पणजी : श्रावण महिन्याच्या भक्तिमय वातावरणाला सुरेल संगीताची साथ देण्यासाठी गोव्याचे मराठी दैनिक ‘तरुण भारत’ आणि कला व संस्कृती खाते, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संगीत संध्या’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील चार विविध देवस्थानांमध्ये होणाऱ्या या संगीत मैफलीची सुरुवात शुक्रवार, 28ऑगस्ट रोजी बेती-बाद्रेश येथील श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण देवस्थानात होणार आहे.
या कार्यक्रमानंतर ३ सप्टेंबर रोजी माशेल येथील श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थान, 6 सप्टेंबर रोजी शेल्डे-केपे येथील सातेरी शांतादुर्गा देवस्थान आणि 7 सप्टेंबर रोजी फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानात संगीत संध्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांना सायंकाळी 6.30 वाजता सुरुवात होणार आहे.
संगीत संध्येत गोव्याचे प्रसिद्ध गायक डॉ. प्रवीण गावकर यांच्यासह त्यांचे शिष्य पल्लवी पाटील, आरती गावडे, दत्तगुरु केळकर, देव दळवी, मधुरा नवघरे आणि अर्चना कामुलकर भक्तिगीते, भावगीते आणि नाट्यगीते सादर करणार आहेत.
या गायक कलाकारांना सुभाष फातर्पेकर, यतीन तळावलीकर, दत्तराज म्हाळशी, दत्तराज शेट्ये आणि योगेश रायकर यांची सुरेल साथसंगत लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. गोविंद भगत, मानसी वाळवे आणि वंदना बाक्रे करणार आहेत.
‘स्वस्तिक’ संस्थेच्या वतीने या संगीत मैफलीची निर्मिती करण्यात आली आहे. श्रावणातील भक्तिमय वातावरणात संगीताचा आनंद घेता यावा, यासाठी सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. संगीतप्रेमी आणि भाविकांनी या सुरेल मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
