Headlines

सपकाळांची प्रेस सुरू असताना राष्ट्रवादीचा राडा:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले- गुंगी गुडिया ही शिवी नाही, सुनेत्रा पवारांनी स्वतःला 'दुर्गा' सिद्ध करावं




काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेवरून सुरू असलेला राजकीय वाद आणखी चिघळला आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत या शब्दाचे ठामपणे समर्थन केले आहे. “गुंगी गुडिया हा अपशब्द नसून त्यांच्या मुकेपणाचे ते वर्णन आहे. सुनेत्रा पवारांनी आमच्या टीकेला सकारात्मक घेत इंदिरा गांधींप्रमाणे स्वतःला ‘दुर्गा’ सिद्ध करून दाखवावे,” असे थेट आव्हान सपकाळ यांनी दिले आहे. सपकाळ यांची ही पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन केले. ‘धनंजय मुंडेंची ओळख लोकप्रतिनिधीपेक्षा गुंड म्हणून जास्त’ बीडमधील व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत हर्षवर्धन सपकाळ यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. “पत्रकारांनी आणि नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना लोकप्रतिनिधींनी उत्तरे दिली पाहिजेत. मात्र, महाराष्ट्रात ज्यांची ओळख एका लोकप्रतिनिधीपेक्षा ‘गुंड’ म्हणून अधिक आहे, ते धनंजय मुंडे पत्रकारांना गप्प बसायला सांगत आहेत. मुंडे पत्रकारांना चुप करत असताना बाजूलाच बसलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मात्र एक शब्दही बोलल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसने वापरलेला ‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग अतिशय योग्य आहे,” असा दावा सपकाळ यांनी केला. काँग्रेसने केलेली पोस्ट.. उपमुख्यमंत्र्यांच्या मौनावर उपस्थित केले प्रश्न सुनेत्रा पवार अनेक महत्त्वाच्या विषयांवर मौन बाळगून आहेत, याकडे लक्ष वेधत सपकाळ म्हणाले, “गुंगी गुडिया ही कोणतीही शिवी नाही, ते त्यांच्या भूमिकेचे वर्णन आहे. अजित पवारांच्या अपघातावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, पण त्या काही बोलत नाहीत. अद्याप त्यांना अर्थखाते मिळालेले नाही, त्यावरही त्या गप्प आहेत. त्यांनी जो हा मुकेपणा आणला आहे, तो उपमुख्यमंत्री पदाला अशोभनीय आहे.” इंदिरा गांधींचा दाखला आणि ‘दुर्गा’ होण्याचे आव्हान यावेळी सपकाळ यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा दाखला दिला. ते म्हणाले, “एका काळात इंदिरा गांधींनाही ‘गुंगी गुडिया’ म्हटले गेले होते. पण त्यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःला असे सिद्ध केले की, अटल बिहारी वाजपेयींसारख्या नेत्यालाही त्यांना ‘दुर्गा’ म्हणावे लागले. आज आम्हीही सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटले आहे, आता त्यांनीही आपण दुर्गा असल्याचे सिद्ध करावे.” यासाठी सपकाळ यांनी काही अटी ठेवल्या आहेत. “सुनेत्रा पवारांनी तातडीने स्वतःकडे अर्थखाते घ्यावे, अपघाताचा शोध लावेपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका घ्यावी, ‘लाडकी बहीण’ योजनेचे अनुदान १५०० वरून २१०० रुपये करावे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय तातडीने घ्यावा. त्यांनी हे धाडसी निर्णय घेतल्यास आमचा आरोप चुकीचा ठरेल आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ‘दुर्गा’ म्हटल्याशिवाय राहणार नाही,” असे सपकाळ म्हणाले. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा गोंधळ दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेतच मोठा हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयात धडक दिली. सुनेत्रा पवारांवरील आक्षेपार्ह टीकेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हेही वाचा.. माझ्याकडे मंत्रिपद नाही, तरीही मला हुकूमशहा ठरवलं जातंय:धनंजय मुंडेंचा पलटवार, म्हणाले- काही लोकांना जातीय राजकारणच करायचे आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेतील गोंधळावर आमदार धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘काँग्रेसच्या मनात सुनेत्रा वहिनींबद्दल किती द्वेष आहे, हे त्यांच्या अधिकृत पेजवरून केलेल्या टीकेवरून दिसून येते,’ असा घणाघात त्यांनी केला. तसेच, आपण केवळ आमदार असतानाही आपल्याला हुकूमशहा ठरवले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सविस्तर वाचा सुनेत्रा पवारांना ‘गुंगी-गुडिया’ म्हणणं कसली भाषा?:पृथ्वीराज चव्हाणांना हे योग्य वाटते का? अंजली दमानियांचा काँग्रेसवर हल्लाबोल बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेल्या एका घटनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून धनंजय मुंडे यांनी रोखल्याच्या घटनेनंतर काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करत त्यांना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले. मात्र, काँग्रेसच्या या शब्दप्रयोगावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत