Headlines

Crime News: नळातून दूषित पाणी, पुजाऱ्यानं छतावरील टाक्या उघडताच गोण्या दिसल्या; उघडताच पायाखालची जमीन सरकली


एक पुजारी कौटुंबिक कर्यक्रमासाठी परिवारासह बाहेर गेला होता. तो घरी आला, तेव्हा नळातून दूषित पाणी येत होतं. त्यामुळे पुजाऱ्य़ानं छतावर असलेल्या पाण्याच्या टाक्या उघडून पाहिल्या.

water tank
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चेन्नई: एका रहिवासी भागातील पाण्याच्या टाक्यांमधून दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा सुरू होता. दूषित पाणी येत असल्यानं कुटुंब वैतागलं. अखेर घराच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाक्या उघडण्यात आल्या. तेव्हा त्यात काही गोणी सापडल्या. त्यात महिलाच्या शरीराचे विविध अवयव सापडले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

तामिळनाडूच्या सलेम भागातील अरीसिपालयम परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बाहेर गेलेलं कुटुंब घरी परतल्यावर त्यांना नळातून दूषित पाणी येत असल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी घराच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाक्या तपासल्या. तेव्हा आतमध्ये गोण्या आढळल्या. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी गोण्या ताब्यात घेतल्या आहेत. महिलेची ओळख पटवण्याचे आणि तिची हत्या कोणत्या परिस्थितीत झाली, हे शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ही घटना सलेमच्या अरीसिपालयम येथील गुणाबालन रामासामी स्ट्रीट परिसरात घडली. इथल्या मंदिरात पुजारी असलेले रमेश त्यांच्या कुटुंबासह राहतात. ते एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी पत्नी यमुना आणि अन्य जणांसह तंजावरला गेले होते. कार्यक्रमाहून घरी परतल्यावर त्यांच्या पत्नीनं नळ सुरू केला. तेव्हाचा पाणी रंग नेहमीसारखा दिसत नव्हता. पाण्याच्या टाकीत काहीतरी गडबड असल्याचा संशय कुटुंबाला आला. त्यांनी छतावर जाऊन पाण्याच्या टाक्या उघडल्या. त्यातून दुर्गंधी येत होती. रमेश त्यांच्या मुलासह टाक्या तपासू लागल्या. तेव्हा त्यांना आत दोन गोण्या दिसल्या.

रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं कुटुंब शनिवारी रात्री तंजावरला निघालं होतं. सकाळी साडे सहाच्या सुमारास परतल्यावर त्यांना नळातून दूषित पाणी येत असल्याचं लक्षात आलं. रमेश यांनी टाकी उघडली. तेव्हा त्यातून दुर्गंधी आली. आत दोन गोण्या होत्या. त्यांनी एक गोणी बाहेर काढली. ती उघडून पाहताच रमेश आणि त्यांच्या कुटुंबाला धक्काच बसला. त्यामध्ये हात आणि पाय होते. यानंतर रमेश यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांचं पथक काही वेळातच रमेश यांच्या घरी पोहोचलं. त्यांनीही पाण्याच्या टाक्या तपासल्या. पोलिसांनी गोण्या बाहेर काढल्या. त्यांना गोणीमध्ये मानवी शरीराचे विविध अवयव सापडले. प्राथमिक तपासानंतर हे अवयव एका महिलेच्या शरीराचे असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर परिसरात एक अनामिक भीती पसरली आहे.

पोलिसांनी एकूण तीन गोण्यांमधून महिलेच्या शरीराचे अवयव सापडले आहेत. तिसऱ्या गोणीत महिलेच्या पार्श्वभागाचे अवयव आढळले. महिलेला संपवण्यात आल्यावर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या गोण्यांमध्ये भरून पाण्याच्या टाक्यांमध्ये टाकण्यात आले. ही घटना दाट लोकसंख्या असलेल्या परिसरात घडल्यानं लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.