परभणीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. खानापूर फाटा परिसरात किरकोळ वादातून हा राडा झाला असून, एका तरुणाच्या अंगावरून चक्क दोनदा स्कार्पिओ गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला असून नवा मोंढा पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
परभणीत किरकोळ कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धनाजी चव्हाण, परभणी : परभणीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरात शनिवारी सायंकाळी खानापूर फाटा परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीने खळबळ उडाली. लाठ्या-काठ्यांनी सुरू झालेल्या राड्यात एक धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणाने स्कार्पिओ गाडी वेगाने चालवत स्वतःच्याच सहकाऱ्याला दोनदा चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तरुणाचा जीव वाचला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील वसमत रोडवरील खानापूर फाटा परिसरात शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सहा जणांनी सार्वजनिक शांततेचा भंग करत हाणामारी सुरू केली. सायंकाळची वेळ असल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होती. हाणामारी सुरू होताच परिसरात गदारोळ उडाला आणि दोन्ही गट एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करू लागले.
स्वतःच्याच सहकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न
या राड्यादरम्यान एका तरुणाने आपली उभी असलेली स्काॅर्पिओ गाडी सुरू केली आणि तेथून वेगाने निघण्याचा प्रयत्न केला. घाईघाईत गाडी काढत असताना त्याने मागे-पुढे न पाहता थेट गाडी पळवल्यामुळे त्याच्याच गटातील एक तरुण चाकाखाली आला. धक्कादायक म्हणजे, चालकाने पुन्हा गाडी रिव्हर्स घेतली आणि पुन्हा त्या तरुणाच्या अंगावरून गाडी घातली. सुदैवाने या संपूर्ण प्रकारात तो तरुण गंभीर जखमी झाला असला तरी त्याचा जीव वाचला आहे.
या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेची दखल घेत परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये एकूण सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९४, २ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आता अशा भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेली ही हाणामारी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोसले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा