Headlines

Amravati District Hospital NICU Fire Infants Death Father Cry over telling Mother; बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावतीत अर्भकमृत्यू, बापाचा काळीज चिरणारा सवाल; आमचं लेकरु आहे तसं द्या, पोस्टमार्टम नको, कुटुंबांचा टाहो


Amravati District Hospital Fire Infants Death : आमचे बाळ आम्हाला जसे आहे तसेच परत द्या, त्याच्या चिमुकल्या शरीरावर पोस्टमार्टमचे शस्त्र चालू देऊ नका, अशी काकुळतीची विनंती करत पालकांनी हंबरडा फोडला.

Amravati Fire Baby Death Mother Father Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गजेंद्र बडनेरकर, अमरावती : आमच्या पिढीतील हे पहिलेच बाळ… आजकाल सिझेरियनचे प्रमाण वाढलेले असताना माझ्या पत्नीची ‘नॉर्मल डिलिव्हरी’ झाली होती. सासरवाडीत मामा झाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता, गावात उत्साहाने पेढे वाटले गेले. पण, एका भीषण पहाटेने आमचा हा आनंद कायमचा हिरावून घेतला. आमचे बाळ या लाचार आणि बेफिकीर व्यवस्थेने खाल्ले! अजून बायकोला हे सत्य सांगायची हिम्मत होत नाहीये, तिचे सांत्वन करू तरी कसे? अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आवारात टाहो फोडणाऱ्या एका बापाचा हा आक्रंदणारा सवाल तेथे उपस्थित प्रत्येकाचे काळीज पिळवटून टाकत होता.

सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) काळाने असा काही घाला घातला, की ज्या लेकरांनी अजून रुग्णालयाबाहेरची हवाही अनुभवली नव्हती, त्यांचे श्वास क्षणात थांबले. व्हेंटिलेटरच्या भीषण स्फोटाने लागलेल्या आगीत अवघ्या चार ते दहा दिवसांच्या तीन निष्पाप बालकांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला. या घटनेने संपूर्ण अमरावती जिल्हा हादरला असून, रुग्णालय परिसरात पसरलेला नातेवाइकांचा आक्रोश थरकाप उडवणारा होता.

मृत बालकाच्या बापाने फोडला टाहो

आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलेल्या एका पित्याने थेट व्यवस्थेवरच हल्लाबोल केला. ‘माझ्या मुलाला मारून टाकले यांनी! डॉक्टर-नर्सेस सर्व सुखरूप बाहेर पडले, पण आमची लेकरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रुग्णालये माणसांचा जीव वाचवण्यासाठी असतात की जीव घेण्यासाठी?’ असा संतप्त सवाल करीत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत विचारला. बोराळा (ता. चिखलदरा) येथील मातेची चिमुकली, पुलगाव (जि. वर्धा) आणि खेड (ता. अंजनगाव सुर्जी) येथील मातांचे दोन नवजात मुलगे या दुर्घटनेचे बळी ठरले.

Maharashtra TimesSolapur Crime : 42 वर्षीय विवाहितेचं 27 वर्षीय तरुणाशी इन्स्टावर सूत जमलं, मुलगा-नवऱ्याला सोडून आली, लग्नाचा तगादा, प्रियकराची दुर्दैवी अखेर

पोस्टमॉर्टमवरून तणाव, पोलिसांचा बंदोबस्त

दुर्घटनेनंतर एसएनसीयूमधील उर्वरित बालकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यातील सात बालकांना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलवले गेले, मात्र दुर्दैवाने तिघांची प्राणज्योत मालवली होती.

मिसबा तबस्सुम यांच्या भाजलेल्या बाळावर सध्या उपचार सुरू असून, इतर दोन गंभीर बालकांना पीडीएमसीत हलवण्यात आले आहे. दरम्यान, मृत चिमुकल्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होताच नातेवाइकांचा बांध फुटला.

Maharashtra TimesChhatarpur Three Sisters Death : वांग्याचं भरीत-चपाती खाऊन झोपल्या, तीन सख्ख्या बहिणींचा मागोमाग अंत, आईचं दूध प्यायलेलं नऊ महिन्यांचं बाळही मृत्युमुखी

पोस्टमार्टमचे शस्त्र नको

आमचे बाळ आम्हाला जसे आहे तसेच परत द्या, त्यांच्या चिमुकल्या शरीरावर पोस्टमार्टमचे शस्त्र चालू देऊ नका, अशी काकुळतीची विनंती करत पालकांनी हंबरडा फोडला. वातावरण अत्यंत संवेदनशील आणि तणावपूर्ण झाल्याने विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला, अखेर अत्यंत जड अंतःकरणाने आणि कड़क पोलिस बंदोबस्तात बॉडी शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले.

‘फायर अलार्म वाजलाच नाही’

अत्यंत गंभीर आणि कमी वजनाच्या बालकांवर उपचारासाठी बनवलेल्या या अद्ययावत कक्षात आग लागली, तेव्हा सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे निघाले. प्रत्यक्षदर्शी नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, इतकी भीषण आग लागून धुराचे लोट पसरले तरी रुग्णालयाचा ‘फायर अलार्म’ वाजलाच नाही. जर अलार्म वेळेवर वाजला असता किंवा सुरक्षेचे प्राथमिक संकेत मिळाले असते, तर कदाचित या तीन चिमुकल्यांचे प्राण वाचू शकले असते, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Maharashtra TimesPune Accident : PhD करण्याचं स्वप्न अधुरं, सिंहगड रोडवर PMP बसमधून उतरताना घसरली, स्कूल बसने चिरडलं, 25 वर्षीय तरुणीचा चटका लावणारा अंत

सोशल मीडियावर संतापलाट

आगीची घटना काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. हळहळ आणि संतापही उमटू लागला. व्यवस्थेतील गलथानपणावर बोट ठेवण्यात आले. फायर ऑडिट न करण्यावरून रोषही व्यक्त केला. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही केली गेली. बऱ्याच नेटकऱ्यांनी भंडारा आणि राज्यातील इतर आगीच्या घटनांनाही उजळा दिला.