Chhatrapati Sambhajinagar: ऐन पावसाच्या दिवसांत किमान तीन आठवड्यांपासून पावसाने लावलेल्या गैरहजेरीमुळे थंड गरम वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी शहरात डास चिलटांचा उपद्रव वाढून आजारांचा उद्रेक झाला आहे.

डास-चिलटांचे प्रमाणात वाढ
सद्यस्थितीत डास-चिलट खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत व त्यामुळे घरात दहा मिनिटेही स्वस्थ बसणे शक्य होत नसून, मॉस्क्युटो रिपेलंट काम करत आहे का नाही, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे. त्याचाच परिणाम म्हणून डास मारायची बॅट घेऊन बसण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, समस्त रुग्णालयांमध्ये डेंगी, स्वाइन फ्लू सदृश रुग्ण वाढले आहेत.
डेंगी व स्वाइन फ्लूची लक्षणे
या संदर्भात शहरातील फिजिशियन डॉ. अनंत कुलकर्णी म्हणाले, ‘सध्या बाह्य रुग्ण विभागामध्येसर्दी-खोकला-तापेचे रुग्ण आहेच; शिवाय डेंगी व स्वाइन फ्लूची लक्षणे असलेले रुग्णही वाढल्याचे नक्कीच जाणवत आहेत. यातील काही रुग्णांना दाखल करावे लागत असले तरी गंभीर गुंतागुंत दिसत नसल्याचा दिलासाही आहेच’.
पुन्हा स्वाइन फ्लू सदृश रुग्ण वाढले
फिजिशियन डॉ. आनंददीप अग्रवाल यांच्यानुसार, टायफॉइडचे रुग्णही काहीअंशी वाढल्याचेही दिसून येत आहे. पुन्हा स्वाइन फ्लू सदृश रुग्ण वाढले असले विषाणू पूर्वीचाच असल्याने, गंभीर गुंतागुंत सध्या तरी पाहायला मिळत नाही. मात्र मोजक्या ज्येष्ठ किंवा व्याधीग्रस्तांना निरीक्षणाखाली दाखल करावे लागत आहे, असेही डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.
Nashik Crime: सहा कैद्यांचा कारागृह शिपायावर हल्ला; अधीक्षकांच्या संचार फेरीवेळी धुडगूस, काय घडलं?
पालिकेत केवळ १५ रुग्णांची नोंद
महापालिकेच्या आरोग्य विभागांर्तगत मागच्या दोन महिन्यांत डेंगीच्या निदानासाठी केली जाणारी ‘एनएस१’ ही चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या सुमारे १५ झाली आहे. अर्थातच, चाचणी केलेल्यांची ही नोंद असून, चाचणी न करणाऱ्या रुग्णांची संख्या कितीतरी पटींनी जास्त असू शकते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
डेंगी आजाराला कोणतेही विशिष्ट औषधोपचार नाहीत.
मुळात डेंगीची चाचणी केली किंवा नाही केली तरी उपचारांचा प्रोटोकॉल काही बदलत नाही. पुन्हा डेंगी आजाराला मलेरियाप्रमाणे कोणतेही विशिष्ट औषधोपचार नाहीत. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण राखणे, कोणतीही गुंतागुंत होणार नाही याची देखभाल घेणे महत्त्वाचे ठरते. अशा सर्वसाधारण स्थितीमुळे डेंगीचे अनेक रुग्ण चाचणी करत नाहीत, ही वस्तुस्थिती असली तरी त्यामुळे डेंगीचे रुग्ण कमी आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही, असेही तज्ज्ञांनी आवर्जून सांगितले.

