मात्र, AI मधील इतक्या मोठ्या प्रमाणात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीतून खरंच अपेक्षित परतावा मिळेल की नाही? याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात असून गुंतवणूकदारांची ही चिंता अल्प-मुदतीत शेअर मार्केटमध्ये दिसून येत आहे. अमेरिकन बाजारात एआयला सर्वात मोठी क्रांती मानले जात आहे, पण चीनही स्पर्धा करण्यात मागे राहिलेला नाही.
AI गुंतवणूक अमेरिकेलाच महागात पडणार
एआयसोबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ब्रोकरेज कंपनी जेफरीजचे इक्विटी स्ट्रॅटेजीचे जागतिक प्रमुख ख्रिस वूड यांनी गंभीर इशारा जारी केला आहे. वूड म्हणतात की, चीनची वेगाने वाढणारी एआय क्षमता आणि तिथे विकसित होत असलेले कमी खर्चाचे, ओपन-सोर्स एआय मॉडेल्स यामुळे अमेरिकेतील AI पायाभूत सुविधांमधील प्रचंड गुंतवणुकीमुळे भविष्यात भांडवलाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होऊ शकतो. वूड पुढे म्हणाले की, अमेरिकन टेक कंपन्या AI मध्ये विक्रमी गुंतवणूक करत आहेत.
2026 ते 2027 दरम्यान केवळ मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट (गूगल), ॲमेझॉन आणि मेटा यांचा एकत्रित भांडवली खर्च 1.57 ट्रिलियन डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, या कंपन्या इतक्या मोठ्या गुंतवणुकीच्या प्रमाणात महसूल मिळवू शकतील का? न झाल्यास गुंतवणूकदारांच्या अपेक्षा भंग होऊ शकतात आणि शेअर बाजारात मोठी घसरण होऊ शकते.
चीन बनेल का अमेरिकेसाठी आव्हान?
काही वर्षांपूर्वी अमेरिका दीर्घकाळ AI वर वर्चस्व गाजवेल, असे मानले जात होते पण चीनने वेगाने अंतर कमी केले आहे. अनेक चिनी कंपन्या मोठे लँग्वेज मॉडेल्स विकसित करत आहेत, जे कमी खर्चात उत्तम कामगिरीचे आश्वासन देतात. महत्त्वाचे म्हणजे यापैकी अनेक मॉडेल्स ओपन-सोर्स आहेत, म्हणजेच डेव्हलपर्स सहज त्यांचा वापर करू शकतात आणि सुधारणा करू शकतात.
अशाप्रकारे, जागतिक कंपन्यांनी स्वस्त किंवा कमी खर्चिक चिनी मॉडेलचा वापर सुरू केला, तर अमेरिकन कंपन्यांच्या महागड्या AI गुंतवणुकीवरील संभाव्य परतावा कमी होऊ शकतो. हाच धोका क्रिस वूड यांनी बाजारातील गुंतवणूकदारांच्या निर्दशनास आणून दिला आहे.
सध्या बऱ्याच अमेरिकन आयटी कंपन्या भविष्यात एआय सेवांमुळे महसूलात अनेक पटींनी वाढ होईल, याच आशेने अब्जो डॉलर्स खर्च करत आहे. पण स्वस्त आणि अधिक कार्यक्षम पर्याय उपलब्ध होऊ लागल्यास ग्राहकांना महागडे प्लॅटफॉर्म निवडण्याची सक्ती राहणार नाही.
एआयचा फुगा तयार होतोय का?
AI बद्दल गुंतवणूकदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर इंटरनेटच्या तेजीची किंवा डॉट-कॉम युगाची आठवण करून देतो, असे काही बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्या काळात कंपन्यांनी भविष्यातील शक्यतांवर आधारित मोठी गुंतवणूक केलेली, पण त्यापैकी अनेक तग धरून टिकू शकल्या नाही. मात्र, एआय तात्पुरते तंत्रज्ञान नाही, तर येत्या काही वर्षांत वापर वाढतच राहील आणि त्याची मागणीही मजबूत राहील असेही वूड पुढे म्हणाले. एआय क्षेत्रात अजूनही संधी आहेत, पण केवळ एआय कंपन्यांची नावे पाहून गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरणार नाही.
तसेच भविष्यात चीन आणि अमेरिका यांच्यातील तांत्रिक स्पर्धा तीव्र होऊ शकते. यामुळे AI उद्योगात नवीन तंत्रज्ञान उदयास येईल, पण पूर्वीपेक्षा स्पर्धाही अधिक तीव्र होणे अपेक्षित असून त्यामुळे एआय-संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना केवळ भविष्यातील शक्यताच नव्हे, तर आर्थिक कामगिरी, रोख प्रवाह आणि नफ्याच्या क्षमतेवरही तितकेच लक्ष दिले पाहिजे.

