Headlines

Ajinkya Rahane father let him travel alone on Mumbai local from Dombivli at age of 7; 7 वर्षांचा अजिंक्य रहाणे डोंबिवली लोकलच्या गर्दीतून एकटा प्रॅक्टिसला जायचा, बाबांची ट्रिक, सहा वर्षांनी कारण समजताच गहिवरला


Ajinkya Rahane Childhood Memory : मी ७ वर्षांचा असताना प्रॅक्टिससाठी लोकलने प्रवास करायचो. पहिल्या दिवशी माझे वडील मला सोडायला आलेले, पण त्यासाठी त्यांना ऑफिसमधून रजा घ्यावी लागली होती

Ajinkya Rahane Childhood Memory Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा तगडा फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रहाणेने सोशल मीडियावर भावूक व्हिडिओ शेअर करत आपल्या कारकि‍र्दीला विराम देत असल्याचं जाहीर केलं. डोंबिवलीतील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या रहाणेचे पाय कायम जमिनीवर राहिले. यानिमित्ताने अजिंक्यला घडवणाऱ्या त्याच्या आई वडिलांचा एक किस्सा चर्चेत आला आहे.

अजिंक्यच्या वडिलांचा निर्णय

मुलांना जगापासून जपणं आणि जगाला सामोरं जाण्यासाठी तयार करणं, यांमधील नेमकी सीमारेषा कुठे असते, याचा विचार पालक अनेकदा करत असतात. भारतीय क्रिकेट संघातील सर्वात भरवशाच्या फलंदाजांपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेने काही दिवसांपूर्वीच आपल्या बालपणीची एक आठवण सांगितली होती. अजिंक्य अवघ्या सात वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी घेतलेल्या एका शांत पण महत्त्वपूर्ण निर्णयाशी संबंधित ही आठवण आहे.

एकट्याने लोकल प्रवास

अलिकडेच बीबीसीवरील एका ‘प्री-मॅच शो’मध्ये बोलताना अजिंक्यने त्याच्या कायम स्मरणात राहिलेली एक आठवण सांगितली. “मी सात वर्षांचा असताना प्रॅक्टिससाठी लोकलने प्रवास करायचो. पहिल्या दिवशी माझे वडील मला सोडायला आले होते. त्यासाठी त्यांना ऑफिसमधून रजा घ्यावी लागली होती आणि त्या दिवसाचा त्यांना पगारही मिळाला नव्हता. दुसऱ्या दिवशी ते म्हणाले, ‘आता तुला लोकलने एकट्यानेच प्रवास करावा लागेल.'”

आजकालच्या पालकांसाठी सात वर्षांच्या मुलाला गर्दीने भरलेल्या मुंबई लोकलमधून एकटे पाठवणे ही गोष्टच अकल्पनीय वाटू शकते. पण अजिंक्यच्या वडिलांसाठी हा आपल्या मुलाला वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार नव्हता; तर त्याला हळूहळू स्वावलंबी बनवण्याचे ते एक पाऊल होते.
Maharashtra TimesSakshi Chaudhary Boxing : शेतकऱ्याच्या लेकीची गगनभरारी, बॉक्सर साक्षीनं पदक पक्कं करत रचला इतिहास, एका टर्निंग पॉइंटने बदललं आयुष्य

अजिंक्यचा भाबडा समज

ही गोष्ट साधारण १९९५-९६ ची. दररोज सकाळी ७ वर्षांचा अजिंक्य आपली क्रिकेट किट बॅग घेऊन गर्दीने खच्चून भरलेल्या लोकलमधून सरावासाठी जायचा. त्याला वाटायचे की स्वतःची जबाबदारी स्वतः सांभाळण्याइतपत वडिलांचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र अनेक वर्षांनंतर त्याला या गोष्टीची दुसरी बाजू समजली.

वडिलांचा दुसऱ्या डब्यातून प्रवास

अजिंक्यला तब्बल पाच-सहा वर्षांनंतर खरं कारण समजलं. “मी अवघ्या सात वर्षांचा असताना मुंबईत पहाटेच्या वेळी खच्चून भरलेल्या लोकलमधून माझी किट-बॅग घेऊन प्रवास करायचो. साधारण पाच-सहा वर्षांनंतर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की, त्या काळात मी रेल्वे स्टेशनपर्यंत सुखरुप पोहोचतोय की नाही हे पाहण्यासाठी ते दुसऱ्या डब्यातून माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. ही गोष्ट माझ्या मनाला खूप खोलवर स्पर्शून गेली.”

सुरक्षित पोहोचत असल्याची खात्री

अजिंक्य रहाणेला त्याचे वडील त्याला कधीच खऱ्या अर्थाने एकटे सोडत नसत. मुलाला आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे किंवा आपल्यावर संशय घेतला जात आहे, असे अजिबात वाटू न देता, ते शांतपणे दुसऱ्या डब्यातून प्रवास करत असत आणि संपूर्ण प्रवासादरम्यान आपल्या मुलावर नजर ठेवून तो सुरक्षितपणे पोहोचतोय ना, याची खात्री करत असत. अजिंक्यसाठी ही केवळ बालपणीची एक आठवण न राहता त्याहूनही अधिक मोलाची गोष्ट ठरली आहे.
Maharashtra TimesJayden seales : 18 धावांत 5 विकेट्स, पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरला; कोण आहे वेस्ट इंडिजचा स्टार जेडन सील्स?

अजिंक्यचा निर्धार

हा किस्सा केवळ एका रेल्वे प्रवासावर संपली नाही; तर त्या घटनेने अजिंक्यचा आपल्या पालकांकडे आणि क्रिकेटमधील स्वतःच्या प्रवासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन घडला. तो म्हणाला, “त्याच वेळी मी ठरवले की, इथून पुढे मी जे काही करेन — मग ते माझ्या राज्यासाठी खेळणं असो किंवा देशासाठी — ते मी माझ्या पालकांसाठी करेन; आणि तीच प्रेरणा मला नेहमीच पुढे जाण्यासाठी बळ देत राहिली आहे.”