Headlines

ग्रामीण भागातील रुग्णांमुळे शहरात हॉस्पिटलवर ताण:आरोग्य यंत्रणा बळकट करा- पालकमंत्री; पण ग्रामीण भागात डाॅक्टर, कर्मचारी नाहीत




ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करावी, अशा सूचना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आरोग्यवर्धिनीच्या बैठकीत दिल्या. मात्र, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात डॉक्टर, आरोग्यसेविका आणि वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. परिणामी, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र असून रुग्णांना उपचारासाठी शहरात धाव घ्यावी लागत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग या दोघांमार्फत ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्याच पुरेशी नसल्याने रुग्णांसमोर शहरात येण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अडचणींची शृंखला जिल्ह्यात आरोग्यसेविकेची एकूण 491 पदे मंजूर असून त्यांपैकी 240 पदे रिक्त आहेत, तर वर्ग-4 कर्मचाऱ्यांच्या 250 पैकी केवळ 90 जागा भरलेल्या असून तब्बल 160 पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर एमबीबीएस डॉक्टरांची 39 पदे मंजूर आहेत. मात्र, पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने या जागा कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांच्या करारावर भरल्या जात असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानेकर यांनी सांगितले. रुग्णालयांत तज्ज्ञांची कमतरता सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ यांची मंजूर असलेली सर्व पदे सध्या रिक्त आहेत. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ग्रामीण भागात 70 टक्के कर्मचारी कार्यरत असून 30 टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. रिक्त पदासाठी पाठपुरावा सुरू जिल्ह्यात 70 टक्के पदे आरोग्य विभागात भरली असून 30 टक्के पदे रिक्त आहेत.त्यामुळे ही पदे भरण्यासाठी आरोग्य विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे. ग्रामीण भागात तज्ज्ञांचे उपचार न मिळाल्यास रुग्ण शहरात येतात. त्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण येतो. ही पदे भरण्याचे नियोजन आहे. – डॉ. कमलाकर मुदखेडकर,जिल्हा शल्यचिकित्सक



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत