धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग १८ मध्ये ईव्हीएम मशीन फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धुळे: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या मतदानाचा उत्साह आज १५ जानेवारी रोजी शिगेला पोहोचला आहे. मात्र, धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक १८ मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे मतदान सुरू असतानाच ईव्हीएम मशीनची थेट तोडफोड करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
भाजपवर गंभीर आरोप आणि दादागिरीची तक्रार
या तोडफोडीच्या घटनेनंतर शिवसेना उमेदवार सतीश महाले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाले यांनी थेट भाजप उमेदवारांवर ईव्हीएम मशीन फोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. “भाजप उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर केवळ यंत्रांची तोडफोडच केली नाही, तर सर्वसामान्य मतदारांमध्ये दहशत माजवण्यासाठी दादागिरी केली,” असा दावा महाले यांनी केला. या गोंधळामुळे मतदान प्रक्रियेत मोठा व्यत्यय आला असून, मतदारांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. दरम्यान, या घटनेमुळे महायुतीमधील अंतर्गत कलह आणि सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
२०१७ चे समीकरण आणि सत्तेची गणिते
धुळे महानगरपालिकेच्या राजकीय इतिहासावर नजर टाकल्यास २०१७ मध्ये ७४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे स्पष्ट वर्चस्व होते. त्यावेळी भाजपने ५८ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत आहे.
शिवसेना (UBT) कडे २९, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडे १९, तर काँग्रेस आणि AIMIM कडे प्रत्येकी २१ जागांचे बळ मागील काळात दिसून आले आहे. वंचीत, सपा आणि मनसेची ताकदही निर्णायक ठरू शकते.
सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस चौकशी सुरू आहे. तोडफोड झालेल्या मतदान केंद्रावर पुनर्मतदान होणार की नाही आणि दोषींवर काय कारवाई होणार, याकडे आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ७४ जागा असून त्यापैकी ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ७० जागांसाठी ३१६ उमेदवार रिंगणात आहेत. शहरात एकूण ५०७ मतदान केंद्रे असून त्यापैकी १३ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या निवडणुकीत एकूण ४ लाख ३ हजार ३८७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून अधिकाऱ्यांसह सुमारे १५०० पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा