Headlines

Gatari Amavasya Mutton, Gavran Mutton Recipe


गटारी अमावस्येसाठी बनवा झणझणीत गावरान मटण रस्सा, तोही कांदा-खोबऱ्याचं वाटण न करता.कुकरमध्ये झटपट तयार होणाऱ्या या रेसिपीमध्ये मटणाचा नैसर्गिक रस ग्रेव्हीत छान उतरतो. गरमागरम भाकरी, भात आणि कांद्यासोबत हे मटण नक्कीच तोंडाला पाणी आणेल!

Pressure Cooker Mutton
फोटो सौजन्य :- @Sarita’s Kitchen
गटारी अमावस्या म्हटलं की मटण, भाकरी, कांदा आणि झणझणीत रस्सा यांची आठवण आलीच पाहिजे. पण मटणाची पारंपरिक रेसिपी करताना कांदा-खोबऱ्याचं वाटण तयार करणे, मसाला भाजणे आणि मटण हळूहळू शिजवणे यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे वेळ कमी असेल आणि तरीही घरच्या घरी चविष्ट, झणझणीत आणि गावरान पद्धतीचं मटण बनवायचं असेल, तर ही कुकरमधली पद्धत नक्की करून पाहा. या रेसिपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे कांदा-खोबऱ्याचं वाटण न करता मटण तयार केलं जातं. मटण थेट कुकरमध्ये शिजवण्यापूर्वी त्याचं स्वतःचं पाणी बाहेर येऊ दिलं जातं. त्यामुळे मटणाची चव आणि रस मटणातच न राहता तयार होणाऱ्या ग्रेव्हीतही छान उतरतो.सरिता किचन यांनी ही रेसिपी शेअर केली आहे. (फोटो सौजन्य :- @Sarita’s Kitchen)

साहित्य

साहित्य

एक किलो मध्यम आकाराचे मटणाचे तुकडे घ्या. मटण स्वच्छ धुऊन त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निथळून घ्या.
मॅरिनेशनसाठी
¼ कप कोथिंबीर
२५ ते ३० लसूण पाकळ्या
२ ते ३ हिरव्या मिरच्या
साधारण २ इंच आलं
½ ते १ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
१ चमचा बेडगी मिरची पावडर
१ चमचा धणेपूड
चवीनुसार मीठ
मटण शिजवण्यासाठी
५ ते ६ टेबलस्पून तेल
१ चमचा जिरे
२ तमालपत्र
छोटा तुकडा जावित्री
२ ते ३ हिरव्या वेलच्या
१ इंच दालचिनी
१ मसाला वेलची
१ चक्रफूल
४ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
२ बारीक चिरलेले टोमॅटो
भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर
२ टेबलस्पून मटण मसाला
आवश्यकतेनुसार गरम पाणी

मटण मॅरिनेट करण्याची पद्धत

मटण मॅरिनेट करण्याची पद्धत

सर्वप्रथम कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या आणि आलं मिक्सरमध्ये घ्या. त्यात अगदी थोडं पाणी घालून जाडसर वाटण तयार करा. हे वाटण अगदी बारीक करण्याची गरज नाही.आता स्वच्छ धुऊन निथळलेलं मटण एका मोठ्या भांड्यात घ्या. त्यात तयार केलेलं हिरवं वाटण, हळद, लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, धणेपूड आणि मीठ घाला. सर्व मसाला मटणाच्या प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हाताने मिक्स करा.मटण झाकून साधारण ३० मिनिटांपासून १ तासापर्यंत मुरू द्या. शक्य असल्यास थोडा जास्त वेळ मुरवलं तरी चव आणखी छान येते.

कुकरमध्ये मटण बनवण्याची खास पद्धत

कुकरमध्ये मटण बनवण्याची खास पद्धत

आता साडेतीन लिटरचा कुकर गॅसवर गरम करा. त्यात ५ ते ६ टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यावर जिरे, तमालपत्र, जावित्री, हिरवी वेलची, दालचिनी, मसाला वेलची आणि चक्रफूल घाला.खडे मसाले तेलात थोडे परतले की त्यांचा सुगंध छान येऊ लागतो. आता त्यात चार बारीक चिरलेले कांदे घाला. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या.कांदा फक्त गुलाबी होईपर्यंत परतायचा नाही. तो हलका तांबूस रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे.कारण या रेसिपीमध्ये कांदा-खोबऱ्याचं वाटण केलेलं नाही. त्यामुळे कांदा व्यवस्थित परतल्यामुळेच मटणाला छान रंग, चव आणि गोडसरपणा मिळतो.कांदा तांबूस झाला की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन चिरलेले टोमॅटो घाला. टोमॅटो मऊ होईपर्यंत साधारण ३ ते ४ मिनिटे व्यवस्थित परता.

मटणाची चव रस्स्यात उतरवण्याची ट्रिक

मटणाची चव रस्स्यात उतरवण्याची ट्रिक

आता मॅरिनेट केलेलं मटण कुकरमध्ये घाला. त्यासोबत थोडी जास्त बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. कोथिंबिरीची देठं बारीक चिरून वापरली तर चव आणखी छान लागते.गॅस मोठा ठेवा आणि मटण मसाल्यासोबत ३ ते ४ मिनिटे चांगले परता. मटणावर मसाला व्यवस्थित कोट झाला पाहिजे.आता सर्वात महत्त्वाची पायरी येते. या टप्प्यावर लगेच पाणी घालायचं नाही.गॅस मंद करा आणि कुकरच्या भांड्यावर एक खोलगट ताट ठेवा. त्या ताटात पाणी भरा आणि कुकरवर झाकण ठेवल्यासारखं ते वापरा. मंद ते मध्यम आचेवर मटण साधारण ५ ते ७ मिनिटे शिजू द्या.या प्रक्रियेमुळे मटणाचं स्वतःचं पाणी बाहेर येतं आणि ते वाफ होऊन निघून जात नाही. मटणातील नैसर्गिक रस मसाल्यात मिसळतो. परिणामी तयार होणाऱ्या ग्रेव्हीला मटणाची चव अधिक छान येते.

गटारी अमावस्या मटण

मटण मसाला आणि पाणी घाला

मटण मसाला आणि पाणी घाला

आता मटणात साधारण २ टेबलस्पून मटण मसाला घाला. तुमच्याकडे मटण मसाला नसेल तर घरचा कांदा-लसूण मसाला किंवा थोड्या प्रमाणात गरम मसाला वापरू शकता.ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार गरम पाणी घाला. मात्र कुकरमध्ये मटण करताना किमान साधारण एक कप पाणी असणं आवश्यक आहे, कारण वाफ तयार होण्यासाठी ते गरजेचं असतं.ताटावर ठेवलेलं पाणी गरम झालेलं असेल तर तेच पाणी वापरू शकता. मटण आणि मसाला चांगला मिसळून घ्या आणि त्याला एक उकळी येऊ द्या.उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावा आणि मटण शिजू द्या.

किती शिट्ट्या करायच्या?

किती शिट्ट्या करायच्या?

मटण आधीच मसाल्यासोबत काही वेळ परतून आणि स्वतःच्या पाण्यात शिजवलेलं असल्यामुळे कुकरमध्ये तुलनेने कमी वेळ लागतो. व्हिडिओतील पद्धतीनुसार दोन शिट्ट्यांमध्ये मटण शिजले, मात्र प्रत्येक कुकरची कार्यक्षमता आणि मटणाचा प्रकार वेगळा असल्यामुळे शिट्ट्यांची संख्या ठरलेली नसते.तुमच्या कुकरमध्ये मटण शिजण्यासाठी साधारण जितक्या शिट्ट्या लागतात तितक्याच करा. कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेल्यानंतरच झाकण उघडा.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा