‘माझं अध्यात्म’ हे शब्द ‘माझा सूर्य’, ‘माझा समुद्र’ यांसारखेच विशाल स्वरूपाला गवसणी घालण्याचा मानवी मनाचा प्रयत्न दर्शवतात. सूक्ष्म दृष्टीने पाहता, अध्यात्म हे उत्तम, आनंदी जीवन जगण्याचे जसे साधन आहे; तसेच ते साध्यही आहे. विविध अध्यात्मग्रंथ, उपासना पद्धती, संतवाङ्मय आणि संतचरित्रे यांचा मागोवा घेत होणारी आंतरिक वाटचाल म्हणजे अध्यात्म, असे ढोबळमानाने म्हणता येईल.
प्रत्येकाची आंतरिक प्रकृती आणि बाह्य परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे, वरवर एकच वाटणाऱ्या साधनापद्धतीत व्यक्तिपरत्वे रुचिभिन्नता येते. कौलारू घरांना काही ठिकाणी प्रकाश येण्यासाठी काचेची पारदर्शक कौले लावलेली असतात. त्यातून सूर्यप्रकाशाचे कवडसे घरात येतात. प्रत्येक कवडशाचा आकार, त्यातून येणारा उजेड वेगवेगळा असला, तरी त्या सर्वांमधील प्रकाशतत्त्व आणि त्यांचे उगमस्थान असणारा सूर्य एकच आहे; तसे सर्व उपासनापद्धती वैविध्यपूर्ण दिसल्या, तरी ‘ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव’ हा त्यामागचा समान उद्देश आहे. स्वतःसहित सर्व जगाचे अधिष्ठान असणाऱ्या तत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव येणे, ही मानवी बुद्धीसाठी सर्वांत मोठी उपलब्धी. जिवंतपणी होणारी ही गोष्ट असून, नीट प्रयत्न केल्यास याच आयुष्यात साध्य होऊ शकेल, ही ग्वाही सर्व संत देतात.
‘सत्य-असत्यासी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमतां॥’ या तुकाराम महाराजांच्या वचनातून त्यांच्या स्वतंत्र, सारग्राही वृत्तीचे दर्शन घडते. चिंतन, श्रवण, स्वाध्याय आणि नामस्मरण व ध्यान यांच्या साह्याने तत्त्वाचा अनुभव घेऊ शकेल, असे शुद्ध आणि समर्थ अंतःकरण असलेली व्यक्ती घडवणे, हेच अध्यात्ममार्ग विशद करण्याचे उद्दिष्ट आहे. आपले मूळ स्वरूप जाणणे व त्या ज्ञानाच्या प्रकाशात प्राप्त कर्तव्यकर्म करणे, हीच कृतार्थता आहे. याबाबतचे गीतावचन सर्व अध्यात्मप्रेमी व्यक्तींसाठी दिशादर्शक होऊन राहिले आहे.
(लेखक भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, संतसाहित्य यांचे विवेचक आहेत.)

