डिजिटल बँकिंगच्या काळात ATM मधून पैसे काढणे जितके सोपे आहे, तितकेच ते सायबर चोरांच्या तांत्रिक जाळ्यामुळे धोकादायक बनले आहे. हॅकर्स सध्या ‘कार्ड स्किमिंग’ आणि छुप्या कॅमेऱ्यांच्या मदतीने ग्राहकांचा गोपनीय डेटा चोरत आहेत. ATM मधील आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पैसे काढण्यापूर्वी 5 गोष्टी तपासणे या अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

1. कार्ड घालण्याच्या जागेची तपासणी करा
ATM मशीनमध्ये जिथे आपण कार्ड घालतो, तिथे सायबर चोर हुबेहूब दिसणारे ‘स्किमर डिव्हाइस’ वरून बसवतात. जेव्हा तुम्ही कार्ड स्वाइप करता, तेव्हा हे डिव्हाइस तुमच्या कार्डमधील मॅग्नेटिक स्ट्रीपचा सर्व डेटा कॉपी करते. म्हणूनच, कार्ड घालण्यापूर्वी तो स्लॉट हलवून पहा. जर तो सैल वाटला किंवा तिथे काही वेगळा डिझाईनचा प्लास्टिक भाग जोडल्यासारखा वाटला, तर तिथे कार्ड वापरू नका.
2. कीपॅडच्या वर छुपा कॅमेरा तपासा
तुमचा ATM PIN चोरण्यासाठी हॅकर्स कीपॅडच्या वरच्या बाजूला, छतावर किंवा कार्ड स्लॉटच्या अगदी जवळ अगदी लहान ‘पिनहोल कॅमेरा’ बसवतात. तुम्ही पिन टाईप करताना तो या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतो. यावर तांत्रिक उपाय म्हणजे, जेव्हा तुम्ही पिन टाईप कराल, तेव्हा दुसऱ्या हाताने कीपॅड पूर्णपणे झाकून घ्या. यामुळे कॅमेरा असला तरी तुमचा पिन सुरक्षित राहील.
3. कीपॅड ओव्हरले बद्दल सतर्क राहा
काही गुन्हेगार मूळ कीपॅडच्या वर एक बनावट ‘फेक कीपॅड’ बसवतात. जेव्हा तुम्ही बटणे दाबता, तेव्हा तुमचा पिन त्या बनावट कीपॅडच्या मेमरीमध्ये सेव्ह होतो. जर तुम्हाला एटीएमचे बटण दाबताना ते नेहमीपेक्षा जास्त जाड किंवा दाबण्यास कठीण वाटत असेल, तर त्वरित व्यवहार रद्द करा.
4. ‘कॅश शटर’ जाम आहे का पहा
पैसे बाहेर येण्याच्या जागेला ‘कॅश शटर’ म्हणतात. काही वेळा चोरटे या जागेवर डिझाईन मॅच होणारी पट्टी किंवा डिंकासारखा पदार्थ लावतात. यामुळे तुमचे ट्रान्झॅक्शन यशस्वी होते, पण पैसे बाहेर येत नाहीत आणि ग्राहक ‘मशीन खराब आहे’ समजून निघून जातात. ग्राहक गेल्यावर चोरटेती पट्टी काढून तुमचे पैसे लाटतात. पैसे न आल्यास बँकेशी संपर्क करेपर्यंत एटीएम सोडू नका.
5. ‘कॅन्सल’ बटणाचा वापर आणि मोबाईल अलर्ट
ATM मधून बाहेर पडण्यापूर्वी स्क्रीनवरील व्यवहार पूर्णपणे बंद झाला आहे की नाही (Welcome Screen आली की नाही) हे तपासा आणि कीपॅडवरील ‘Cancel’ किंवा ‘Clear’ बटण दोनदा आवर्जून दाबा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर सुरू ठेवा, जेणेकरून पैसे डेबिट झाल्यास तात्काळ ‘एसएमएस’ (SMS) अलर्ट येईल.
शक्यतो जुनी मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली ATM कार्डे बदलून अधिक सुरक्षित असणारी ‘ईएमव्ही चिप’ आणि पिन आधारित कार्डे वापरावीत. तसेच, अनोळखी किंवा सुरक्षा रक्षक नसलेल्या निर्जन ठिकाणच्या ATM चा वापर करणे टाळावे.

