महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Dada Kondke and Ashok Saraf Dispute :दादा आणि अशोक सराफ यांच्यातील या कथित वादाची पार्श्वभूमी काय होती, याविषयी दादा कोंडके यांनी आपल्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रात सविस्तर खुलासा केला आहे.

जोडीनं मराठी रसिकांवर घातलेली भुरळ
‘पांडू हवालदार’, ‘राम राम गंगाराम’ आणि ‘तुमचं आमचं जमलं’ यांसारख्या चित्रपटांतून दादा कोंडके आणि अशोक सराफ या दोघांच्या जोडीनं मराठी रसिकांवर भुरळ घातली होती. पण झालं असं होतं की, यशाच्या शिखरावर असतानाच या दोन दिग्गजांमध्ये अचानक दुरावा निर्माण झालेला. इंडस्ट्रीत आणि प्रसारमाध्यमांमध्ये या वादाविषयी अनेक चर्चा रंगल्या.
अशोकचे सीन जास्त का ठेवले आहेत?
मराठी चित्रपटांमध्ये रडक्या आणि गंभीर विषयांचा ट्रेंड सुरु असताना दादा कोंडके यांनी विनोदी चित्रपटांचा धुरळा उडवून दिला होता. नाटकाच्या रंगमंचावर काम करणाऱ्या तरुण अशोक सराफ यांचा अभिनय पाहून दादांनी त्यांना ‘पांडू हवालदार’ या चित्रपटातील ‘सखाराम हवालदार’ या भूमिकेसाठी निवडलं. ‘पांडू हवालदार’ प्रदर्शित झाला आणि अवघ्या काही दिवसांत नव्हे तर तासांत अशोक सराफ यांची गणना आघाडीच्या कलाकारांमध्ये होऊ लागली. चित्रपटात दादा मुख्य भूमिकेत असूनही त्यांनी अशोक सराफ यांच्यातील टॅलेंट ओळखून त्यांना अधिकचे सीन्स देण्यात आले होके. अनेकदा सेटवर सहकलाकार दादांना विचारायचे की, अशोकचे सीन जास्त का ठेवले आहेत? त्यावर दादा सहज उत्तर द्यायचे, तो चांगलं काम करतोय आणि प्रेक्षक त्यावर हसतात, मग अडचण काय आहे? त्याचा फायदा शेवटी चित्रपटालाच होणार आहे.
‘राम राम गंगाराम’ मधील तो गाजलेला सीन
‘राम राम गंगाराम’ या चित्रपटात अशोक सराफ यांनी एक भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एका सीनमध्ये अशोक सराफ यांच्या लुंगीत पांढरा उंदीर शिरतो, असे दाखवायचे होते. पांढरा उंदीर चावतो असा समज असल्याने अशोक सराफ हा सीन करायला प्रचंड घाबरले होते आणि त्यांनी या सीनला थेट नकार दिला. दादांना मात्र तोच सीन हवा होता. त्यांनी अशोक सराफ यांची समजूत काढली आणि सीनची संपूर्ण आउटलाईन समजावून सांगितली. अखेर अशोक सराफ यांनी तो सीन केला आणि पडद्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून प्रेक्षक पोट धरून हसले. दादांनी स्वतः त्यांच्या आत्मचरित्रात अशोक सराफ यांच्या त्या अभिनयाचे कौतुक केलं आहे.
दोन दिग्गजांमधील दुरावा आणि अफवांचं पीक
पडद्यावर खळखळून हसवणारी, कमाईचे रेकॉर्ड मोडणारी जोडी ‘राम राम गंगाराम’ नंतर अचानक गायब झाली. दादा कोंडके आणि अशोक सराफ हे फारसे एकत्र दिसणं बंद झालेलं. त्यामुळं सहाजिक या दोघांमध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलेले. काहींनी असं म्हटलं की अशोक हे दादांच्या वरचढ ठरत आहे,म्हणून दादांनी त्यांच्यासोबत काम करायचं नाहीये. पण तसं नव्हतं. दादांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दलही लिहिलंय. दादांनी लिहिलं की ,टीका करणारे हे विसरले की, त्याला साईन करणारा निर्माता मीच होतो. अशोकचे काम चांगले होऊन चित्रपट हिट झाला, तर त्याचा आर्थिक फायदा शेवटी मलाच होणार होता. मग मी त्याला स्वतःहून का बाहेर काढीन? तर या मागं असं कोणतंच कारण नव्हतं तर दोघांच्या तारखा जुळवणं कठीण झालेलं, असंही जाणकार सांगतात. ‘पांडू हवालदार’ नंतर अशोक सराफ यांची मागणी प्रचंड वाढली होती. ते नाटकांचे दौरे आणि इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये प्रचंड व्यस्त झाले होते, ज्यामुळं दोघांच्या तारखा जमणंच कठीण झालं होतं.
बाळासाहेब ठाकरेंची मध्यस्थी
तर दादा कोंडके आणि अशोक सराफ यांच्यात काही तरी बिनसल्याची चर्चा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या कानावरही गेली होती. यासाठी त्यांनी थेट अशोक सराफ यांना फोनही केला होता.
याच दरम्यान, दादा कोंडके यांनी जेव्हा ‘तेरे मेरे बीच में’ हा हिंदी चित्रपट बनवला, तेव्हा त्यात त्यांनी अमजद खान यांना घेतलं. बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळं बाळासाहेबांनी चित्रपट पाहिल्यावर दादांना विचारलं,तुम्ही अशोकला न घेता अमजदला का घेतलं? दादांनी बाळासाहेबांना सांगितलं की, मी अशोकलाच घेणार होतो, पण त्याच्याकडं तारखा नव्हत्या. तुम्ही हवं तर त्याला विचारून घ्या.
या नंतर एका कार्यक्रमात जेव्हा दादा कोंडके, बाळासाहेब ठाकरे आणि अशोक सराफ एकत्र आले, तेव्हा बाळासाहेबांनी अशोक सराफांना याबद्दल विचारलेलं. त्यावर अशोक सराफ यांनी तेव्हे स्पष्ट केले की, नाटकाच्या पूर्वनियोजित दौऱ्यांमुळं आणि शेड्युलमुळं त्यांना त्या चित्रपटात काम करणं शक्य झालं नव्हतं. अशा प्रकारे बाळासाहेबांच्या उपस्थितीत दोघांमधील गैरसमज दूर झाले.
परस्परांबद्दलचा आदर आणि गुरुमंत्र
जरी या प्रकरणानंतर दादा कोंडके आणि अशोक सराफ पुन्हा कधीही एकाच पडद्यावर एकत्र आले नाहीत, तरीही दोघांच्या मनात एकमेकांबद्दल नेहमीच आदर राहिला. अशोक सराफ यांनी अनेक मुलाखतींमध्ये मान्य केलं आहे की, संवादातील उत्स्फूर्तता आणि विनोदाचे अचूक टायमिंग कसं साधावं, याचा गुरूमंत्र मी दादांकडूनच शिकलो.
म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभारदादांचा विनोद कधीच ओढून ताणून केलेला विनोद नव्हता तर त्यामध्ये एक उत्स्फूर्तता होती, असं अशोक सराफ म्हणतात. पड्यावर विनोद करताना निखळता आणि विनोदी संवादातील उत्स्फूर्तता कशी आणायची हे मी दादांकडूनच शिकलो. दादांनी जणू मला हा गुरूमंत्रच दिला होता, असं म्हणत अशोक सराफ आजही दादांचे आभार मानातात.
‘एकटा जीव’ या आत्मचरित्रातून उलगडल्या अनेक गोष्टी
मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या अद्वितीय विनोदी शैलीने आणि अस्सल रांगड्या संवादांनी खळखळून हसवणारे महानायक म्हणजे दादा कोंडके. पडद्यावर प्रेक्षकांना पोट धरून हसवणाऱ्या या अष्टपैलू अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यातील संघर्ष, यश आणि एकाकीपणाचे वास्तव त्यांच्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रातून प्रभावीपणे समोर आलं. दादा कोंडके यांचं हे आत्मचरित्रपर पुस्तक प्रसिद्ध पत्रकार व लेखिका अनिता पाध्ये यांनी लिहलं असून, यात दादांच्या पडद्यामागच्या आयुष्याचा आणि संघर्षाचा प्रवास मांडला आहे.
