मुख्यत: त्यावरील कामशिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. केवळ खजुराहोच नाही तर देवळांवरील कामशिल्पे हा संपूर्ण भारतभर आढळणारा सांस्कृतिक विशेष आहे. हिंदू, बौद्ध, जैन या भारतातील तिन्ही महत्त्वाच्या धर्मपरंपरांच्या देवळांमधून कामशिल्पे आढळतात. ‘काम’ ही ही विसंगती न मानता जीवनाचा अविभाज्य भाग मानून देवळांवर कामशिल्पे चितारली गेली आहेत व अशी शिल्पे भारतीय संस्कृती आणि समाजाचा एक भाग म्हणून देवळांमधून हाताळले गेले आहे हे लक्षात घेतले तर अधिक प्रगल्भतेने खजुराहो सामोरे येते.

पिवळसर, गुलाबी, केशरी अशा विविध रंगांच्या वालुकामय दगडांनी बांधलेली खजुराहोची देवळे कुठल्याही बाह्य घटकांनी न सांधता दगड केवळ एकमेकात अडकवून गुरुत्वीय बलाने तोलली आहेत. तिथल्याच प्रदेशात आढळणारा देवळांच्या बांधकामासाठी वापरलेला दगड इतका मुलायम आणि रंगीत आहे की त्यामुळे ती देवळे संगमरवरी असल्याप्रमाणेच भासतात. प्रकाशानुसार हा दगड रंग बदलतो, चंद्रप्रकाशात धवल शुभ्र होतो. उन्हामध्ये पिवळा, तांबुस होऊन प्रकाशतो. दिवसभर देवळांच्या प्रांगणात फिरून संध्याकाळ होताना सभोवार नजर टाकावी तर खजुराहो गाव आणि देवळे एकमेकांपासून हजारो योजने दूर भासतात. खजुराहोच्या देवळातल्या कामशिल्पांचे कोडे मनात घेऊन देवळाला पाठमोरी अशी मी हात पाठीमागे एकमेकांत अडकवून उभी असते तर समोर क्षितीजावर सांजवणारे लाल सूर्यबिंब टेकलेले असते. माझ्यासारखेच प्रश्र्नांकित. म्हणते, ‘उत्तर चंद्राकडे असेल कदाचित!’

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत