अमेरिकेचे अध्यक्ष एका फूड ट्रकमध्ये लपले. त्यानंतर सीक्रेट प्लेनपर्यंत गेले. नेहमीच्या विमानाऐवजी त्यांनी सीक्रेट विमानानं प्रवास केला. यावेळी त्यांचं नियमित वापरातलं विमानही हवेतच होतं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दलची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जुलैमध्ये तुर्कीहून निघताना ट्रम्प यांना एका गुप्त सुरक्षा मोहिमेच्या अंतर्गत त्यांच्या ठरलेल्या विमानातून न नेता दुसऱ्या सैन्य विमानातून नेण्यात आलं होतं. इराणकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेता ट्रम्प यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली. ही योजना अतिशय गुप्त राखण्यात आली. व्हाईट हाऊसमधील बऱ्याच कर्मचाऱ्यांना या योजनेची कल्पना नव्हती.
नाटो शिखर संमेलनासाठी डोनाल्ड ट्रम्प जुलैमध्ये तुर्कीच्या अंकाराला गेले होते. त्यावेळी त्यांच्या दिमतीला कतारनं भेट दिलेलं बोईंग ७४७-८ विमान होतं. या विमानाची निर्मिती भविष्यातील एअर फोर्स वन म्हणून केली गेली आहे. पण तुर्कीहून ब्रिटनला जात असताना सुरक्षेच्या योजनेत अचानक बदल करण्यात आला.
डोनाल्ड ट्रम्प जुन्या एअर फोर्स वन विमानात जाताना दिसले. पण हा केवळ दिखावा होता. प्रत्यक्षात ट्रम्प यांना केटरिंग ट्रकच्या आडून दुसऱ्या विमानापर्यंत पोहोचवण्यात आलं. यानंतर त्यांना सी-३२ ए या सैन्य विमानानं तुर्कीच्या बाहेर नेण्यात आलं. त्याचवेळी जुन्या विमानाचा वापर डिकॉय अर्थात गुंगारा देण्यासाठी करण्यात आला. दोन्ही विमानं काही मिनिटांच्या अंतरानं ब्रिटनला पोहोचली.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या सुरक्षेला इराणकडून धोका असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर सीक्रेट सर्व्हिसनं विमान बदलण्याचा सल्ला दिला. धोक्याची तीव्रता जास्त असलेल्या भागांमधून ट्रम्प यांना घेऊन प्रवास करण्यासाठी नवीन विमान पुरेसं सक्षम नसल्याची शंका अधिकाऱ्यांना होती.
कतारनं डोनाल्ड ट्रम्प यांना भेट दिलेलं विमान अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आहे. पण त्या विमानाच्या सुरक्षा व्यवस्थेवर वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. या विमानाची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्याची गरज अमेरिकेच्या प्रशासनाला वाटते.
ट्रम्प नेमक्या विमानातून तुर्कीतून बाहेर पडत आहेत, हे कोणालाही कळू नये हा या ऑपरेशनचा हेतू होता. ट्रम्प जुन्या विमानातून प्रवास करत असल्याचं भासवण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव हा उपाय करण्यात आल्याचं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा