बारावीत राज्यात पहिला आलेल्या मुलाचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला. पण शेजाऱ्याच्या चाणाक्षपणामुळे आता त्याच्या पदव्या रद्द झाल्या आहेत. त्याला दिलेलं १ लाखाचं बक्षीसही जप्त होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लखनऊ: संस्कृत बोर्डाच्या बारावी परिक्षेतील टॉपर रजनीश यादवच्या सगळ्या पदव्या रद्द करण्यात आल्या आहेत. अव्वल आल्यानं १ लाख रुपये देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. ती रक्कमदेखील आता परत घेतली जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील आसपूर देवसरा येथील रहिवासी असलेला रजनीशनं संस्कृत बोर्डच्या बारावीच्या परिक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्याला १ लाख रुपयांचं बक्षीस, टॅबलेट, पदवी आणि प्रशस्तीपत्र देण्यात आलं होतं.
रजनीशचा शेजारी जगत प्रसादनं तक्रार दाखल केली. या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यात त्याची जुनी शैक्षणिक कागदपत्रं बोगस आढळून आली. रजनीशनं जन्मतारखेसह नावातही बदल केला होता. त्यामुळे प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषदेचे संचालक प्रताप सिंह बघेल यांनी त्याचे हायस्कूल आणि इंटरमीडिएटची शैक्षणिक कागदपत्रं रद्द केली. रजनीशला देण्यात आलेला पुरस्कार परत घेतला जाणार असून त्याला दिलेला सन्मान निधीही वसूल केला जाणार आहे.
यूपी संस्कृत बोर्ड २०२६ चा टॉपर रजनीश यादवच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यादव विरोधात फसवणूक, कटकारस्थान रचल्याच्या गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सरकारनं आता त्याच्याकडून लॅपटॉप आणि १ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. नाव आणि जन्मतारखेत बदल करून प्रवेश घेऊन परीक्षा दिल्याचा आरोप रजनीशवर आहे.
रजनीशचा शेजारी जगत प्रसादनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे आसपूर देवसरा पोलीस ठाण्यानं कारवाई केली. राम टहल संस्कृत माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या रजनीशनं २४ एप्रिलला जाहीर झालेल्या निकालात ८९.३६ टक्के मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याचा सन्मान केला होता. आता हाच टॉपर कायदेशीर वादात सापडला आहे.
या सगळ्या घटनाक्रमानंतर उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषदेच्या २०२६ मध्ये बारावीच्या परिक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या रजनीश यादवचं नाव वादात सापडलं आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या रजनीशनची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली होती. मात्र आता त्याच्यावर फसवणुकीचे आरोप झाले आहेत.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा