Headlines

Brother Dies: अखेरची राखी, शेवटची मिठी! भावाला राखी बांधताना बहीण धाय मोकलून रडली; सारेच गलबलले



हैदराबाद: देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत आहे. बहिणींकडून लाडक्या भावांना ओवाळलं जात आहे. त्यांच्या मनगटावर राखी बांधली जात आहे. घरांमध्ये आनंदाचा सोहळा सुरू आहे. तर दुसरीकडे एका बहिणीवर भावाची अखेरची ओवाळणी करण्याची, त्याला शेवटची राखी बांधण्याची वेळ आली. मृत भावाला राखी बांधताना बहिणीच्या अश्रूंचा बांध फुटला. तिला पाहून तिथे असलेल्या सगळ्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या.

तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील एका तरुणाचा करंट लागल्यानं मृत्यू झाला. एकीकडे बहीण भावाला राखी बांधण्याची तयारी करत असताना दुसरीकडे तिच्या भावानं जीव सोडला होता. भावाला अखेरचा निरोप देण्याआधी बहिणीनं त्याच्या पार्थिवाला राखी बांधली. २४ वर्षीय नवीनचा मृत्यू झाला. आपल्या मटनाच्या दुकानातील वीज पुरवठा सुरळीत करत असताना नवीनला विजेचा धक्का बसला. चाटनपल्ली रेल्वे गेटच्या जवळ शादनगरमध्ये नवीनचं मटणाचं दुकान आहे.

शादनगरच्या नेहरू नगर कॉलनीत राहणारा नवीन बुधवारी त्याच्या दुकानातील वीज पुरवठा सुरळीत करत होता. तेव्हा त्याला वीजेचा धक्का बसला. तो जागीच कोसळला. शेजारच्या दुकानदारांनी नवीनला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नवीनच्या अकाली मृत्यूनं त्याच्या कुटुंबाला, नातेवाईकांना जबर धक्का बसला. रक्षाबंधनाच्या आधी भावाच्या मृत्यूनं बहिणीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नवीनला अखेरचा निरोप देताना त्याच्या बहिणीनं त्याच्या मनगटावर राखी बांधली. त्यावेळी तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले होते. भावाला मिठी मारुन लाडकी बहीण धाय मोकलून रडली. आता आपला लाडका भाऊ कधीच दिसणार नाही, या भावनेनं तिचे डोळे भरून आले. कंठ दाटला. थरथरत्या हातांनी तिनं नवीनच्या हातावर राखी बांधली.

नवीनच्या हातातली राखी आणि त्याच्या बहिणीची अवस्था पाहून उपस्थित हेलावले. यानंतर नवीन अनंताच्या प्रवासाला निघून गेला. नवीनच्या अकाली मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मनमिळाऊ, शांत स्वभावाचा नवीन परिसरात सुपरिचित होता. त्याचा आकस्मिक शेवट सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत