Dombivli News: मानपाडा रोड आणि पुढे कल्याण -शिळा मार्गावर दिवसभर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीकर चांगलेच हैराण झाले आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रिक्षा स्थानकात आंदोलन
सागर्ली, शनी मंदिर, मानपाडा या भागात जाण्यासाठी तीन तास रांगेत थांबूनही स्टँडवर एकही रिक्षा न आल्याने प्रवाशांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रिक्षा स्थानकात आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत या मार्गावर बससेवाही सुरू करण्यात आली. वाहतूक पोलिस रस्त्यावर उतरल्याने रिक्षाचालकांनी काही दिवस प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न केला.
प्रवाशांचे हाल सुरूच
मात्र, काही दिवसांतच पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. गर्दीच्या वेळी धावणाऱ्या बसही वाहतूक कोंडीत अडकत असल्याने प्रवाशांना या सेवेचा फारसा फायदा होत नाही. मुंबईहून नोकरीवरून परतणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत वाहतूक सुविधाअपुऱ्या असल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.
प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे
सर्वाधिक प्रवासी वाहतुकीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. दिवसभर नोकरी करून संध्याकाळी परतणाऱ्या प्रवाशांना लोकलचे धक्के सहन केल्यानंतर पुन्हा दोन ते तीन तास रिक्षाच्या रांगेत थांबावे लागते. प्रवाशांची प्रतीक्षेची रांग पूर्वेकडून रेल्वे पूल ओलांडून थेट पश्चिमेपर्यंत पोहोचते. यावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.राजकीय वादआणि चढाओढीत व्यस्त असणाऱ्या राजकीय नेत्यांना डोंबिवलीतील प्रवाशांचे हाल कधी दिसणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
रिक्षाचालकांचे मत
दिवसभरात प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षा स्टेशन ते सोनारपाडा किंवा पलावा दरम्यान किमान आठ ते दहा फेऱ्या मारतात. मात्र, संध्याकाळी सहानंतर त्यांना एक किंवा दोन फेऱ्यांचीच संधी मिळते. त्यामुळे अनेक रिक्षाचालक दिवसभर व्यवसाय करून संध्याकाळी सहापूर्वीच निघून जात असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.
डोंबिवली ते शनी मंदिरपर्यंतचा रस्ता रुंद करण्याची मागणी
आधीच या मार्गावर प्रवासी वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या आहेत. त्यातच संध्याकाळी रिक्षांची संख्या कमी होते. पेंढरकर महाविद्यालय, सागाव, दत्तनगर, सुनीलनगर, नांदिवली या भागांकडे जाणाऱ्या मार्गांवर तुलनेने कमी कोंडी असल्याने रिक्षाचालकांकडून त्या मार्गांना अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे मानपाडा मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नशिबी केवळ प्रतीक्षाच उरली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी डोंबिवली ते शनी मंदिरपर्यंतचा रस्ता रुंद करण्याची मागणी होत आहे.

