Headlines

ATM मधून पैसे काढताना 5 तांत्रिक गोष्टी तपासा; सायबर फ्रॉडसह कार्ड क्लोनिंगचे संकट टाळा। Maharashtra Times


डिजिटल बँकिंगच्या काळात ATM मधून पैसे काढणे जितके सोपे आहे, तितकेच ते सायबर चोरांच्या तांत्रिक जाळ्यामुळे धोकादायक बनले आहे. हॅकर्स सध्या ‘कार्ड स्किमिंग’ आणि छुप्या कॅमेऱ्यांच्या मदतीने ग्राहकांचा गोपनीय डेटा चोरत आहेत. ATM मधील आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पैसे काढण्यापूर्वी 5 गोष्टी तपासणे या अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

ATM। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
ATM मधून पैसे काढणे सोपे आहे, पण याचवेळी धोका देखील होऊ शकतो. हॅकर्स सध्या ‘कार्ड स्किमिंग’ आणि छुप्या कॅमेऱ्यांच्या मदतीने ग्राहकांचा गोपनीय डेटा चोरत आहेत. कार्ड स्लॉटमधील बनावट डिव्हाइसेस आणि कीपॅडवरील तांत्रिक फेरबदल यामुळे तुमचे बँक खाते एका झटक्यात रिकामे होऊ शकते. ATM सेंटरमध्ये प्रवेश करताना कोणत्या 5 गोष्टी तपासून पाहाव्यात आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचे कष्टाचे पैसे कसे सुरक्षित ठेवावेत, याविषयी जाणून घेऊया.

1. कार्ड घालण्याच्या जागेची तपासणी करा

ATM मशीनमध्ये जिथे आपण कार्ड घालतो, तिथे सायबर चोर हुबेहूब दिसणारे ‘स्किमर डिव्हाइस’ वरून बसवतात. जेव्हा तुम्ही कार्ड स्वाइप करता, तेव्हा हे डिव्हाइस तुमच्या कार्डमधील मॅग्नेटिक स्ट्रीपचा सर्व डेटा कॉपी करते. म्हणूनच, कार्ड घालण्यापूर्वी तो स्लॉट हलवून पहा. जर तो सैल वाटला किंवा तिथे काही वेगळा डिझाईनचा प्लास्टिक भाग जोडल्यासारखा वाटला, तर तिथे कार्ड वापरू नका.

2. कीपॅडच्या वर छुपा कॅमेरा तपासा

तुमचा ATM PIN चोरण्यासाठी हॅकर्स कीपॅडच्या वरच्या बाजूला, छतावर किंवा कार्ड स्लॉटच्या अगदी जवळ अगदी लहान ‘पिनहोल कॅमेरा’ बसवतात. तुम्ही पिन टाईप करताना तो या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतो. यावर तांत्रिक उपाय म्हणजे, जेव्हा तुम्ही पिन टाईप कराल, तेव्हा दुसऱ्या हाताने कीपॅड पूर्णपणे झाकून घ्या. यामुळे कॅमेरा असला तरी तुमचा पिन सुरक्षित राहील.

3. कीपॅड ओव्हरले बद्दल सतर्क राहा

काही गुन्हेगार मूळ कीपॅडच्या वर एक बनावट ‘फेक कीपॅड’ बसवतात. जेव्हा तुम्ही बटणे दाबता, तेव्हा तुमचा पिन त्या बनावट कीपॅडच्या मेमरीमध्ये सेव्ह होतो. जर तुम्हाला एटीएमचे बटण दाबताना ते नेहमीपेक्षा जास्त जाड किंवा दाबण्यास कठीण वाटत असेल, तर त्वरित व्यवहार रद्द करा.

4. ‘कॅश शटर’ जाम आहे का पहा

पैसे बाहेर येण्याच्या जागेला ‘कॅश शटर’ म्हणतात. काही वेळा चोरटे या जागेवर डिझाईन मॅच होणारी पट्टी किंवा डिंकासारखा पदार्थ लावतात. यामुळे तुमचे ट्रान्झॅक्शन यशस्वी होते, पण पैसे बाहेर येत नाहीत आणि ग्राहक ‘मशीन खराब आहे’ समजून निघून जातात. ग्राहक गेल्यावर चोरटेती पट्टी काढून तुमचे पैसे लाटतात. पैसे न आल्यास बँकेशी संपर्क करेपर्यंत एटीएम सोडू नका.

5. ‘कॅन्सल’ बटणाचा वापर आणि मोबाईल अलर्ट

ATM मधून बाहेर पडण्यापूर्वी स्क्रीनवरील व्यवहार पूर्णपणे बंद झाला आहे की नाही (Welcome Screen आली की नाही) हे तपासा आणि कीपॅडवरील ‘Cancel’ किंवा ‘Clear’ बटण दोनदा आवर्जून दाबा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर सुरू ठेवा, जेणेकरून पैसे डेबिट झाल्यास तात्काळ ‘एसएमएस’ (SMS) अलर्ट येईल.

शक्यतो जुनी मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली ATM कार्डे बदलून अधिक सुरक्षित असणारी ‘ईएमव्ही चिप’ आणि पिन आधारित कार्डे वापरावीत. तसेच, अनोळखी किंवा सुरक्षा रक्षक नसलेल्या निर्जन ठिकाणच्या ATM चा वापर करणे टाळावे.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा