Headlines

Diabetes & Frozen Shoulder Causes, signs, symptoms, Treatment; मधुमेहामुळे खांदा जाम होण्याची कारणे, लक्षणे, संकेत आणि उपाय


मधुमेहाचा परिणाम केवळ हृदय, किडनी किंवा डोळ्यांवर होत नाही, तर सांध्यांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. मधुमेह असलेल्या अनेक रुग्णांना फ्रोझन शोल्डर म्हणजेच खांदा जाम होण्याची समस्या जाणवते. रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास खांद्याच्या सांध्यातील उती कडक होऊन हालचाल कमी होऊ शकते. या लेखात फ्रोझन शोल्डरची सुरुवातीची लक्षणे, मधुमेहाशी असलेला संबंध, आजाराचे टप्पे, फिजिओथेरपीचे महत्त्व आणि आधुनिक उपचार पद्धतींबाबत तज्ज्ञांच्या माहितीनुसार जाणून घेऊया.

diabetic frozen shoulder causes symptoms remedies
diabetic frozen shoulder causes symptoms remedies
मधुमेह म्हटला की, त्याचा संबंध थेट हृदयविकार, किडनीच्या समस्या, डोळ्यांचे आजार किंवा मज्जासंस्थेच्या (Nerves) नुकसानीशी जोडला जातो. परंतु, मधुमेहाचा एक अतिशय सामान्य पण दुर्लक्षित दुष्परिणाम शरीराच्या सांध्यांवर, विशेषतः खांद्यावर होतो. अनेक मधुमेह असलेले रुग्ण खांद्यामध्ये सतत होणाऱ्या वेदना आणि जडपणामुळे त्रस्त असतात, मात्र या दोन्ही समस्यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे याची त्यांना जाणीव नसते. वैद्यकीय भाषेत याला ‘डायबेटिक शोल्डर’ किंवा ‘फ्रोझन शोल्डर’ (Frozen Shoulder) म्हणतात. वेळेवर उपचार न केल्यास ही समस्या दैनंदिन साधी कामे करणेही कठीण करून टाकते.

फ्रोझन शोल्डर म्हणजे काय आणि मधुमेहाशी त्याचा संबंध?

फ्रोझन शोल्डर म्हणजे काय आणि मधुमेहाशी त्याचा संबंध?

फ्रोझन शोल्डर, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘अॅडेसिव्ह कॅप्सुलायटिस’ (Adhesive Capsulitis) म्हणतात, हा असा आजार आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्याभोवती असणारे आवरण (Capsule) जाड होते, त्याला सूज येते आणि तो भाग कडक होतो. शरीरात साखरेचे प्रमाण दीर्घकाळ अनियंत्रित राहिल्यामुळे खांद्याच्या अस्थिबंधनांमधील (Ligaments) आणि टेंडन्समधील ‘कोलाजेन’ या प्रोटीनच्या रचनेत बदल होतो. यामुळे हे उती (Tissues) कमी लवचिक बनतात आणि त्यांच्यावर सूज व चट्टे (Scarring) तयार होऊन खांद्याची हालचाल पूर्णपणे मंदावते. फ्रोझन शोल्डर सामान्यतः एका वेळी एकाच खांद्याला होतो. परंतु, एका खांद्याचा त्रास बरा झाल्यानंतर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी दुसऱ्या खांद्यालाही हा त्रास होऊ शकतो; मात्र दोन्ही खांदे एकाच वेळी ‘फ्रोझन’ होण्याचे प्रमाण अत्यंत दुर्मिळ आहे.

सुरुवातीची लक्षणे आणि आजाराचे तीन टप्पे

सुरुवातीची लक्षणे आणि आजाराचे तीन टप्पे

या आजाराची सुरुवात खांद्याभोवती मंद आणि सतत होणाऱ्या वेदनांनी होते. सुरुवातीला ठराविक हालचाली करतानाच वेदना होतात, पण हळूहळू हा त्रास वाढून रात्री झोपताना (विशेषतः बाधित खांद्यावर कुशीवर निजल्यास) वेदना तीव्र होतात. आजार वाढल्यावर रुग्णाला केस विंचरणे, कपडे घालणे, पाठीमागे हात नेऊन हुक लावणे किंवा उंचावरील वस्तू काढणे यांसारख्या साध्या गोष्टीही जमेनाशा होतात. फ्रोझन शोल्डर प्रामुख्याने तीन टप्प्यांतून जातो:

  • फ्रीझिंग स्टेज (Freezing Stage) : यामध्ये वेदना हळूहळू वाढतात आणि खांद्याची हालचाल मर्यादित होऊ लागते.
  • फ्रोझन स्टेज (Frozen Stage) : या टप्प्यात वेदना थोडी कमी होऊ शकते, परंतु खांद्याचा कडकपणा (Stiffness) प्रचंड वाढतो.
  • थॉइंग स्टेज (Thawing Stage) : या शेवटच्या टप्प्यात खांद्याची हालचाल हळूहळू पूर्वपदावर येऊ लागते. या संपूर्ण प्रक्रियेला आणि बरे होण्याला साधारणपणे ९ ते १२ महिन्यांचा काळ लागतो.

जोखमीचे घटक आणि इतर कारणे

जोखमीचे घटक आणि इतर कारणे

मधुमेह हा फ्रोझन शोल्डरसाठी सर्वात मोठा धोका असला, तरी इतरही काही कारणांमुळे हा त्रास होऊ शकतो. खांद्याला झालेली दुखापत, फ्रॅक्चर किंवा शस्त्रक्रियेनंतर (Surgery) खांद्याची हालचाल दीर्घकाळ बंद राहिल्याने सांधा जाम होतो. याशिवाय पॅरालिसीसचा झटका येणे किंवा थायरॉईडचे आजार असलेल्या व्यक्तींमध्येही हा धोका वाढतो. वयाचा विचार केला तर ४० ते ६० वर्षे वयोगटातील लोकांमध्ये हा आजार सर्वाधिक आढळतो आणि पुरुषांच्या तुलनेत महिलांना फ्रोझन शोल्डर होण्याचा धोका किंचित जास्त असतो.

फिजिओथेरपिस्टची भूमिका आणि उपचारांचे महत्त्व

फिजिओथेरपिस्टची भूमिका आणि उपचारांचे महत्त्व

फ्रोझन शोल्डर पूर्णपणे बरा करण्यासाठी ‘फिजिओथेरपी’ (Physiotherapy) हा उपचारांचा सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा कणा आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केलेले स्ट्रेचिंग आणि खांद्याच्या हालचालींचे व्यायाम सांध्याची लवचिकता टिकवून ठेवतात. अनेक रुग्ण या आजारात लवकर आराम पडत नाही म्हणून निराश होतात आणि सतत डॉक्टर बदलतात, जे चुकीचे आहे. या आजारात उपचारांमधील ‘सातत्य’ (Consistency) खूप महत्त्वाचे आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवल्याने शरीरातील सूज कमी होते आणि बरे होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. वेदनाशामक औषधे केवळ तात्पुरता आराम देतात जेणेकरून रुग्ण फिजिओथेरपीचे व्यायाम सहज करू शकेल. जर रात्रीच्या वेदना असह्य असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सांध्यामध्ये ‘कॉर्टिकोस्टिरॉईड इंजेक्शन’ (Corticosteroid Injection) दिले जाते, ज्यामुळे सूज झपाट्याने कमी होते.

आधुनिक वैद्यकीय पर्याय आणि शस्त्रक्रियेची गरज

आधुनिक वैद्यकीय पर्याय आणि शस्त्रक्रियेची गरज

जेव्हा अनेक महिन्यांच्या नियमित फिजिओथेरपी आणि औषधानंतरही काहीच फरक पडत नाही, अशा मोजक्याच रुग्णांमध्ये ‘हायड्रोडायलेटर’ (Hydrodilatation) किंवा ‘आर्थ्रोस्कोपिक सर्जरी’चा (Arthroscopic Surgery) विचार केला जातो. परंतु, अलीकडील वैद्यकीय संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, दीर्घकालीन परिणामांचा विचार केला तर फिजिओथेरपी, इंजेक्शन आणि शस्त्रक्रिया या सर्वांचे अंतिम परिणाम सारखेच मिळतात. फ्रोझन शोल्डर हा एक ‘सेल्फ-लिमिटिंग’ (स्वतःहून ठराविक वेळेनंतर बरा होणारा) आजार असल्याने केवळ अत्यंत गंभीर केसेसमध्येच शस्त्रक्रियेची गरज भासते. त्यामुळे शस्त्रक्रियेची घाई न करता संयम राखणे फायदेशीर ठरते.

आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले

आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.

  • नवीन आवृत्ती
  • Jul 14, 2026, 03:22 PMMedically Reviewed byDr. Ashish Phadnis
  • Jul 14, 2026, 03:22 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम