![]()
पुणे येथे व्यवसायाच्या परवान्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी सायंकाळी त्यांना अटक केली. या प्रकरणातील तक्रारदार हे ३७ वर्षीय परवाना सल्लागार आहेत. त्यांच्या एका कंपनीला उत्पादन शुल्क विभागाकडून आवश्यक परवाना हवा होता. तसेच, कंपनीची मद्यनिर्मितीशी संबंधित फाइल मंजूर करण्यासाठी आरोपी पाटील यांनी तक्रारदाराकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांनी कंपनीच्या एफएल-३ परवान्यासाठी फाइल पुढे पाठवण्यासाठी १२ लाख रुपये आणि मायक्रो ब्रुअरीची फाइल मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपये, अशी एकूण २० लाख रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी १३ एप्रिल, २१ मे आणि २२ मे रोजी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान आरोपी पाटील यांनी तक्रारदाराकडे एकूण २२ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती त्यांनी ११ लाख रुपयांची लाच मागितल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी जितेंद्र पाटील यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस कर्मचारी भूषण ठाकूर, विशाल माने, विकास आडके, वनिता गारे आणि चंद्रकांत कदम यांनी या कारवाईत सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
Source link
उत्पादन शुल्क निरीक्षकावर गुन्हा दाखल:परवान्यासाठी 20 लाखांची लाच मागितल्याचा आरोप
