Headlines

"हे शेवटचं आंदोलन, एकही माघार नाही!":मनोज जरांगेंचे पुन्हा आमरण उपोषण सुरू, 12 तारखेला करणार मुंबई आंदोलनाची घोषणा




मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी समितीच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा-कुणबी वंशावळ जुळवणी समितीला शासनाने आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली असली तरी, आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत. आज उपोषणाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव आंतरवालीत दाखल झाले असून यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले आहे. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी लवकरच मुंबईतील आंदोलनाची दिशा आणि तारीख जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. पुढील आंदोलनाबाबत आणि तयारीबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, “आपल्याला महाराष्ट्रातील, मुंबईतील मराठ्यांनी नावं नाही ठेवले पाहिजे, हेही संस्कार जपले पाहिजेत. यावेळी, विजयापासून लांब जाऊ द्यायचं नाही ही जबाबदारी आपली आहे. यंदाचे उग्र आंदोलन सुद्धा मराठ्यांच्या शांततेपणात उग्र वाटले पाहिजे. हे शेवटच आंदोलन, याच्या मागणीत एकही माघार नाही. महाराष्ट्रातील बांधव बोलावून मुंबईची तारीख ठरवणार आहे. तीन दिवसात मराठा मुंबईला नेऊन वापस आणलेला आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे पक्की तयारी करायची आहे. येत्या 12 तारखेला मुंबईच्या तारखेची घोषणा करू, मुंबईत 5 टप्प्यात आंदोलन होईल,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी काय चीज आहे हे अजित दादा, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना माहिती आहे, मी साधं रसायन नाही, त्यांच्यात चर्चा होती. त्यामुळे, ही लढाई आपल्याला नियोजनबद्ध करावी लागणार आहे. फडणवीस-शिंदेंच्या डोक्याला मुंग्या आल्या पाहिजेत. सरकारला माज आलाय, आमचे कोणीच काही करू शकत नाही असं त्यांना वाटतंय. पण, मराठ्यापुढे सत्तेच शहाणपण चालत नाही. एकदा प्लॅनिंग झाली तर मुंबईच नाही दिल्ली सुद्धा हलवू शकतो, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे. तसेच मला बोलता आले नाही तरी मला वर्षावर घेऊन जा, मी बारका दिसतो पण 10-12 जण पाडू शकतो. मुंबईला 40-45 लाख मोटरसायकल काढायच्या आहेत, मी एकटा ट्रकवर येतो, असेही त्यांनी म्हटले आहे. तरुणांसोबत ज्येष्ठांनाही लढण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आता 50 ते 60 वयोगटातील ज्येष्ठ समाजबांधवांनाही मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “तरुण पोरं आरक्षणासाठी झुंजणार असतील, तर मग म्हातारे नोकरी करणार आहेत का? पारावर बसून वेळ घालवण्यापेक्षा समाजाच्या हक्कासाठी लढा,” अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी ज्येष्ठांनाही या लढ्यात सक्रिय होण्याची साद घातली आहे. 12 तारखेला ठरणार मुंबई आंदोलनाची दिशा सध्या मुंबईत मराठी, परप्रांतीय, मराठवाडी किंवा जैन असा कोणताही समाज सुखी नाही. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते डी. बी. पाटील यांचे नाव देण्यासही हे सरकार तयार नाही, एवढा यांना माज आला आहे, अशी घणाघाती टीका जरांगे यांनी केली. येत्या 12 तारखेला मुंबईला जाण्याची अंतिम तारीख ठरवली जाईल, त्यामुळे सर्वांनी तयारीला लागावे. तसेच, मुंबईतील मराठा बांधवांनी आंदोलकांसाठी फक्त जेवण कमी पडू देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी पुन्हा एकदा मुंबई गाठण्याची पक्की तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले. हेही वाचा.. मनोज जरांगे पाटलांचे 11वे आमरण उपोषण सुरू:म्हणाले- सरकारच्या नियतीत खोट, मराठ्यांचे कल्याण होऊ द्यायचे नाही; इथं तोडगा निघाला नाही तर मुंबई गाठणार! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (शनिवार) आंतरवाली सराटी येथे आपले 11वे आमरण उपोषण सुरू केले आहे. “जीवघेणा लढा आता सुरू झाला आहे, अंमलबजावणी झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर मुंबईला जाणार,” असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार, जात पडताळणी समिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले. वाचा सविस्तर



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत