Who is Aravind Sanka: एक छोटीशी कल्पनाला तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते. एकेकाळी फ्लिपकार्टमध्ये नोकरी करणारे अरविंद संका यांनी शहरांमधील प्रवाशांच्या वाहतुकीच्या समस्यांचे समजली आणि शहरांमध्ये लोकांच्या प्रवासाची समस्या पाहून अरविंद यांना अशी कल्पना सुचली की आज 25000 कोटींच्या कंपनीचे मालक बनले आहेत.

अरविद सांका कोण?
अरविंद सांका यांचं नाव कदाचित तुम्हाला फारसं परिचित नसेल पण, त्यांनी सुरू केलेल्या ब्रँडबद्दल नक्कीच ऐकलं असेल. अरविंद सांका रॅपिडोचे सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. 2015 मध्ये बाईक टॅक्सी म्हणून सुरू झालेली रॅपिडोचे मूल्यांकन 25,000 कोटी रुपये झाले असून अरविंद संका यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर या ब्रँडने यश मिळवले. पवन गुंटुपल्ली आणि एस. आर. ऋषिकेश या सहकाऱ्यांसोबत अरविंद यांनी भारताच्या वाहतूक व्यवस्थेतील अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित केले.
फ्लिपकार्टमधील अनुभव कामी आला
रॅपिडोच्या तीन संस्थापकांपकी अरविंद यांनी 2008 ते 2012 दरम्यान आयआयटी भुवनेश्वर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. IIT मधील शिक्षणाआधी त्यांनी टाटा मोटर्समध्ये इंटर्नशिप केली आणि ऑटोमोटिव्ह उद्योगाची सखोल माहिती घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर अरविंद फ्लिपकार्टमध्ये रुजू झाले आणि सप्लाय चेन व लॉजिस्टिक्स विभागात काम केले. अशाप्रक्रारे, फ्लिपकार्टमधील अनुभवाचा वापर करून अरविंद यांनी नंतर रॅपिडोचे बिझनेस मॉडेल विकसित केले.
शहरी समस्यांमधून धडा घेतला
रॅपिडोच्या आधी अरविंद आणि त्यांच्या टीमने Karrier नावाचा लॉजिस्टिक्स स्टार्टअप सुरू केलेला ज्याचा उद्देश शहरांतर्गत डिलिव्हरीसाठी ग्राहकांना लहान मालवाहू कंपन्यांशी जोडण्याचा होता. मात्र, सांका यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसले तरीही अपयशाने खचून न जाता अरविंद आणि सहकाऱ्यांनी बाजाराचे बारकाईने विश्लेषण केले. यावेळी त्यांनी शहरी समस्यांवर लक्ष केंद्रित केले आणि शहरांमध्ये दररोज प्रवास करणाऱ्यांना भेडसावणारी मोठी समस्यालक्षात आली आणि त्यात संभाव्य व्यावसायिक संधी शोधली.
रॅपिडोचा प्रवास भारताच्या रस्त्यांसारखा खडतर
2015 मध्ये लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अत्यंत किफायतशीर दरात पोहोचवण्याचे लक्ष ठेवून रॅपिडो सुरू केली. पण, अनेक राज्यांमध्ये बाईक टॅक्सींबाबत अस्पष्ट धोरणांमुळे त्यांना सुरुवातीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. तरीही या आव्हानांना न जुमानता रॅपिडोने आपल्या नेटवर्कचा विस्तार सुरूच ठेवला. सध्या रॅपिडोने बाईक टॅक्सींसह वाहतुकीच्या इतर अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
कारऐवजी बाईक टॅक्सीवर फोकस
रॅपिडोच्या लाँचवेळी ओला आणि उबरने आधीच भारतीय टॅक्सी बाजारपेठ पूर्णपणे काबीज केली. त्यामुळे रॅपिडोने या दोघांशी स्पर्धा करण्याऐवजी वेगळाच मार्ग निवडला आणि गाड्यांऐवजी बाईक टॅक्सींवर लक्ष केंद्रित केले. कमी भाडे आणि वाहतुकीतील प्रवासाचा कमी वेळ यामुळे रॅपिडो हळूहळू तरुणांमध्ये लोकप्रिय बनले. त्यानंतर कमी अंतराच्या प्रवासातील यशानंतर कंपनीने हळूहळू ऑटो-रिक्षा आणि चारचाकी टॅक्सी सेवांमध्ये विस्तार केला.
2,000 कोटींचा निधी उभारला
अलीकडेच रॅपिडोने नव्या फंडिंग फेरीत अंदाजे 2,000 कोटी उभारले आणि यासह कंपनीचे मूल्यांकन जवळपास 25,000 कोटींपर्यंत वाढले. गेल्या काही वर्षांतील या प्रभावी वाढीमुळे अरविंद संका भारतीय स्टार्टअप उद्योगातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी बनले.

