Mumbai Viral Video: एका विदेशी महिलेनं रात्री एकटी फिरताना मुंबईत सुरक्षित वाटल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी तिचे आभार मानत आहेत. लोक म्हणताहेत, सततची वर्दळ, सार्वजनिक वाहतूक, सतर्क पोलीस यंत्रणा आणि मदतीला धावून येणारे नागरिक यामुळे अनेकांना हे शहर तुलनेने सुरक्षित वाटतं.

महिला काय म्हणाली?
हा व्हिडिओ spicygori या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही एका विदेशी महिलेला पाहू शकता. ती रात्री दहाच्या सुमारास मुंबईच्या रस्त्यांवर व्लॉगिंग करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ती पूर्णपणे एकटी आहे. तिच्यासोबत इतर कोणीही नाही. खरं तर ही गोष्ट मुंबईकरांसाठी सामान्य आहे. कारण मुंबईत रात्री १२-१ वाजताही महिला सुरक्षितपणे प्रवास करतात. मात्र, विदेशी असल्यामुळे या महिलेला याचं विशेष आश्चर्य वाटलं. कारण असा अनुभव तिला देशातील इतर शहरांमध्ये आला नव्हता. त्यामुळे ती मुंबईतील सुरक्षित वातावरणाचं भरभरून कौतुक करत आहे.
महिलांना मुंबईत सुरक्षित का वाटतं?
हा व्हिडिओ ९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेक मुंबईकरांनी तिचे आभार मानले आहेत. काही जण म्हणतात, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असल्यामुळे येथे महिलांचा सन्मान केला जातो. तर काही जण याचं श्रेय मुंबईच्या स्पिरिटला देतात.
असो, लोकांच्या प्रतिक्रियांचा भाग बाजूला ठेवला तर मुंबई हे तुलनेने सुरक्षित शहर मानलं जातं. काही अपवादात्मक घटना वगळता, महिलांना प्रवास करताना फारशी भीती वाटत नाही. कारण हे शहर कधीच झोपत नाही. दिवसाचे २४ तास वर्दळ असते. शिवाय सार्वजनिक वाहतूक सातत्याने उपलब्ध असते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो. त्याचबरोबर मुंबई पोलीसही गुन्हेगारी रोखण्यासाठी कायम सतर्क असतात. आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अस्सल मुंबईकर गरजूंच्या मदतीसाठी तत्काळ धावून जातात. कुठे अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाजही उठवतात. त्यामुळे अनेक महिलांना मुंबई तुलनेने सुरक्षित वाटते.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

