Headlines

Election Commission of India Send Letter to Sunetra Pawar


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र पाठवलं आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या अधिवेशनात पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलांचे कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Sunetra Pawar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र पाठवल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने 27 जुलैला सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 फेब्रुवारीच्या अधिवेशनातले प्रस्ताव सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पत्राद्वारे दिले आहेत. पक्ष घटनेतील बदलांचे कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तथा अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती आणि तशी घोषणा देखील करण्यात आली होती.

निवडणूक आयोगाने काय म्हटलंय?

या अधिवेशानत पक्षाच्या घटनेतील कलम 6, 7, 12, 32 आणि 36 याबाबत राष्ट्रीय कार्यकारिणीने बदल केला होता. त्याबाबतचे कागदपत्रे निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने पत्र पाठवत याबाबत विचारणा केलेली आहे. तसेच पक्षघटनेतील बदलांची कागदपत्रे आणि प्रस्ताव लवकरात लवकर निवडणूक आयोगात सादर करावे, असा आदेश पत्राद्वारे निवडणूक आयोगाने दिला आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का? निवडणूक आयोगाचा सवाल

पक्षाची सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का? असा देखील प्रश्न निवडणूक आयोगाने पत्रात विचारला आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काय खुलासा केला जातो? ते पाहणं महत्त्वाचं आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यावर काय प्रतिक्रिया देतात? तेदेखील पाहणं महत्त्वाचं आहे.

उमेश पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. “पक्षाचा निवडणूक आयोगासोबत सातत्याने पत्र व्यवहार चालू असतो. वेगवगळ्या कारणाने पत्र व्यवहार चालू असतो. हा नियमित पत्र व्यवहाराचा भाग आहे. हा रुटीन प्रशासकीय विषय आहे”, असं उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या घडामोडींची सातत्याने चर्चा होत असते. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान दिलं होतं. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर आक्षेप घेत थेट नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली होती.