दादरच्या ‘शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात आमचं नाटक चालू होतं. जवळजवळ हाऊसफुल प्रयोग. नाटक छान रंगलं होतं. अपेक्षित प्रतिसाद मिळत गेला. हशा, टाळ्या, अगदी स्तब्धतासुद्धा.
नाटक सुरू होण्याआधीच ‘कृपया मध्यंतरात कलाकारांना भेटण्यास कुणीही येऊ नये. भेटायचे असल्यास प्रयोग संपल्यावर भेटावे. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.’ – अशी सूचना ध्वनिक्षेपकावरून देऊनसुद्धा इंटरव्हलला काही प्रेक्षक आम्हा कलाकारांना भेटायला आत आलेच. भेटणाऱ्यांशी बोलण्याचे सोपस्कार आटोपून मी मेकअप रूमजवळच्या गच्चीत खाली पार्किंगकडे बघत उभा होतो. चहावाल्या बाळूने प्रेमानं आणून दिलेला चहाचा कप घेतला. (या बाळूला सगळ्या नाटकांमधल्या एकूण एक कलाकारांपैकी – कोणाला नॉर्मल चहा, कोणाला कमी साखरेचा, कोणाला साखरेशिवाय, दुधाशिवाय कोरा, कोणाला कॉफी हे अचूक माहीत असतं.) चहा देताना हळूच नाटकाबद्दल अभिप्रायही तो देतो. तसा त्याने दिला. चहा आणि अभिप्राय. मग म्हणाला, ‘तो मुलगा मघापासून मला विचारतोय, त्यांना भेटलं तर चालेल का? मी म्हटलं, जा बिनधास्त. बोलतील तुझ्याशी.’ बाळूने माझ्या वतीनं ज्या मुलाला हे सांगितलं होतं, तो मग जवळ आला. वीस-बावीस वर्षांचा असावा. ‘दोन मिनिटं आहेत का?’ त्याने बोट वर करून विचारलं. ‘दोनच मिनिटं आहेत.’ दुसरा अंक सुरू होणार होता. मला (चिकटवलेली) मिशी नीट करायची होती, घाम टिपून मेकअप ठाकठीक करायचा होता.
मेकअपमन अशोक वाटच बघत होता. ‘मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो.’ तो फार संकोचाने आणि भिडस्तपणे, बोलू की नको अशा अवस्थेत उभा होता. मी त्याला ‘तुला काय सही हवी आहे का?’ असं विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली. ‘सही नको… म-म-मदत हवी आहे.’ ‘मदत?’ याला पैसेबियसे हवेत की काय? तसं काही मी त्याने मागितल्याबरोबर देणार नव्हतो, पण सवयीनं खिसे चाचपले. नाटकाच्या कपड्यांमध्ये पाकीट ठेवत नाही मी. मेकअपमनकडे दिलेलं असतं. ‘म्हणजे, पैशाची मदत नकोय-’ त्याने मनातलं ओळखल्यासारखं पटकन बोलून टाकलं. ‘तुम्ही ताडोबाचं नाव ऐकलंय ना?’ ‘ताडोबा? म्हणजे वाघांचं वसतिस्थान? अभयारण्य? त्याचं काय?’ ‘मी तिथे असतो.’ ‘कुठे, अभयारण्यात?’ ‘म्हणजे, ताडोबाजवळच्या गावात राहतो.
चंद्रपूर आणि यवतमाळच्या मध्ये.’ ‘बरं.’ ‘तिथे घर आहे माझं.’ काही सेकंद थांबून तो म्हणाला, ‘मी ते कायमचं सोडून आलो आहे.’ ‘हो?’ ‘वडिलांचे मामेभाऊ राहतात शिवडीला. गणाकाका. ते म्हणाले, सध्या राहा इथे.’ ‘हं.’ मग तो मुद्द्यावर आला. ‘शाहीर साबळेंनी तुम्हाला भेटायला सांगितलं.’ मला काही आकलन होईना. ‘शाहीर साबळेंनी?’ ‘माझ्या या काकांचे गुरू ते. शाहीरांच्या पथकात उमेदवारी करायचे हे गणाकाका.’ ‘अरे पण तुला – ’ तिकडून मेकअपमन अशोक खाणाखुणा करत होता ‘लवकर या’ म्हणून. ‘मला नाटकात काम करायचंय. नुसती हौस म्हणून नाही. पोटासाठी. अं-अं- खूप गरज आहे हो. काका काल म्हणाले, फुकट नाही पोसणार. वडिलांना फोन केला होता त्यांनी. मला अंदाज आलाय. मी काही केलं नाही तर ते बाहेर काढतील थोड्या दिवसांनी. ना घर का ना घाट का- असं झालंय माझं. काही खरं नाही आता…’ तो हे भरभर बोलला. त्याचा गळाही दाटून आल्यासारखा वाटला मला.
ताडोबाजवळ घर – घर सोडून इथे मुंबईत – काकांकडे आसरा – शाहीरांच्या ओळखीनं मला भेटायला – नाटकात घेण्याची मागणी – अगतिकता… नेमकं गणित काही उकलेना! पण त्याच्या चेहऱ्यावरची अजिजी पाहून त्याला तिथून जायला सांगणं किंवा आमच्या बॅकस्टेजच्या लोकांना सांगून त्याला हुसकावणंही बरं वाटेना. मी घाईत गेलो तिथून. दुसरा अंक सुरू झाला होता. तो मुलगा गच्चीवरून निघून विंगमध्ये उभा राहिल्याचं पाहिलं. मेकअप ‘टचअप’ करून मी एंट्री घेतली. एका सीननंतर मला स्टेजवरून आत यायचं होतं. शर्ट बदलून पुढल्या सीनसाठी पुन्हा एंट्री घ्यायची होती. मी त्याप्रमाणे ये-जा करत असताना पाहिलं तर तो तिथेच उभा होता. हाताची घडी घालून नाटक पाहत होता. तो माझ्याशी बोलताना पाहिल्यामुळे असेल, पण त्याला कोणी हटकलं नाही. नाटकाचीच (आतली) प्रॉपर्टी असल्यासारखा तो निश्चल, ठाम उभा होता.
मी संवाद म्हणत होतो, (नेहमीसारखा) भूमिका वठवत होतो, इतर पात्रांना प्रतिक्रियाही देत होतो. पण मनात कुठेतरी त्या (विंगमध्ये उभा असलेल्या) मुलाविषयी जाणवत राहिलं होतंच… त्याचा चेहरा, बोलणं…
नाटक संपल्यावर मी आत येऊन पाहिलं तर तो नव्हता. विंगमध्ये नाही, मेकअप रूममध्ये नाही, गच्चीत पाहिलं तर तिथेही नाही. का कोण जाणे, पण मला त्या मुलाची काळजीच वाटू लागली. ‘काही खरं नाही आता’, हे त्याचं वाक्य आठवलं. हा हळवा मुलगा अगदी हतबल झाला तर, निराशेच्या भरात काय करेल? मेकअप काढल्यावर आणि कपडे बदलल्यावर मी आमच्या नाटकाचा व्यवस्थापक बाळ कोचरेकरला गाठलं. त्याला तालमी चालू असलेल्या आगामी नाटकांसंबंधी बित्तंबातमी असायची. कुठल्या नाटकात अशी छोट्या भूमिकेसाठी का होईना – ‘व्हेकन्सी’ असल्याचं काही कळलं तर सांगतो म्हणाला. प्रयोग संपल्यानंतर आवराआवरी करायला लागणाऱ्या पंधरा-वीस मिनिटांत त्या घरून पळून आलेल्या ‘गरजू’ मुलाची बातमी आमच्या नाटकातल्या बऱ्याच जणांना कळली होती. त्यातली ‘अर्जंसी’ आणि गांभीर्यसुद्धा. ‘बघू या’, ‘चौकशी करतो’, ‘कठीण नाही’ अशी आश्वासनं आणि ‘एक-दोन दिवसांत मिळून जाईल. त्या अमक्यातमक्याकडे नक्की.’ असंही बोलण्यात आलं.
घरी निघायला ‘शिवाजी मंदिर नाट्यगृहा’च्या पार्किंगकडच्या पायऱ्या उतरत होतो. बहुतेक प्रेक्षक गेले होते. तुरळक रेंगाळले होते. एक मारुती व्हॅन निघत होती. मला उतरताना बघून गाडीवाले गृहस्थ गाडीतून लगबगीने बाहेर आले. आनंदातिशयाने हस्तांदोलन वगैरे झाल्यावर त्यांनी नाटक फार आवडल्याचं सांगितलं. अभिप्राय दिला. व्हॅनमध्ये त्यांचं कुटुंब बसलं होतं. ‘या ना प्लीज. ओळख करून देतो.’ म्हणाले. त्या सगळ्यांनी खाली उतरण्याऐवजी मीच गाडीकडे गेलो. त्यांनी एकेकाची ओळख करून दिली. पत्नी, सासू, भाऊ, भावाची बायको… मी नमस्कार करत डोकावलो, आणि काही क्षण बघतच राहिलो! मागच्या सीटवर तो मघाचा मुलगा बसला होता. अगदी सरळ, समोर बघत. ‘हा आमचा रोशन. कॉमर्स कॉलेजला आहे, शेवटच्या वर्षाला. अहो, छान पहिल्या रांगेतली तिकिटं होती आमची. हा मधेच उठून मध्यंतरात आत गेला. नाटक आतून बघतो म्हणाला. म्हटलं जा. त्यांना डिस्टर्ब न करता बघ.’ …मी निघालो. दमलो होतो. नाटक करून – आणि बघून!
दोन दिवसांनी त्या गृहस्थांचा मला फोन आला. त्यांनी कुणाकडून तरी नंबर मिळवला होता. ‘… रोशनला नाटकात जायचंय म्हणतो. मी म्हटलं, आधी अभिनय शिकायला कुठल्यातरी क्लासला जा. तुम्हाला काय वाटतं सर?’ ‘त्याला हवं आहे ते करू द्या. – आणि, शिकायची गरज नाही त्याला.’ मी म्हणालो.

