Headlines

Harsh Goenkas Cryptic Post Amid Rohit Sharma Retirement Buzz Goes Viral | ‘हा गंभीर विषय आहे’, हर्ष गोएंकांच्या ‘RoKo’ पोस्टमागचा अर्थ काय? रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांना लागलं नवं वळण


India vs England ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिकेच्या निर्णायक सामन्यापूर्वी रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर हर्ष गोएंका यांनी एक सूचक पोस्ट करत क्रिकेटविश्वात खळबळ उडवली. त्यांच्या या पोस्टवरून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याबाबत विविध प्रकारचे अंदाज वर्तवले जात आहेत.

Rohit Sharma Retirement
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकणारा संघ २-१ अशा फरकाने मालिका आपल्या नावावर करेल. परिणामी निर्णायक ठरणाऱ्या या तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्यास सज्ज आहेत.

मात्र, या सामन्याइतकीच चर्चा सध्या रोहित शर्माच्या भवितव्याचीही रंगली आहे. रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. अशातच देशातील प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोएंका यांनी केलेली एक सूचक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. कोणाचंही नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे गौतम गंभीर आणि अजित अगरकर यांच्यावर निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे, रोहित शर्माच्या चाहत्यांनी या पोस्टचं जोरदार स्वागत करत गोएंकांचं कौतुक केलं आहे.

काय म्हणाले गोएंका?

RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी @hvgoenka या एक्स हँडलवर केलेल्या पोस्टने सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी लिहिलं, “रोको भैया! अगर कर रहा है कोई गडबड, ये गंभीर बात है. जो इसको सही रास्ते में लाएगा, उसकी जय जयकार होगी!”

या पोस्टमधील लक्षवेधी बाब म्हणजे, त्यांनी कोणाचंही नाव न घेता अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख केल्याची चर्चा आहे. पण ते कसं? चला, जाणून घेऊया.

RoKo मधील ‘Ro’ म्हणजे रोहित शर्मा, तर ‘Ko’ म्हणजे विराट कोहली. या दोघांच्या जोडीला क्रिकेट चाहत्यांकडून ‘RoKo’ म्हणून ओळखलं जातं.

अगर कर या शब्दांमध्ये अजित अगरकर यांचा उल्लेख असल्याचं म्हटलं जात आहे. ते सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता आहेत. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

गंभीर या शब्दातून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा उल्लेख करण्यात आल्याची चर्चा आहे.

तर पोस्टच्या शेवटी असलेल्या जय जयकार या शब्दांतून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांचा संदर्भ असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित निवृत्त होणार नाही

ही पोस्ट आतापर्यंत १८ हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली असून हजारो नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, त्याच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांना बीसीसीआयने फेटाळून लावलं आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केलं की, रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. तो भारतीय एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य असून संघाच्या योजनांचा भाग आहे. त्यामुळे या सर्व चर्चांदरम्यान आता निर्णायक सामन्यात रोहित शर्मा आपल्या कामगिरीने काय उत्तर देतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा