Headlines

Indian Railway: कन्फर्म तिकिटांसाठी बनावट VIP मार्ग; लोकभवनाच्या खोट्या शिक्क्यांचा वापर, सूत्रधारासह 3 रेल्वे एजंट अटकेत


Railway Ticket Fraud: या प्रकरणात आणखी एजंट, मध्यस्थ तसेच सरकारी किंवा रेल्वे विभागातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरू आहे.

indian railway
भारतीय रेल्वे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई: रेल्वेची तिकिटे आपत्कालीन अर्थात ‘व्हीआयपी’ कोट्यातून कन्फर्म करण्यासाठी राज्यपाल आणि लोकभवनाच्या नावाने बनावट लेटरहेड, बनावट सही आणि खोट्या शिक्क्यांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारे प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळवून देऊन जादा पैसे उकळणाऱ्या टोळीचा मलबार हिल पोलिसांनी पर्दाफाश केला असून, सूत्रधार आणि तीन रेल्वे एजंटना अटक करण्यात आली आहे.

राजभवनात सन २०१४पासून कार्यरत असलेले सहायक विशाल शिंदे यांना रेल्वेच्या शिफारसपत्रांच्या पडताळणीदरम्यान विसंगती आढळल्यानंतर हा प्रकार समोर आला. राज्यपालांच्या अधिकृत प्रवासाबाबत समन्वय साधणे, दौऱ्यांदरम्यान कुटुंबीयांना मदत करणे, तसेच लोकभवनातील कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन कोट्यातील तिकिटांकरिता रेल्वेकडे पत्रव्यवहार करणे, या जबाबदाऱ्या शिंदे यांच्याकडे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra TimesNCMC Card: एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी प्रवाशांची कसरत, महामंडळाकडून नागरिकांना दिलासा; नोंदणीसाठी एका महिन्याची मुदतवाढ
६ फेब्रुवारी, २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांच्या कार्यालयाने दोन शिफारसपत्रांच्या पडताळणीसाठी लोकभवनाशी संपर्क साधला. छाननीदरम्यान या पत्रांवर राज्यपालांचे तत्कालीन वैयक्तिक सहायक अभयसिंह देशमुख यांच्या बनावट सह्या असल्याचे, मजकूर बनावट असल्याचे आणि शिक्काही खोटा असल्याचे स्पष्ट झाले. देशमुख यांनी अशी कोणतीही पत्रे पाठविली नव्हती किंवा त्यावर सही केलेली नव्हती. त्यामुळे ही दोन्ही पत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत तक्रार आल्यानंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाइल क्रमांकांचा तपशील, पत्रव्यवहार आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. अमरीश ठक्कर हा या रॅकेटचा सूत्रधार असल्याची माहिती असून, इतर तीन आरोपी रेल्वे तिकीट एजंट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra TimesIIT Mumbai Student Death: आयआयटी मुंबईत 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन; वसतिगृहात खळबळ, कारण अस्पष्ट
रॅकेटची व्याप्ती वाढण्याची शक्यता
बनावट कागदपत्रांचा वापर लोकमान्य टिळक टर्मिनस-राजगीर एक्स्प्रेस, छपरा एक्स्प्रेससह इतर गाड्यांमध्ये थर्ड एसी बर्थ कन्फर्म करण्यासाठी केला जात होता. पत्रांमध्ये नमूद केलेले मोबाइल क्रमांकही बनावट असल्याचे तपासात आढळले आहे. हा गैरप्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा संशय पोलिसांना आहे. तपास पुढे सरकत असताना या रॅकेटची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा