नागपूर : सध्या राज्यभर अन्न व औषध प्रशासनाकडून कॅन्टीन, हॉटेल आणि खाद्यपदार्थांची तपासणी व कारवाई सुरू असताना नागपुरातही निकृष्ट भोजनाचा प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या काँग्रेसनगर येथील श्री शिवाजी सायन्स कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहातील मेसच्या निकृष्ट भोजनाबाबत विद्यार्थिनींनी केलेल्या गंभीर तक्रारींची अखेर महाविद्यालय प्रशासनाने दखल घेतली आहे. मेसच्या जेवणात किडे आणि अळ्या आढळल्याचा विद्यार्थिनींचा आरोप असून, यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. या प्रकारानंतर महाविद्यालय प्रशासनाने संबंधित मेस कंत्राटदाराला नोटीस बजावत अखेर त्याचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
वसतिगृहातील भोजनाच्या गुणवत्तेबाबत विद्यार्थिनींकडून यापूर्वीही वारंवार तक्रारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मेसमधील जेवणाच्या दर्जाबाबत समस्या असल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला आहे. मात्र, अनेकदा तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने विद्यार्थिनींमध्ये नाराजी होती. मेसमध्ये देण्यात येणाऱ्या अन्नामध्ये किडे, अळ्या तसेच इतर बाह्य दूषित पदार्थ आढळल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. या प्रकाराचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले. अन्न तयार करताना स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे योग्य पालन केले जात नसल्याचाही आरोप विद्यार्थिनींकडून करण्यात आला. मेसच्या स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्नाची हाताळणी, साठवणूक आणि परिसराच्या देखभालीबाबतही विद्यार्थिनींनी प्रश्न उपस्थित केले होते. निकृष्ट दर्जाचे किंवा अस्वच्छ भोजन सेवन केल्याने विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पालकांमध्येही या प्रकाराबाबत नाराजी आणि चिंता होती.
याशिवाय भोजनाच्या गुणवत्तेबाबत आवाज उठविणाऱ्या काही विद्यार्थिनींना कथितरीत्या धमकावले जात असल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला होता. विद्यार्थिनींनी मेसमधील परिस्थितीचे फोटो, व्हिडीओ आणि अन्य पुरावे प्रशासनासमोर सादर करण्याची तयारी दर्शविली होती. या सर्व तक्रारींची दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने संबंधित मेस कंत्राटदाराला नोटीस बजावली. त्यानंतर प्रशासनाने कंत्राटाचा आढावा घेत संबंधित कंत्राटदाराचे मेसचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, वसतिगृहातील विद्यार्थिनींना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक भोजन मिळावे, तसेच मेस व्यवस्थेत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचे सर्व आवश्यक निकष काटेकोरपणे पाळले जावेत, अशी मागणी होत आहे. मेसचे नवीन व्यवस्थापन करताना भोजनाची गुणवत्ता आणि विद्यार्थिनींच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची अपेक्षा विद्यार्थिनीकडून व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा