Headlines

Lavani Eligibility Certificate: लावणीचं लावण्य टिकवण्यासाठी… – state govt recently issued order eligibility certificate mandatory for lavani performances in maharashtra



-भूषण कोरगांवकर

महाराष्ट्रातली एक मोठी लोककला म्हणजे लावणी. लावणीत सगळे रस असतात, अनेक विषय असतात, आणि तरीही शृंगार हा तिचा महत्त्वाचा रस. लावणी भारतातल्या अशा मोजक्या कलांपैकी एक आहे, जिने शेकडो वर्षांपासून आपल्यातला मोकळाढाकळा शृंगार टिकवून ठेवला आहे. पारंपरिक लावणीत शृंगारातले अनेक विषय धीटपणे, थेटपणे आणि कलात्मकरीत्या हाताळले गेलेत. सेक्सची इच्छा, रोमँटिक प्रेम ही आपली एक महत्त्वाची गरज. लावणीसारख्या कला तिला एक उत्तम अभिव्यक्ती देऊ शकतात. पण तिचा आस्वाद घेण्यापेक्षा, एक समाज म्हणून या इच्छांना दाबून ठेवण्यात, लपवून ठेवण्यात आपण गर्क झालो. दाबून ठेवलेल्या गोष्टींचा ठराविक मर्यादेनंतर भडका उडतो. लावणीचंही आज काहीसं असंच होऊ घातलंय.

डीजेवरचे नाच

‘लावणीच्या नावाखाली तोकड्या कपड्यातल्या मुलींचा डीजेच्या तालावर हैदोस’

‘xxx यांची डीजे लावणी पहायला गेलेल्या लोकांच्या गर्दीत एकाचा चेंगरून मृत्यू’

‘डीजेवरच्या अश्लील नृत्यांमुळे झाला महाराष्ट्राचा बिहार’

अशा प्रकारच्या बातम्या गेल्या तीन वर्षांपासून सतत येत असतात. विशेषत: श्रावणापासून त्यांचं प्रमाण वाढतं. कारण नागपंचमी, दहीहंडीपासून जे सणांच्या निमित्ताने जाहीर आणि खासगी कार्यक्रम सुरू होतात ते पार दिवाळी आणि नंतर २१ डिसेंबरपर्यंत सुरूच असतात. बहुसंख्य ठिकाणी ‘सांस्कृतिक मनोरंजना’च्या नावाखाली नऊवार साडीसारखं काहीतरी गुंडाळून, उघड्या पाठीचे-खोल घळीचे ब्लाऊज घालून, कधी कधी उत्तर भारतीय किंवा पाश्चात्य स्टाईलचे कपडे घालून, केस मोकळे सोडून, १६ ते जास्तीत जास्त ३० या वयोगटातल्या मुली बेभान नाचत असतात. लावणीची शान असलेले वजनदार, मोठे घुंगरू सोडा, पण साधे लहान घुंगरूही कुणी घातलेले नसतात. यातले अनेक कार्यक्रम राजकीय पक्षांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी ठेवलेले असतात. कधी कधी नाचताना या मुली स्वतःवर पाणी ओतून घेतात, कधी अंगावरची ओढणी, गजऱ्यातली फुलं किंवा तत्सम काही प्रेक्षकांत फेकून मारतात, तर कधी प्रेक्षकांतल्या एखाद्या महिलेला, लहान मुलाला किंवा पुरुषाला स्टेजवर बोलावून त्यांना नाचवतात. हे सगळे प्रकार आपल्या संस्कृतीशी फारकत घेणारे, अश्लील आणि आक्षेपार्ह आहेत असं मानून महाराष्ट्र सरकारचे योग्यता प्रमाणपत्र, डीजेला बंदी आणि लावणीसाठी पारंपरिक वाद्यंच वापरण्याचे, आवाहन असे तीन नियम येऊ घातले आहेत.

योग्यता प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय?

महाराष्ट्रात नाटकांसाठी ‘योग्यता प्रमाणपत्र’ अर्थात ‘सेन्सॉर सर्टिफिकेट’ अनेक वर्षांपासून गरजेचं आहे. सार्वजनिक प्रयोगांच्या आधी नाटकाची संपूर्ण संहिता रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाकडे पाठवावी लागते. त्यांच्या समितीकडून तिचं परीक्षण होऊन, प्रसंगी काटछाट करून ‘प्रौढांसाठी’ किंवा ‘सर्वांसाठी’ असं प्रमाणपत्र देण्यात येतं. नृत्याचे कार्यक्रम, संगीत, ऑर्केस्ट्रा, मेळे इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांना रीतसर संहिता नसल्यामुळे त्यांची या नियमांमधून सुटका झाली होती. पण नवीन नियमांनुसार या सर्वांसाठी हे प्रमाणपत्र आता बंधनकारक होणार आहे. निवेदनाची संहिता, ती नसल्यास कार्यक्रमाची माहिती, किंवा सारांश हे आता परीनिरीक्षण मंडळाकडे पाठवावं लागणार आहे.या निर्णयाचं झाडून सर्व पारंपरिक आणि व्यावसायिक लावणी कलाकारांनी स्वागत केलं आहे. परंतु त्यांना काही प्रश्नही पडलेत.

‘चांगला विचार आहे सरकारचा. आणि सारांश वगैरे ठीकच आहे,’ ज्येष्ठ लावणी कलाकार मीराबाई पुणेकर म्हणतात, ‘पण वेशभूषा, घुंगरू, हावभाव हे सगळं कोण, कसं आणि किती तपासत बसणार? काय बरोबर, काय चूक हे कोण ठरवणार? आणि कसं?’ प्रश्न रास्त आहेत. हा विषय इतका सोपा, सरळ नाहीच. अश्लीलता कोणी आणि कशी ठरवायची? शिवाय डीजे बंदी आणि पारंपरिक वाद्यांची सक्ती या कलाकारांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्याबद्दल शासनाचं धोरण नेमकं काय आहे हे अजून पुरेसं स्पष्ट झालेलं नाही.

डीजे बंदी आणि पारंपरिक वाद्यांची सक्ती

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात संगीत बारीची जवळपास पन्नासहून अधिक शासनमान्य कला केंद्रं आहेत. या प्रत्येक कला केंद्रांमधून तीन ते १० पार्ट्या असतात. प्रत्येक पार्टीच्या दोन-तीन मालकिणी असतात. शिवाय इतर आठ-नऊ मुली, साथीदार आणि सोंगाडे असे मिळून जवळपास पंधरा कलाकार एका पार्टीत असतात. पायपेटी, तबला, ढोलकी (आणि आजकाल ढोलक) अशी तीन-चार वाद्यंच इथे वापरली जातात. त्यांच्या जोडीला मुली वजनदार घुंगरू घालून गातात आणि नाचतात. जे पैसे मिळतात ते या सर्व पंधरा कलाकारांमध्ये आणि कला केंद्राच्या मालकामध्ये वाटून घेतले जातात. नाव न छापण्याच्या अटीवर एका पार्टी मालकिणीने बोलून दाखवलं – ‘साथीदारांचे लई नखरे असतात. बैठक लागली तर लगेच यायचं सोडून उगाच टाइमपास करत बसतील. शिवाय दारू, तंबाखू – काही विचारू नका.’

साथीदार ही अत्यंत कसलेली कलाकार जात. पण त्यांची नवीन पिढी या क्षेत्रात यायला बघत नाही. मागणीपेक्षा पुरवठा कमी. त्यामुळे मागणीच कमी करायची असा विचार पार्टी मालकिणी आणि थिएटर मालकांच्या मनात आला तर त्यात काय नवल! इथूनच सुरू झाली डीजे पद्धत. तुमच्या आवडीची गाणी झटदिशी लागतात. पैशाचे वाटेकरीही कमी.

‘कलेला आजकाल कोण विचारतं? नाचणाऱ्या मुली दिसल्या की पब्लिक खुश.’

हेच नेमकं बाहेरच्या कार्यक्रमांतही सुरू झालं. तिकडे तर डीजेमुळे रीमिक्सचंही पेव फुटलं. लावणी, मुजरा, बॉलिवूड, वेस्टर्न अशा सर्व प्रकारांचं मिश्रण करून तिथल्या कार्यक्रमांत नाचाची एक नवीनच स्टाइल जन्माला आली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हे नाच सुरू झाले. त्यांची रील्स व्हायरल झाली आणि संस्कृती-रक्षकांच्या नजरेत खुपू लागली.

जयपूर मुजरा – एक केस स्टडी

उत्तर भारतातल्या अनेक शहरांप्रमाणे जयपूरच्या चाँदपोल इलाख्यात अनेक वर्षांपासून मुजरे चालायचे. पण गेल्या आठ-दहा वर्षांपासून इथे डीजेवरचा नाचच सुरू आहे. रानी खान या ७० वर्षांच्या तवायफ बाई इथला एक कोठा चालवतात. जुन्या आठवणी जाग्या करत त्या म्हणाल्या, ‘आमच्या जवानीत आम्हाला साथीदारांच्या अडेलतट्टूपणाचा राग यायचा. त्यांच्या पैशाच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. त्यामुळे डीजे पद्धत सुरू झाली तेव्हा मला खूप बरं वाटलं होतं. पण आज इतक्या वर्षानी समजतंय, नुसत्या नाचात काही राम नाही – जो रौनक साजिंदोके बजाने मे और हमारे गाने मे थी वो इस मशीनमे कहा? मशीनसे तो सिर्फ पैसा छपता है.’

शकीला बानो या दुसऱ्या एका मालकिणीलाही हीच खंत वाटते की त्या काळात पुरुष साथीदारांनी आपली मिजास थोडी कमी केली असती तर चित्र कदाचित वेगळं असतं. ‘लेकीन और एक बात है,’ त्या म्हणतात, ‘लोगोंको आजकल ये डीजे ही पसंद है. उनकी भी यही डिमांड है. हमे जिंदा रहना है तो यही करना पडेगा.’

लोकांची बदललेली अभिरुची हाच खरा मूळ प्रश्न आहे. तुमच्याआमच्यासारख्या मूठभर लोकांना आणि पारंपरिक कलाकारांना डीजेवरचा धांगडधिंगा आवडत नसला तरी बहुसंख्य लोकांना तो खूप आवडतोय ही वस्तुस्थिती आहे. दाबून ठेवलेल्या गोष्टींचा भडका उडतोय. पारंपरिक लावणी जास्त उरलीच नाही, मग तिची गोडी लागणार कशी? तिच्यातली सुंदर अभिव्यक्ती खुलणार कशी? ठेहराव आणि नजाकत, जी समाजातूनच गायब होत चाललीये ती लावणीत तरी उरणार कशी? लावणी, तमाशासारख्या लोककलांच्या बाबतीत जे लोकांना आवडतं तेच टिकून राहतं हा नियम आहे.. जो गेली वर्षानुवर्ष सिद्ध होत आलाय. मग बंदी आणून काय साध्य होणार?

बंदीचा इतिहास

जेव्हा एखाद्या गोष्टीवर बंदी घातली जाते तेव्हा दोन गोष्टी संभवतात – एक म्हणजे, ज्यावर बंदी येऊ घातलीये अशी प्रत्येक गोष्ट तेवढा काळ प्रचंड लोकप्रिय होते. बंदी आलीच तर ती अवैध मार्गाने मिळवण्याचे प्रयत्न सुरू होतात. दुसरं म्हणजे बंदी हे फार खतरनाक हत्यार आहे. दिसताना एखाद्या छोट्याशा छिन्नीसारखं दिसलं तरी प्रत्यक्षात ते एखाद्या मोठ्या बुलडोझरसारखं असतं. ज्याच्यावर बंदी घातली तीच गोष्ट नाही तर तिच्या आसपासच्या सर्व गोष्टींचा, किंबहुना जे समोर येईल त्याचा ते खातमा करत सुटतं. ज्यावर बंदी घातली त्याचा काळा बाजार सुरू होतो. दारू, ड्रग्स, वेश्याव्यवसायातली दलाली यांच्यावरच्या बंदीचे दाखले तर आहेतच. त्यामुळे बंदी हा काही कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही. मग यावर ठोस उपाय काय ?

प्रशिक्षण आणि प्रतिष्ठा

‘खरं तर हे दोनच उपाय आहेत,’ अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी म्हणते, ‘बंदी ही लादलेली नाही, तर आतून आली पाहिजे. लोकांनाच कसदार कलेची ओढ वाटली पाहिजे. ती पेश करणारे ताकदीचे कलाकार तयार झाले पाहिजेत. चित्रपट, नाटक, दृश्यकला सगळ्याच बाबतीत आपल्या समाजाला कलेच्या रसास्वादाच्या प्रशिक्षणाची गरज आहे. तशी सवय लहानपणापासूनच लागायला हवी. आपल्या राजकारण्यांनाही या प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. त्याचबरोबरीने तरुण कलाकारांना कलेमधलं प्रशिक्षण मिळालं पाहिजे. कलेचे सगळे पैलू माहीत झाले पाहिजेत. पण त्याहून जास्त महत्त्वाची आहे ती प्रतिष्ठा!’

खरोखरीच, सामाजिक प्रतिष्ठेपासून लावणीसारख्या कला आणि कलावंत शतकानुशतकं दूरच राहिलेत. आणि प्रेक्षकांची अभिरुची घडवण्याचे प्रयत्न तर आपल्याकडे फारसे झालेलेच नाहीत. मुलांना साधं लैंगिक शिक्षण देण्याची लाज वाटणारा आणि त्यासाठी कारणं शोधणारा आपला समाज. कला आणि कलेची अभिरुची या तर खूपच दूरच्या गोष्टी झाल्या. पण हे करायची आज खरंच वेळ आली आहे. कारण आयुर्वेदात मानतात तसं रोग मुळापासून घालवायचा असेल तर असे मूलभूत उपाय झालेच पाहिजेत. नाही तर मग बंदी, प्रमाणपत्रांसारखे तातडीचे उपाय केले जाणार. ते कितीही वरवरचे आणि तात्पुरते असले तरीही. सरकारने तात्पुरतं पाऊल उचलून सुरुवात तर केली आहे; पण मूलभूत पाऊल उचलायची त्यांची आणि मुख्य म्हणजे एक समाज म्हणून आपली तयारी आहे का?

लावणीचं लावण्य

भजन, कीर्तन, ओव्या, पोवाडे यांच्यासारखीच लावणी ही सुद्धा आपली संस्कृती आहे. तिला सुरुवातीपासून तिचं योग्य स्थान आणि मान मिळाला असता तर आपलं सांस्कृतिक, भावनिक, सामाजिक जीवन अधिक समृद्ध झालं असतं. पण अजूनही वेळ पूर्णपणे गेलेली नाही. पारंपारिक लावणीमधलं लावण्य, तो ठेहराव, ती नजाकत अजूनही थोडीफार शिल्लक आहे. त्याला उत्तेजन देऊन ते बहरू द्यायचं की डीजेवरचे उत्तान, एकसुरी नाच बघायचे हे एक रसिक म्हणून आपल्याही हातात आहे.

(लेखक लावणी व लोककलांचे अभ्यासक आहेत.)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत