8th CPC Latest Update: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्स आठव्या वेतन आयोगाशी संबंधित नवीन माहितीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता, 8व्या वेतन आयोगाने केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांतील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना, महासंघ आणि युनियन्ससोबतच्या बैठकांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच वेतन आयोगाचा अंतिम अहवाल कधी प्रसिद्ध होईल याबाबतही संभाव्य तारीख समोर आली आहे.

नोव्हेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली गेली. माजी AIS अधिकारी पंकज जैनही या आयोगाचे सदस्य असून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य प्राध्यापक पुलक घोष देखील या समितीच्या सदस्यांपैकी आहेत.
8व्या वेतन आयोगासमोरील मागण्या कोणत्या?
- कर्मचारी संघटनांची आयोगासमोरील एक प्रमुख मागणी म्हणजे विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींचे एकत्रीकरण करणे. विशेषतः, प्रतिनिधींच्या लेव्हल 2, 3, स्तर 4 आणि 5, स्तर 7 आणि 8, तसेच स्तर 9 आणि 10 चे विलीनीकरण करण्याचाही प्रस्ताव दिला गेला आहे. वेगवेगळ्या स्तरांवरील वेतनश्रेणी एकत्र केल्याने कर्मचाऱ्यांमधील विषमता दूर होऊ शकते, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.
- सध्याच्या लेव्हल 5 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी लेव्हल 6 मध्ये श्रेणी सुधारित करण्याचीही संघटनांनी मागणी केली आहे. केंद्रीय सचिवालय, रेल्वे, संरक्षण आणि टपाल सेवा यांसारख्या विभागांमधील मोठ्या संख्येने गट ‘क’ कर्मचारी दीर्घकाळापासून लेव्हल 5 वर अडकले, ज्यामुळे जुन्या प्रणालीअंतर्गत त्यांच्या करिअरमधील प्रगतीच्या संधींना बाधा येत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
- देशातील नियोक्त्यांच्या सर्वात मोठ्या प्रतिनिधी संस्थांपैकी NC-JCM ने सादर केलेल्या निवेदनानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बेसिक पे 18000 रुपयांवरून 69000 रुपयांची वाढवण्याची मागणी केली आहे. म्हणजे, यानुसार फिटमेंट फॅक्टर किमान 3.83 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला गेला तर, सध्याच्या 3 टक्क्यांऐवजी 6% वार्षिक वाढीची मागणीही केली आहे.
- याशिवाय प्रोव्हिडंट फंड (EPF) काढण्यात सुलभता, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी दाव्यांचे जलद निराकरण आणि कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी उत्तम जीवन विमा संरक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे.
वेतन आयोगाच्या नव्या बैठकांचे वेळापत्रक जाहीर
8 व्या केंद्रीय वेतन आयोगाने दिल्लीस्थित केंद्रीय कर्मचारी संघटना, महासंघ आणि युनियन यांच्यासोबत चर्चेसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. चर्चेची पुढील फेरी ऑगस्ट महिन्यात नवी दिल्लीत होणार असून यामुळे कर्मचारी संघटना आणि इतर हितधारकांना मागण्या व सूचना मांडण्याची आणखी एक संधी मिळू शकेल.
आठव्या वेतन आयोगाने 7 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट रोजी दिल्लीत स्थित किंवा नोंदणीकृत असलेल्या कर्मचारी संघटनांना आयोगासोबत चर्चेसाठी आमंत्रित केले असून याआधी कोलकाता येथे 9 आणि 10 जुलै रोजी बैठक पार पडलेली तर, येत्या काही महिन्यांत देशभरातील इतर राज्यांतील संघटनांसोबतही चर्चेसाठी वेळ दिला जाईल.
वेतन आयोगाचा अंतिम अहवाल कधी प्रसिद्ध होणार?
डिसेंबर 2026 पर्यंत वेतन आयोगाने आपला अहवाल सादर करण्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मात्र, जून-जुलै 2027 पर्यंत अंतिम अहवालासाठी मुदत दिली गेली आहे. 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आधी अंतरिम अहवाल प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतर आयोगाच्या स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्यांत अंतिम अहवाल प्रसिद्ध करण्याचे संकेत दिले होते.

