Headlines

आधारमध्ये नाव चुकले का? दुरुस्तीची ऑनलाईन प्रोसेस अगदी सोपी, कुठेही जाण्याची गरज नाही। Maharashtra Times


आधार कार्डवर नाव किंवा त्याचे स्पेलिंग चुकले असल्यास आता शासकीय कार्यालयात किंवा आधार केंद्रावर चकरा मारण्याची गरज नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी घरबसल्या नाव दुरुस्त करण्याची सुविधा दिली आहे. मोबाईल नंबर लिंक असलेल्या युजर्सना केवळ 50 रुपयांच्या शुल्कात ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येईल. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.

Update Aadhaar। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
बँक खाते उघडण्यापासून ते इतर सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्डवरील नाव अचूक असणे अनिवार्य आहे. जर तुमच्या आधारवर चूक झाली असेल, तर पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्राच्या मदतीने ती डिजिटल पद्धतीने सुधारता येते. घरबसल्या ‘माय आधार’ (myAadhaar) पोर्टलवरून अवघ्या काही मिनिटांत नाव दुरुस्त करण्याची ही स्टेप-बाय-स्टेप तांत्रिक माहिती.

तुमच्याही आधार कार्डवर नाव चुकले असेल, तर काळजी करण्याची किंवा आधार केंद्रावर तासनतास रांगेत उभे राहण्याची अजिबात गरज नाही. ही ऑनलाईन प्रोसेस नक्की काय आहे आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

ऑनलाईन नाव बदलण्यासाठी किंवा स्पेलिंग दुरुस्त करण्यासाठी तुमच्याकडे खालीलपैकी एका वैध कागदपत्राचा स्कॅन केलेला फोटो (JPEG किंवा PDF फॉरमॅट) असणे आवश्यक आहे.

नाव दुरुस्तीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • 1. पॅन कार्ड
  • 2. पासपोर्ट
  • 3. ड्रायव्हिंग लायसन्स
  • 4. मतदार ओळखपत्र
  • 5. रेशन कार्ड
  • 6. गॅझेट सर्टिफिकेट

ऑनलाईन नाव दुरुस्तीची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

  • स्टेप 1: सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला (myaadhaar.uidai.gov.in) भेट द्या.
  • स्टेप 2: होम पेजवर असलेल्या ‘Login’ बटनवर क्लिक करा. तुमचा 12 अंकी आधार नंबर आणि दिलेला कॅप्चा कोड टाका. त्यानंतर ‘Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला 6 अंकी OTP टाकून लॉगिन करा.
  • स्टेप 3: लॉगिन झाल्यानंतर डॅशबोर्डवर अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी ‘Address & Name Update’ किंवा ‘Update Aadhaar Online’ या पर्यायावर क्लिक करा.
  • स्टेप 4: आता ‘Proceed to Update Aadhaar’ वर क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता दुरुस्त करण्याचे पर्याय दिसतील. त्यातील ‘Name’ या पर्यायावर क्लिक करून पुढे जा.
  • स्टेप 5: स्क्रीनवर तुमचे जुने नाव दिसेल. त्याच्या खाली दिलेल्या रकान्यात तुमचे नवीन बरोबर नाव आणि अचूक स्पेलिंग टाईप करा. तुम्ही इंग्रजीत टाईप करताच स्थानिक भाषेत (मराठीत) नाव स्वयंचलितपणे टाईप होईल. मराठीतील स्पेलिंग व्यवस्थित तपासून घ्या.
  • स्टेप 6: तुमचे बरोबर नाव टाईप केल्यानंतर, ते सिद्ध करण्यासाठी वर नमूद केलेल्या वैध कागदपत्रांपैकी (उदा. पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) एक निवडा आणि त्याचा स्पष्ट फोटो किंवा पीडीएफ फाईल अपलोड करा.
  • स्टेप 7: सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करून ‘Submit’ करा. या ऑनलाईन सेवेसाठी UIDAI कडून 50 ऑनलाईन फी आकारली जाते. तुम्ही यूपीआय, नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे हे पेमेंट करू शकता.

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक SRN (Service Request Number) मिळेल. या नंबरच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता. साधारणपणे 1 ते 2 आठवड्यांत तुमचे नाव ऑनलाईन अपडेट होते आणि तुम्ही नवीन डिजिटल आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा