सांगली : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी आज एकत्र आले होते. सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची आणि मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ७ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाचे प्रमुख समन्वयक तथा कामेरीचे लोकनियुक्त सरपंच रणजित पाटील आणि शेतकरी नेते बी. जी. (काका) पाटील यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
शक्तिपीठ महामार्गामुळे सुपीक शेती, घरे आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असल्याचा आरोप त्यांनी केला. पावसाळी अधिवेशन सुरू असताना सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा आणि प्रस्तावित महामार्गाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला कॉम्रेड धनाजी गुरव, शहाजी पाटील, गुंडा पवार, वकील विजय पाटील, वकील दीपक लाड, इंद्रजीत पाटील तसेच जिल्ह्यातील शक्तिपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
