घर, फ्लॅट किंवा अपार्टमेंट खरेदी एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. गृहकर्जाचे दीर्घकालीन हप्ते संपल्यावर प्रत्येकाला दिलासा मिळतो, पण होम लोनची परतफेड केल्यावर मालमत्तेची मालकी आपल्याला मिळते असा अनेकांचा समाज असतो. होम लोनचा शेवटचा हप्ता भरला की आता घराची मालकी आपली आहे असं गृहीत धरून निवांत बसणे तुमची मोठी चूक ठरू शकते.
गृहकर्ज फेडल्यावर बँकेकडून घ्यायची कागदपत्रे
गृहकर्जाचा शेवटचा हप्ता भरल्यानंतर तुमचे कर्ज ऑफिशिअली बंद झाले आहे याची पडताळणी करण्यासाठी तुमच्याकडे बँकेची काही महत्त्वाची कागदपत्रे पाहिजे. याशिवाय तुम्ही सगळ्या आर्थिक नोंदीही अपडेट केल्या पाहिजे, जे वेळेवर न केल्यास घर विकताना, नवीन कर्ज मिळवताना किंवा मालमत्तेची मालकी सिद्ध करताना समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेकडून कोणती महत्त्वाची कागदपत्रे मिळवली पाहिजे पाहूया.
प्रॉपर्टीची मूळ कागदपत्रे
गृहकर्जाचा शेवटचा हप्ता भरल्यानंतर सर्वप्रथम बँकेकडून मालमत्तेची सर्व मूळ कागदपत्रे – Sale Deed, मालकी हक्कपत्र, वाटप पत्र, बिल्डर-खरेदीदार करार, ताबा पत्र, मंजूर बांधकाम आराखडे आणि इतर संबंधित – मिळवा.
- होम लोन क्लोजर
गृहकर्ज फेडल्यानंतर बँकेकडून लोन क्लोजर सर्टिफिकेट किंवा नो ड्यूज सर्टिफिकेट (NDC) मिळवण्याची खात्री करा. या पत्रातून तुमचे गृहकर्ज पूर्णपणे फेडले गेले आहे, बँकेची तुमच्याकडून कोणतीही थकबाकी नाही आणि मालमत्तेवर बँकेचा कोणताही हक्क राहिलेला नाही, याची खात्री पटते. या प्रमाणपत्राची एक छापील प्रत आणि एक डिजिटल प्रत दोन्ही जपून ठेवा.
- ना हरकत प्रमाणपत्र
तुमचे गृहकर्ज फेडल्यानंतर बँकेकडून NOC नक्की घ्या, जो बँकेने तुमच्या मालमत्तेवरील हक्क सोडून दिला आणि त्यावर बँकेचे कोणतेही अधिकार किंवा थकबाकी राहिलेले नाही याचा पुरावा आहे. यामुळे तुमचे घर विकणे, नवीन कर्ज मिळवणे किंवा नंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया करणे सोपे होईल.
- मॉर्गेज/चार्ज काढल्याची खात्री करा
तुमच्या कर्जाचे हप्ते फेडल्यानंतर बँकेने तुमच्या मालमत्तेवरील मॉर्गेज, भार किंवा धारणाधिकार अधिकृत काढून टाकला आहे का, हेही तपासा. बऱ्याच प्रकरणांमध्ये यामध्ये संबंधित सरकारी नोंदी अपडेट करणेही गरजेचे असते. याबाबत प्रत्येक राज्यातील प्रक्रिया वेगवेगळी असू शकते, त्यामुळे कृपया तुमच्या बँक किंवा नोंदणी प्राधिकरणाकडून याची खात्री करून घ्या.
- मालमत्तेच्या नोंदी अपडेट करायची आवश्यक कागदपत्रे
काही राज्यांमध्ये गृहकर्ज बंद झाल्यानंतर जमीन किंवा मालमत्तेच्या नोंदींमधून बँकेचा चार्ज काढून टाकण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामुळे या प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याचीही बँकेला विचारणा करा, ज्यामुळे सरकारी नोंदी अपडेट झाल्याची खात्री होईल.
- अंतिम कर्ज विवरण
बँकेकडून अंतिम कर्ज विवरण मिळवण्याची खात्री करा, ज्यामध्ये त्यात कर्ज खाते क्रमांक, एकूण गृहकर्जाची रक्कम, ईएमआयची नोंद, शून्य शिल्लक आणि कर्ज बंद होण्याची तारीख नमूद असेल. हे दस्तऐवज नंतर टॅक्स आकारणीच्या उद्देशाने उपयुक्त ठरू शकते.
ECS/NACH किंवा ऑटो-डेबिट बंद केले असल्याची खात्री करा.
तुम्ही तुमच्या गृहकर्जाच्या हप्त्यांसाठी ECS, NACH, ऑटो-डेबिट किंवा पोस्ट-डेटेड चेक वापरले असतील, तर बँकेकडून रद्द झाल्याची लेखी पुष्टी करून घ्या. यामुळे भविष्यात तुमच्या खात्यातून अनवधानाने होणारी कोणतीही कपात टाळता येईल.

