World’d Most Stubborn Man: आजच्या काळात सर जेम्स डायसन यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. सर जेम्स डायसन यांना अब्जाधीश उद्योगपती मानले जाते, पण यशाची गोड चव चाखण्यासाठी त्यांना अनेक आव्हाने आणि नाकारांना सामोरे जावे लागले.

अनोख्या व्हॅक्युम क्लिनरची रचना केली
जेम्स डायसन यांना कदाचित तुम्ही नावाने ओळखत नसाल, पण त्यांच्या उत्पादनाबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. डायसन व्हॅक्यूम क्लीनर त्यांनीच बनवलेले लोकप्रिय उत्पादन आहे. शेकडो कंपन्या व्हॅक्यूम क्लीनर बनवतात, मग डायसन विशेष का? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. या कंपनीने जगातील पहिला बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर बनवला, ज्याच्या पाईपला बॅगशी जोडायची गरज नाही. खुद्द जेम्स डायसन यांनीच या व्हॅक्युम क्लिनरची रचना केली होती. भारतात मारवाडी लोक व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जेम्स डायसन यांना इंग्लंडचे मारवाडी म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सर जेम्स डायसन कोण?
वयाच्या 9व्या वर्षी जेम्स डायसन यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. पण कठोर परिश्रमाशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही, हे लहानपणापासूनच शिकले. बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर विकसित करण्यासाठी त्यांनी 5000 हून अधिक प्रोटोटाइप तयार केले, पण वारंवार त्यांना अपयश आले. पण, अखेरीस त्यांना यश मिळाले आणि जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 15 अब्ज डॉलर्स म्हणजे 1.43 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
एका छोट्या समस्येतून सुचली क्रांतिकारी कल्पना
जेम्स डायसन घरी साफसफाई करत असताना व्हॅक्युम क्लिनर वारंवार बंद पडत होता. अशावेळी बहुतेक लोकं मशीन बाजूला ठेवतात किंवा नवीन विकत घेतात, पण जेम्स यांनी मशीन उघडून पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की समस्या मशीनमध्ये नव्हती. समस्या डस्ट बॅगमध्ये होती. त्याच क्षणी एक विचार चमकला — ‘जर ही बॅगच काढून टाकली तर?’ आणि तिथूनच जन्म झाला एका क्रांतिकारी कल्पनेचा — Bagless Vacuum Cleaner.
5000 हून अधिक प्रोटोटाइपची चाचणी
कल्पना सोपी होती पण, तिचं यश अजिबात नाही. जेम्स यांनी एक-दोन नाही तर वर्षांत तब्बल 5127 प्रोटोटाइप तयार केले आणि टेस्टिंग केले. प्रत्येक वेळा काहीतरी चुकलं, प्रत्येक वेळा अपयश मिळालं, बऱ्याच वेळी लोकांनी हसून घेतलं पण त्यांनी पुन्हा प्रयत्न करून स्वतःला खात्री पटेपर्यंत थांबले नाही. अशाप्रकारे, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी 1983 मध्ये पहिला बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर तयार केला.
डायसन बनला जागतिक ब्रँड
1993 मध्ये त्यांनी जगातील पहिला बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर, DC01 बाजारात आणला, जो बघताच ब्रिटनमधील सर्वाधिक विकला जाणारा व्हॅक्यूम क्लीनर बनला आणि त्यानंतर डायसन यांनी मागे वळून पाहिले नाही. कंपनीने ब्लेडलेस पंखे, एअर प्युरिफायर, हँड ड्रायर आणि प्रीमियम हेअर स्टायलिंग साधनांची श्रेणी बाजारात आणली. हेअर स्टायलिंग साधने अनेक लोकांच्या wishlist बनू लागले. पण यशासोबतच डायसन यांना दुसरीकडे आव्हानांनाही सामोरे जावे लागले. त्यांचे वॉशिंग मशीन आणि इलेक्ट्रिक कारचे प्रकल्प पूर्णपणे अयशस्वी झाले, पण त्यांनी या अपयशांमधून धडा घेतला आणि आज जेम्स डायसन केवळ व्यावसायिक नाही, जेम्स डायसन फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देखील देतात.
बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं अन् संघर्ष सुरू झाला
2 मे 1947 रोजी इंग्लंडमधील नॉरफोक येथील क्रोमर येथे सर जेम्स डायसन यांचा जन्म झाला. काही वर्ष सगळं सुरळीत सुरू होतं, पण वयाच्या 9व्या वर्षी कर्करोगामुळे वडिलांचे छत्र हरपले. या दुःखद घटनेमुळे आयुष्यात संघर्ष सुरू झाला, पण त्यामुळे डायसन स्वावलंबीही बनले. इंग्लंडमधील ग्रेशॅम्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. डायसन एक average विद्यार्थी होते, पण त्यांना डिझाइन आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यात प्रचंड रस होता.

