Headlines

Bhandara reliance jio employees teach a lesson by cutting cables after salary hike demands ignored; दोन कर्मचाऱ्यांनी धडा शिकवण्यासाठी उचललं धक्कादायक पाऊल


Bhandara News: वारंवार पाठपुरावा करूनही पगारवाढीची मागणी पूर्ण न झाल्यामुळे दोन्ही कर्मचारी संपावर गेले. मात्र त्यानंतरही कंपनीकडून कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे नंतर या कर्मचाऱ्यांनी धक्कादायक पाऊल उचललं.

bhandara jio news
दोन कर्मचाऱ्यांनी धडा शिकवण्यासाठी उचललं धक्कादायक पाऊल(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भंडारा : आर्थिक वर्ष संपत आल्याने कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढीची चर्चा रंगली आहे. अपेक्षित पगारवाढ मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची कंपनीकडून अपेक्षा असते. ही पगारवाढ नाही मिळाली तर अनेक कर्मचारी कंपनी सोडण्याचाही निर्णय घेतात. मात्र भंडारा जिल्ह्यात मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भंडाऱ्यात रिलायंस जिओ कंपनीकडे कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी केली. संपही केला. परंतु, कंपनीने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मोबाइल टॉवरवरील केबलच कापली. त्यामुळे तब्बल २५८ तास नेटवर्क खंडीत राहिले. त्यातून कंपनीचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज राजेंद्र पाटील रा. भंडारा (३०) आणि राकेश धांडे रा. सावरी, लाखनी अशी या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे जिओ कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कामाला आहेत. काही दिवसांपासून त्यांनी कंपनीकडे पगारवाढीची मागणी केली. मात्र वारंवार विचारणा करूनही ही मागणी पूर्ण न झाल्याने दोन्ही कर्मचारी संपावर गेले. तरीही कंपनीकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांनी कंपनीच्या नेटवर्कच्या कामात हस्तक्षेप निर्माण केला.

९ फेबु्रवारी रोजी दोन्ही कर्मचाऱ्यांनी रिलायंस जिओ कंपनी मोबाइल टॉवरवरील फायबर केबल कापली. त्यामुळे ५४ टॉवरवरील नेटवर्क सेवा २५८ तासांसाठी खंडीत झाली. त्यात कंपनीचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. सोबतच जिओ कंपनीच्या मोबाइलधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, या घटनेनं जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली. पगारवाढी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी कंपनीला अद्दल घडवण्यासाठी थेट केबल कापण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेप्रकरणी मनोज राजेंद्र पाटील आणि राकेश धांडे या दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा