Bullion Market Crash: जानेवरी 2026 मध्ये उच्चांकी झेप घेतल्यावर सोन्याची किंमत एकट्या जून महिन्यात 12 टक्क्यांनी घसरली आहे. एकेकाळी सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यापासून गुंतवणूकदार आता पळ काढत असून डॉलरच्या सतत मजबुतीमुळे ही घसरण झाली.

‘ऑल-टाइम हाय’वरून सोन्यात 25 टक्के घसरण
मजबूत अमेरिकन डॉलर आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढण्याच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सोन्यातून सातत्याने पैसे काढून घेत आहेत. परिणामी, जून तिमाहीत सोन्याच्या किमतीत गेल्या 10 वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. जानेवारी 2026 उत्तुंग भरारी घेतलेल्या सोन्याची किंमत सध्या 25 टक्क्यांहून जास्त घसरणीच्या दिशेने कूच करत आहे.
चांदीची किंमत निम्म्याने घसरली
इतकेच नाही तर सोन्यासोबत चांदीच्या दरांमध्येही दबाव दिसत आहे. जून तिमाहीत चांदीच्या भावात 17 टक्क्यांहून जास्त घसरण झाली, जी जून 2022 नंतरची ही सर्वात मोठी घसरण ठरली. जानेवारीमध्ये चांदीचा भाव 117 डॉलरपर्यंत पोहोचला होता, पण आता 50% हून जास्त घसरून 57 डॉलरवर कमी झाला आहे.
सोन्याची किंमत घसरण्याचे कारण काय
जागतिक बाजारावर मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण्यामागे दोन प्रमुख करणे आहेत. पहिले म्हणजे इराण युद्धाची भीती कमी होत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हच्या भूमिकेतील बदल सोन्याच्या दरांमधील घसरणीचे दुसरे कारण आहे. आपल्या धोरण बैठकीदरम्यान फेड रिझर्व्हने नजीकच्या भविष्यात व्याजदरात संभाव्य वाढ करण्याचे संकेत दिले आणि सप्टेंबरच्या सुरुवातीलाच व्याजदर वाढतील, असे ट्रेडर्सचे मानणे आहे.
सोन्याच्या घसरणीमागे इराण-अमेरिकेचा हात कसा?
गुरुवारी रात्री इराणने होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये एका जहाजावर हल्ला केला, ज्यामुळे संयुक्त राष्ट्रांची संस्था – आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने – होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांच्या संरक्षणाची आपली मोहीम स्थगित केली, परिणामी अमेरिका-इराण कराराबाबत चिंता पुन्हा वाढली.
त्याचवेळी, अमेरिकेत मे महिन्यातील महागाईचे आकडे जाहीर झाले. वाढत्या ऊर्जा किमतींच्या पार्श्वभूमीवर महागाईचा दर 3 वर्षांत प्रथमच 4.0 टक्के पार पोहोचला. यानंतर फेड रिझर्व्ह यावर्षी तीनदा व्याजदर वाढवण्याची शक्यता वाढली. दरम्यान एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात हाँगकाँगमार्फत होणारी चीनची निव्वळ सोन्याची आयात सुमारे 38% कमी झाली.
चीनमध्येही सोन्याची मागणी घटली
आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत चढ-उतार होताना चीनकडून सोन्याची मागणी कमी होण्याची चिन्हे दिसू लागली. मे महिन्यात हाँगकाँगमार्फत चीनची निव्वळ सोन्याची आयात मागील महिन्याच्या तुलनेत सुमारे 38% कमी झाली आणि एप्रिल महिन्यातील सुमारे 86.7 मेट्रिक टनांवरून मे महिन्यात सुमारे 53.7 मेट्रिक टनांपर्यंत घसरली. अशाप्रकारे जागतिक बाजारात सोन्याची मागणी कमी होत असल्याचे यावरून दिसून येते.
गुंतवणूकदारांनी पुढे काय करायचे
अशा परिस्थितीत, सध्या सोने-चांदीचे गुंतवणूकदार मोठ्या संभ्रमात सापडले असतील की पुढे किमतीत आणखी किती घसरण होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता अमेरिकेतील व्याजदर, डॉलरच्या हालचाली आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर अवलंबून असेल. कारण वरील घटक येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतींची भविष्यातील दिशा ठरवण्यात महत्तवाची भूमिका बजावतील.
(Disclaimer: सोन्या-चांदीमधील गुंतवणु जोखमीच्या अधीन असते, तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या भरवशाच्या आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

