Gurnoor Brar News : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान गुरनूर ब्रारने आचारसंहितेचा भंग केल्याचे आयसीसीने मान्य केले. त्याला अधिकृत ताकीद आणि एक डिमेरिट गुण देण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या भारताचा युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आता आयसीसीच्या कारवाईमुळे चर्चेत आला आहे. सामन्यादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजे आयसीसीने त्याला अधिकृत ताकीद दिली आहे. यासोबतच त्याच्या शिस्तभंगाच्या नोंदीमध्ये एक डिमेरिट गुणही जोडण्यात आला आहे. गेल्या 24 महिन्यांतील हा त्याचा पहिलाच शिस्तभंगाचा प्रकार असल्याने आयसीसीने सौम्य कारवाई केली आहे.
मैदानावर नेमकं काय घडलं?
इंग्लंडच्या डावातील आठव्या षटकात गुरनूर ब्रारने चेंडू अडवल्यानंतर तो इंग्लंडच्या फलंदाजाच्या दिशेने धोकादायक पद्धतीने फेकल्याचे पंचांच्या निदर्शनास आले. ऑन-फिल्ड पंच कुमार धर्मसेना आणि माइक बर्न्स, तिसरे पंच सॅम नोगाज्स्की तसेच चौथे पंच रसेल वॉरेन यांनी हा प्रकार आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 2.9 चे उल्लंघन असल्याचे मानले.
गुरनूरने मान्य केली चूक
सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सुचवलेली शिक्षा गुरनूर ब्रारने कोणताही आक्षेप नोंदवता स्वीकारली. त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही. आयसीसीच्या नियमानुसार लेव्हल-1 उल्लंघनासाठी अधिकृत ताकीद, कमाल 50 टक्के सामना शुल्काचा दंड किंवा एक ते दोन डिमेरिट गुण दिले जाऊ शकतात.
आयसीसीच्या नियमानुसार एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांत चार किंवा त्यापेक्षा अधिक डिमेरिट गुण मिळाल्यास त्याचे निलंबन गुणांमध्ये रूपांतर होते. त्यानंतर संबंधित खेळाडूवर एका कसोटी किंवा दोन वनडे अथवा दोन टी-20 सामन्यांची बंदी लागू शकते. डिमेरिट गुण 24 महिने खेळाडूच्या नोंदीत कायम राहतात आणि त्यानंतर आपोआप हटवले जातात.
दरम्यान, भारताने पहिला वनडे सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे. आज भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये दुसरा सामना रंगणार आहे. या सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने टॉस जिंकत भारताला फलंदाजीचे आव्हान दिले आहे. आता विराट कोहली, रोहित शर्मा आणि सर्वच फलंदाजांची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा