Headlines

Hemant Patil Claim That 100 Police Raid on Shiv Sena MLA Santosh Bangar House


हिंगोली जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे आक्रमक आमदार संतोष बांगर यांच्या घरावर आज पहाटे 100 पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे हिंगोलीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Santosh Bangar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हिंगोली : नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंगोली जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचे आमदार एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसत आहेत. असं असतानाच आज कळमनुरी येथे मोठी घडामोड घडली आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी पोलिसांनी धाड टाकल्याचा दावा शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे. बांगर यांच्या घराची तब्बल 100 पोलिसांनी झाडाझडती केल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली आहे. हेमंत पाटील हे हिंगोलीचे माजी खासदार आहेत. तसेच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख आहेत. त्यांनी आज एका वृत्तवाहिनीला माहिती देताना संतोष बांगर यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकल्याचा दावा केला आहे.

“हिंगोली आणि कळमनुरी या दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेची ताकद आहे. दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष होणार आहेत. कार्यकर्ते अत्यंत उत्तम पद्धतीने काम करत आहेत. पण समोरच्यांची पायाखालची वाळू घसरायला लागली आहे हे या निवडणुकीच्या निमित्ताने लक्षात आलं आहे”, असं हेमंत पाटील म्हणाले.

“आमदार संतोष बांगर यांच्या घरावरती सकाळी पाच ते साडे पाच वाजता 100 पोलिसांनी जावून झाडाझडती घेतली. त्यांची 75 ते 80 वर्षांची आई आजारी असते. ती घरात असताना, पत्नी, लहान मुलं घरात असताना, अशा पद्धतीने घरातील सामान काढून बघणं, कपाटातील सामान काढून बघणं, हे अतिशय वाईट पद्धतीने झालं आहे”, अशी खंत हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.
Maharashtra Timesसर्वात मोठी बातमी! उज्ज्वला थिटे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, अनगर नगरपंचायतीचा तिढा सुटला
“खरंतर आमदार पद हे संविधानिक पद आहे. त्याला संविधानिक दर्जा आहे. अशा संविधानिक पदाच्या कार्यकर्ता असलेल्या आमदारावर धाड टाकायची असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. त्या पद्धतीची कोणतीही परवानगी पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. मी स्वत: विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, कुठल्याही प्रकारचा मेल आलेला नाही. कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. परवानगी न घेता अशाप्रकारची धाड कुणाच्या सांगण्यावर टाकली?”, असा सवाल हेमंत पाटील यांनी केला.

“इथल्या स्थानिक आमदारांच्या दबावाखाली येऊन इथल्या पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच आम्ही दोन्ही जिल्ह्याचे आमदार या कारवाई संदर्भात बोलण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत”, अशी माहिती हेमंत पाटील यांनी दिली.

“राज्यात आम्ही सत्तेत समान वाटेदार आहोत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. अशावेळेस जो काही स्थानिक आमदाराचा दबाव पोलिसांवर आहे. पोलीस कशाप्रकारे स्थानिक आमदाराच्या दबावात राहून काम करतात, याची माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत”, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.
Maharashtra Timesमोदी सरकारकडून महाराष्ट्राला 2 मोठे गिफ्ट, मुंबई आणि पुणेकरांना थेट मोठा फायदा होणार
“एखाद्या आमदाराच्या घरावर अतिरेक्यासारखी, गुंडासारखी झाडाझडती घेतली जात असतील तर ते कुणालाही सहन होणार नाही. कुणालाही राग येईल. अशावेळेस समोरुन आरोप होत आहेत. त्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. माझी दोघांना विनंती आहे. निवडणूक काही काळापुरता आहे. लोक आपल्याकडे बघत असतात. आपण आपली पातळी न सोडता टीका-टीप्पणी केली पाहिजे. मी संतोष बांगर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणार आहे”, असंदेखील ते म्हणाले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा